शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचे दुकान फोडले

प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

सुमारे 35 हजारांचा ऐवज लंपास, निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख प्रकाश संताजी पाटील यांच्या मालकीचे खुडाणे रोडवरील सामना ट्रेडिंग कंपनी हे बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचे दुकान शनिवारी रात्री साडेआठ ते सकाळी सहादरम्यान अज्ञात चोरट्यांनी फोडले. रोख रकमेसह सुमारे पस्तीस हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. त्यात 25 हजारांच्या रोकडसह दहा हजारांच्या सीसीटीव्हीच्या संगणक डीव्हीआर हार्डडिस्कचा समावेश आहे.

काल (ता. 7) रात्री साडेआठच्या सुमारास प्रकाश पाटील हे आपली दोन्ही मुले प्रशांत पाटील व राहुल पाटील यांच्यासह सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याची व कुलुपेही लावल्याची खात्री करत दुकान बंद करून घरी गेले. परंतु आज सकाळी सहा वाजता खुडाणे रोडवर त्यांचा नातू चैतन्य पाटील हा मॉर्निंग वॉकला गेलेला असताना त्याला हा घडलेला प्रकार लक्षात आला. त्यांनतर त्याने ताबडतोब फोनवरुन आपल्या आजोबा व वडिलांना दुकानाचे शटर तोडल्याची माहिती दिली. पाटील व त्यांच्या दोन्ही मुलांनी प्रत्यक्ष येऊन खात्री केली असता त्यांना दुकानाचे शटर तोडलेले आढळले व दुकानातील काऊंटरचे लॉक तोडून फाईली व कागदपत्रे अस्ताव्यस्त करुन सुमारे 25 हजार रुपयांची रोकड लंपास केलेली आढळून आली. त्यानंतर ते सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी गेले असता संगणकाचे मॉनिटर बंदस्थितीत आढळून आले. त्यांनी सीसीटीव्ही बॉक्स चेक केले असता त्यातील डीव्हीआर हार्डडिस्कही लंपास केल्याचे आढळून आले. आजूबाजूला चौकशी केली असता काहीही माहिती मिळाली नाही. सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांनी पोलीसांसह घटनास्थळाची पाहणी केली व पंचनामा केला. त्यांनतर पोलिसांनी श्वानपथकालाही पाचारण केले. परंतु चोरट्यांचा काहीही मागमूस लागला नाही.
प्रकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निजामपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक योगेश शिरसाठ घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

Web Title: dhule news shiv sena activist shop nijampur robbery