धुळे: जैताणेत सरपंचपदासाठी 'संगीत खुर्ची' सुरू

jaitane
jaitane

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीत सद्या सरपंचपदाच्या 'खुर्ची'साठी अंतर्गत धुसफूस व चढाओढ सुरू झाली आहे. सलग तीन पंचवार्षिक म्हणजे 7 जुलै 1972 ते 10 ऑक्टोबर 1983 या (अकरा वर्षे तीन महिने व चार दिवसाच्या) कालावधीत सरपंचपदाची यशस्वी धुरा सांभाळणारे गावाचे धडाकेबाज दिवंगत सरपंच तथा जिल्हा परिषद सदस्य स्व. वेडू नागो महाजन यांनी खऱ्या अर्थाने जैताणे गावाचे नाव धुळे जिल्ह्यासह संपूर्ण खानदेश व उत्तर महाराष्ट्रात उज्वल केले. परंतु त्यांच्यानंतर गावाला प्रभावी नेतृत्वच लाभले नाही. आणि मग सुरू झाला संगीत खुर्चीचा खेळ. विद्यमान सरपंच संजय खैरनार यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा न दिल्याने काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गावात अलीकडे जातीपातीचे, गटातटाचे, सुडाचे व शह-कटशहाचे संकुचित राजकारण करण्यातच धन्यता मानली जात आहे. गावाच्या विकासापेक्षा खुर्ची व पदाला जास्त महत्व येऊ लागले आहे. त्यामुळेच सत्तेसाठी व खुर्चीसाठी घोडेबाजाराला सुरुवात झाली. परंतु आगामी काळात सरपंचपदाची निवडणूक ही थेट जनतेतून होणार असल्याने घोडेबाजाराला लगाम बसेल यात शंका नाही. राजकारणात कोणीही एकमेकांचे कायमचे शत्रू नसतात व कायमचे मित्र नसतात. परंतु याउलट राजकारणात कार्यकर्ते एकमेकांचे उघड शत्रू असतात तर नेते मात्र एकमेकांचे गुप्त मित्र असतात. म्हणून ज्याप्रमाणे भूल दिल्याशिवाय डॉक्टर ऑपरेशन करू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे दिशाभूल केल्याशिवाय राजकारणही केले जाऊ शकत नाही हे यातून सिद्ध होते. समाजाच्या जीवावर निवडणुका जिंकणारे पुढारी नंतर मात्र खुर्चीसाठी पद्धतशीरपणे समाजाला विसरतात. परंतु आता जनताही जागरूक झाली आहे. ती अशा कावेबाज पुढाऱ्यांचा कावेबाजपणा ओळखून निवडणूक काळात मतपेटीतून आपला रोष व्यक्त करते.

सद्या जैताणे ग्रामपंचायतीत विकास, ग्रामविकास आणि समताविकास या तिन्ही पॅनलची एकत्रित सत्ता आहे. त्यात विकास पॅनलचे आठ, ग्रामविकास पॅनलचे सहा तर समताविकास पॅनलचे तीन असे एकूण सतरा सदस्य आहेत. गटनेते संजय वेडू खैरनार हे बिनविरोध सरपंच असून आबा बाबूलाल भलकारे हे उपसरपंच आहेत. माजी उपसरपंच नानाभाऊ पगारे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी ठरलेल्या मुदतीतच राजीनामा दिला होता. परंतु सद्या ग्रामपंचायतीत खल सुरू आहे तो सरपंचपदासाठी. ऑगस्ट 2015 मध्ये ग्रामपंचायत निवडणूकीनंतर सत्ता स्थापन करताना सुरुवातीस तिन्ही पॅनलचे प्रमुख, ज्येष्ठ मार्गदर्शक व सदस्यांमध्ये काही वाटाघाटी झाल्या होत्या. त्यानुसार सुरुवातीला तिन्ही पॅनल मिळून पाच वर्षात पाच सरपंच व पाच उपसरपंच नेमण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु त्या प्रस्तावाला अंतर्गत विरोध झाल्याने त्यात नंतर बदल करण्यात आला. गावात माळी व धनगर हे दोन मुख्य समाज असून इतर समाजही गुण्यागोविंदाने नांदत आहेत. सद्या ग्रामपंचायतीत माळी समाजाचे सात, धनगर समाजाचे सहा, भिल्ल समाजाचे दोन, वाणी समाजाचा एक आणि चर्मकार समाजाचा एक असे एकूण सतरा सदस्य आहेत. त्यातही नऊ महिला व आठ पुरुष सदस्य आहेत. त्यामुळे ओबीसी पुरुषासाठी आरक्षित असलेल्या सरपंच पदावर माळी व धनगर समाजाची दावेदारी असणे स्वाभाविक आहे. त्यानुसार पाचपैकी सुरुवातीची तीन वर्षे माळी समाजाच्या सदस्याला व नंतरची दोन वर्षे धनगर समाजाच्या सदस्याला सरपंच पद देण्याचे सर्वानुमते ठरले. तर उपसरपंचपद सुरुवातीची तीन वर्षे धनगर अथवा अन्य समाजाच्या सदस्याला व नंतरची दोन वर्षे माळी अथवा अन्य समाजाच्या सदस्याला देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. पण कोणती टर्म नेमकी कोणाला आणि केव्हा द्यायची? याबाबत मात्र थोडी संदिग्धता ठेवण्यात आली... 

सामाजिक कार्यकर्ते दौलत जाधव व राजेश बागुल यांच्या म्हणण्यानुसार सुरवातीचे दीड वर्ष सरपंचपद संजय खैरनार यांना तर नंतरचे दीड वर्ष सरपंचपद ग्रामपंचायत सदस्या प्रमिलाबाई जाधव व मनीषा बागुल यांना विभागून द्यायचे ठरले होते. दोन वर्षे पूर्ण झालीत तरीपण अद्याप सरपंच संजय खैरनार यांनी राजीनामा न दिल्याने त्या दोघांनीही 'सकाळ'शी बोलताना जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. दुसऱ्या बाजूला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे व शानाभाऊ बच्छाव यांनी सरपंचपदासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. तर उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार व गणेश देवरे हेही इच्छुक असल्याची चर्चा आहे. आगामी काळात सरपंचपदाची व उपसरपंचपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

सरपंच संजय खैरनार यांना 'राष्ट्रवादी'चा कानमंत्र...
राष्ट्रवादी ओबीसी सेलचे धुळे जिल्हाध्यक्ष व जैताणेचे सरपंच संजय खैरनार यांना आगामी काळात राजकारणात 'लंबी रेस का घोडा' म्हणून जर काही मोठे ध्येय साध्य करायचे असेल तर त्यांनी समर्थक व कार्यकर्त्यांना नाराज करून चालणार नाही. असा कानमंत्र त्यांना वरिष्ठांसह राष्ट्रवादीतर्फे माजी जिल्हाध्यक्ष प्रा.संदीप बेडसे, तालुकाध्यक्ष प्रा.नरेंद्र तोरवणे, माजी सभापती सचिन बेडसे, कृषी सभापती लीलावती बेडसे, जिल्हा परिषद सदस्या इंदूबाई खैरनार, पंचायत समिती सदस्या सुनीता बच्छाव आदींनी दिला आहे.

आपल्याकडे बहुमत असल्याने सरपंचपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्न येतोच कुठे : सरपंच संजय खैरनार...

आपल्याला सतरा पैकी बारा सदस्यांचा पाठिंबा असल्याने सरपंचपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे तीन वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आपण सरपंचपदाचा राजीनामा देणार नसल्याचा खळबळजनक खुलासा जैताणेचे सरपंच संजय खैरनार यांनी 'सकाळ'शी बोलताना केला.

ग्रामपंचायत सदस्या प्रमिलाबाई जाधव व मनीषा बागुल यांना सतरा पैकी फक्त पाच सदस्यांचा पाठिंबा असून इतर बारा सदस्यांचा त्यांच्या नावाला विरोध असल्याने किमान तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय आपण सरपंचपदाचा राजीनामा देणार नसल्याचे सरपंच संजय खैरनार यांनी स्पष्ट केले. वास्तविक सरपंच पद हे ओबीसी पुरुषासाठी राखीव असताना सामाजिक कार्यकर्ते दौलत जाधव व राजेश बागुल यांनी महिला नेतृत्व गावावर लादणे योग्य नाही. मागील पाच वर्षातही सरपंचपद महिला राखीव होते. स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तास्थापनेसाठी आपण जीवाचे रान केले असून सर्व जातीधर्माच्या व सर्वपक्षीय लोकांना सोबत घेऊन यशस्वीपणे वाटचाल करत आहोत. म्हणून श्री. जाधव व श्री. बागुल यांची सरपंचपदाची मागणी रास्त नाही. मुळात त्यांनी तशी मागणीच करू नये. गावाला सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे. आपण राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते असून राष्ट्रवादीच्या तिकिटावर मातोश्री इंदूबाई खैरनार यांना जिल्हा परिषदेत तर सुनीता बच्छाव यांना पंचायत समितीत निवडून आणले आहे. दौलत जाधव व राजेश बागुल यांचे राष्ट्रवादीत कोणतेही योगदान नसून त्यांनी आपल्यावर पक्षामार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये व षडयंत्रे, कटकारस्थाने रचणे बंद करावे. अशी भूमिका जाहीरपणे त्यांनी 'सकाळ'शी बोलताना मांडली. तर ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे यांनीही प्रमिलाबाई जाधव व मनीषा बागुल यांच्या नावाला उघडपणे विरोध करत सरपंच संजय खैरनार यांची पाठराखण केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com