धुळ्याच्या जवान शास्त्रज्ञाला सैन्यदलाचा पुरस्कार

एल. बी. चौधरी
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

सर्वत्र बर्फ, ऑक्सिजनची कमतरता, त्यामुळे 10 पावले चालली तरी धाप लागते. क्षणोक्षणो मृत्यूला तोंड द्यावे लागते. घरी महिनोंमहिने फोन लागत नाही. एकमेकांना दोरने बांधून चालावे लागते. कोणी कच्चा बर्फावर पाय ठेवून खाली पडला तर खेचता येते. कधी मृत्यू ओढवतो. ग्लोबल वार्मिंगमुळे कुल्लु येथे बर्फच पडत नाही. तर लवकरच मनालीत बर्फ पहावयास मिळणार नाही.
- अमोल युवराज महाले, भुवैज्ञानिक, भारतीय सैन्यदल.

सोनगीर (जिल्हा धुळे): देशाच्या संरक्षणासाठी जीव धोक्यात घालून दररोज मृत्यूशी संघर्ष करीत हिमालयाच्या निर्मनुष्य व ऑक्सिजनची कमतरता असलेल्या हिमाच्छादित भागात कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय सैन्यदलातील जवानांचे बर्फ कोसळण्याच्या घटनेत प्राण जावू नये म्हणून आधीच सुचना देण्याचे कार्य 'रक्षा अनुसंधान तथा विकास संघटन रक्षा मंत्रालय न्यू दिल्ली' अंतर्गत 'हीम तथा अवधाव संस्थान' करते. या संस्थानात प्रकल्प शास्त्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या धुळ्यातील अमोल युवराज महाले (वय 24) या शास्त्रज्ञाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याला बर्फ व हिमस्खलन अध्ययन प्रतिष्ठानकडून (मनाली, हिमाचल प्रदेश) स्वातंत्र्यदिनी सेना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे धुळ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अमोलचे वडील युवराज उखा महाले सेनादलात हवालदार होते. सध्या जिल्हा सैनिक कार्यालयात कार्यरत असून, सैनिक भुवन (धुळे) येथे राहतात. अमोल ने आठवी पर्यंत राजे संभाजी सैनिक शाळा, दहावीपर्यंत जे. आर. सिटी व बीएस्सी जयहिंद महाविद्यालयात तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एमएस्सी (भुगर्भशास्त्र) केले. त्यानंतर दिल्लीला स्पर्धा परीक्षा (saptem) दिली. मनालीला मुलाखत झाली. आणि त्याची निवड सैन्यदलातील हीम तथा अवधाव संस्थान मध्ये प्रकल्प शास्त्रज्ञ म्हणून अवघ्या दहा महिन्यापूर्वी झाली. त्याच्या सोबत मुंबई व दिल्ली आयआयटीमधील 20 जण प्रकल्प शास्त्रज्ञ म्हणून काम करीत असून तो एकटाच महाराष्ट्राचा असून आयआयटी विद्यार्थी नाही. तरीही त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला एकट्याला सेना प्रशस्ती पत्रक मिळाले आहे. यासंदर्भात अमोलने त्यांच्या भयावह व अत्यंत कठीण कामाबद्दल माहिती दिली. ते नुसते ऐकूनही माणूस सुन्न होतो.

हिमालयाची उंची वाढण्याच्या कारणांचा शोध घेणे व हिमस्खलन प्रक्रियेचा अभ्यास हा त्यांचा संशोधनाचा विषय आहे. मनाली पासून शेकडो किलोमीटर हिमालयाच्या 22 हजार फूट उंचीवर प्राणवायूची कमतरता असलेल्या हिमाच्छादित भागात हिमस्खलनाचा अभ्यास केला जातो. विद्यूत चुंबकीय लहरी सोडून बर्फाचा थर तपासून कोणता थर कच्चा आहे याची माहिती जाते. रॅमसंग रॉडने तसेच स्कीइंग करून बर्फ कच्चा आहे की काय तसेच हवामानशास्त्रानुसार हवेची दिशा, आर्द्रता, तापमान, ढगाचा प्रकार याचा अभ्यास केला जातो. बर्फावरील दाब, ताण व विकनेसचा अभ्यास स्नो लेअर स्टॅटीग्राफीने केला जातो. अमोल स्नो फिजिक्समध्ये तरबेज झाले आहेत. या सर्व अभ्यासावरून लेह, लद्दाख व सियाचिन भागात बर्फात राहतांना सुरक्षित मार्गाची (सेफ झोन मार्क) आखणी केली जाते. त्याच मार्गाने सैनिकांना ये जा करण्यास सांगितले जाते.

मनाली ते लेह दरम्यान हिमस्खलनाचा अभ्यास करुन त्यांनी अनेक नवीन बाबी उघडकीस आणल्या. व अधिक सुरक्षितता मिळेल असे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना आर्मी कमांडेशन पुरस्कार मिळाला. त्यांचा सत्कार करण्यात आला. व त्यांची भारतीय भुविज्ञान सर्वेक्षण मध्ये प्रशिक्षणार्थी भुवैज्ञानिक म्हणून निवड होऊन त्यांचा हिमनदी प्रशिक्षण कार्यक्रमात समावेश करण्यात आला. या प्रशिक्षणात देशातील केवळ 20 जणांची निवड झाली असून अमोल महाले महाराष्ट्रातील एकमेव आहेत. हिमनदीचा उगम, पाण्याचा घर्षणामुळे पात्र मागे सरकणे, पाण्याचा वेग तसेच बर्फात चालणे व जीव कसा वाचवावा याचे मार्गदर्शन प्रशिक्षणात मिळणार आहे. अमोलला हिम तथा अवधाव संस्थानचे डायरेक्टर डॉ. आशुतोष गांजू, भुवैज्ञानिक डॉ. सत्यप्रकाश शुक्ल, कर्नल एस. एच. मान. कर्नल दिनेश दिक्षीत यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: dhule news soldier amol mahale scientist award received