ग्रामपंचायतीच्या रणसंग्रामात भाजप सेनेचा कस

जगन्नाथ पाटील
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

भाजप सेनेची राज्यात सत्ता आहे. केंद्रात भाजपची सत्ता आहे. गावगाड्याचे राजकारणही ताब्यात असावे. यासाठी भाजपचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. लोकनियुक्त सरपंच पदाचा निर्णय त्यांना किती फायदेशीर ठरेल हे ही निवडणूक ठरविणार आहे

धुळे : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. एकशे आठपैकी आठ पंचायतींची निवड बिनविरोध झाली आहे. शंभरसाठीचा रणसंग्राम हा सरपंच पदाच्या निवडणूकीमुळे कधी नव्हे एवढा चुरशीचा झाला आहे. मेहरगाव वगळता काँग्रेस -राष्ट्रवादीमध्ये साटेलाटे राहणार आहे. भाजप -शिवसेनेमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. याचा फायदा आघाडीला होणार आहे. मात्र पंचायतीमध्ये भाजप सेनेपेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीची ताकद सरस आहे. केंद्र आणि राज्यातील सत्तेचा भाजपाला किती फायदा होतो, हे बघणेही औत्सुक्याचे आहे. राजकीय पक्षांची चिन्हे न मिळाल्याचाही काही सरपंच पदाच्या उमेदवारांना फायदा होणार आहे. 'अंदर कि बात है, वो भी हमारे साथ है ; असे म्हणू लागले अाहेत.

भाजप सेनेची राज्यात सत्ता आहे. केंद्रात भाजपची सत्ता आहे. गावगाड्याचे राजकारणही ताब्यात असावे. यासाठी भाजपचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. लोकनियुक्त सरपंच पदाचा निर्णय त्यांना किती फायदेशीर ठरेल हे ही निवडणूक ठरविणार आहे. जिल्हा परीषदसाठीची पूर्वतयारी परीक्षाही आहे. जिल्ह्यात केंद्र आणि राज्याचे प्रत्येकी एकेक मंत्रीपद आहे. शासनाचे धोरण, निर्णय आणि मंत्रीद्वयांची कामगिरीची चाचपणीही याच्यातून होणार आहे. म्हणूनच भाजपाचे सर्वच पदाधिकारी झपाटून कामाला लागले आहेत.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी जिल्ह्यापेक्षा धुळे तालुक्यात जोरकस प्रयत्नात लागले आहेत. त्यांच्याकडे ग्रामीणचे भावी आमदार म्हणून शिवसैनिक संबोधू लागले आहेत. त्या दृष्टीने ते कामाला लागले आहेत. निदान तालुक्यातील पस्तीस ग्रामपंचायतींपैकी किती पंचायतींवर भगवा फडकवतात, याकडे जाणकारांचे लक्ष आहे. यासाठी माजी आमदार प्रा. शरद पाटील यांची मदत घेतल्यास निश्चितच बळ वाढू शकते. सध्या शिवसेनेतही अंतर्गत कुरबुरी वाढल्याचे समजते. 'अण्णाच्या मार्गदर्शनाखालीच चला. वेगळी चूल मांडू नका,' असा फतवाही मातोश्रीवरुन आल्याचे जोरदार चर्चिले जात आहे.

काँग्रेसचा जोर अधिक ?
धुळे, शिरपूर व साक्रीत काँग्रेसचा जोर अधिक आहे. त्यामुळे अधिक पंचायती त्यांच्या ताब्यात राहू शकतात. अशी स्थिती आहे. धुळे तालुक्यात पस्तीस ग्रामपंचायतींसाठी आमदार कुणाल पाटील यांना तीन्ही पक्षांचा संघर्ष मोडीत काढावा लागणार आहे. मेहरगाव येथील लढत तर माजी कृषी सभापती किरण पाटील व आमदार पाटील यांच्यातील आगामी संघर्षाची नांदी ठरणार आहे.

शिंदेंचीही सत्वपरीक्षा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे यांची वर्णी लागली आहे. संदीप बेडसे यांनी स्वतःहून ही जबाबदारी बाजूला केली आहे. अर्थात त्यांच्या मातोश्रींकडे कृषी सभापतीपदही असल्याने पहिले पद त्यागल्याची राजकिय चर्चा आहे. सध्या तरी राष्ट्रवादीचे 'बुरे दिन' सुरु आहेत. त्यातच ग्रामपंचायतीची निवडणूक आदींमुळे शिंदेची सत्वपरीक्षाच ठरणार आहे.

सरपंच पद जिंका, बहूमताचे बघून घेवू ...
 सर्वच पक्ष ग्रामपंचायतीतील बहूमतापेक्षा सरपंच पद निवडणूक जिंकण्यासाठी सरसावले आहेत. पक्ष चिन्ह नसल्याने निवडून आलेला सरपंच आपलाच असे दावे प्रतीदावेही होणार आहेत. उमेदवारही सावध पवित्रा घेत आहेत. मी तुमचाच उमेदवार म्हणत अंतर्गत गुप्तगू होत आहेत. त्यांचे कार्यकर्तेही 'अंदर कि बात है, वो भी हमारे साथ है,' असे म्हणू लागले अाहेत.
     
दरम्यान लोकनियुक्त सरपंच होण्यासाठी साम, दाम, दंड, भेद, कुटनिती आदींचा वापर खुबीने सुरु झाला आहे.

Web Title: dhule news: shiv sena bjp election