धुळे: सोनगीरला 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बसस्थानक होणार

एल. बी. चौधरी
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

सोनगीर हे 25 हजार लोकवस्तीचे असून मुंबई- आग्रा महामार्ग क्रमांक तीन व सोनगीर -अंकलेश्वर राज्यमार्ग क्रमांक 19 वर वसलेले आहे. परिसरात 30 ते 40 खेडी असून त्यांचा येथे दैनंदिन संपर्क असतो. शिवाय शेकडो विद्यार्थी व ग्रामस्थ धुळ्याला ये - जा करतात. त्यामुळे येथील बसथांबावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. बसथांबावर खासगी वाहने, कालीपिली, खाद्यपदार्थ विक्रेतेही गर्दी करतात.

सोनगीर (जि. धुळे) : येथे गेल्या चाळीस वर्षापासून अद्ययावत बसस्थानकाची होत असलेली मागणी व त्या अनुषंगाने ग्रामस्थांनी विकासाचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्ष  साकार होण्याची चिन्हे दिसत आहेत. आज (ता.2) महामंडळाच्या अधिकारींनी नियोजित जागेची पाहणी केली व सुसज्ज बसस्थानक बांधायला काही काळ लागणार असला तरी नियोजित जागी बस थांबायला लागेल. दिवाळीपर्यंत बसस्थानक सुरू होईल असे सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. आमदार कुणाल पाटील यांनी बसस्थानकाचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते.  

सोनगीर हे 25 हजार लोकवस्तीचे असून मुंबई- आग्रा महामार्ग क्रमांक तीन व सोनगीर -अंकलेश्वर राज्यमार्ग क्रमांक 19 वर वसलेले आहे. परिसरात 30 ते 40 खेडी असून त्यांचा येथे दैनंदिन संपर्क असतो. शिवाय शेकडो विद्यार्थी व ग्रामस्थ धुळ्याला ये - जा करतात. त्यामुळे येथील बसथांबावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. बसथांबावर खासगी वाहने, कालीपिली, खाद्यपदार्थ विक्रेतेही गर्दी करतात. त्यामुळे अन्य वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. येथे बसस्थानकासाठी ग्रामपंचायतीने 35 वर्षापासून पोलिस ठाण्यासमोर पाच एकर जागा आरक्षित केली आहे. येथे महामार्गावर गावालगत धुळे व शिरपूर जाण्यासाठी वेगवेगळे दोन तसेच फाट्यावर नंदूरबार, धुळे व शिरपूर जाण्यासाठी वेगवेगळे तीन थांबे आहेत. त्यामुळे गैरसोय होते. सर्व बस एकाच ठिकाणी थांबतील असे अद्ययावत बसस्थानक व्हावे अशी मागणी आहे.आतापर्यंत आमदार, खासदार, मंत्री, परिवहन मंडळाचे अध्यक्ष यांना हजारो निवेदन दिली. सर्व पक्षीय आंदोलन झाले. 1993 मध्ये संघर्ष समिती स्थापन झाली होती समितीने दहा हजार सह्यांचे निवेदन तत्कालीन अध्यक्ष पी.के.पाटील यांना दिले होते. गावविकासासाठी बसस्थानकाची गरज आहे.  सरपंच योगिता महाजन, पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन, उपसरपंच धनंजय कासार व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी निवेदन देऊन पाठपुरावा सुरू ठेवला.

आमदार कुणाल पाटील यांनी बसस्थानक होईल असे आश्वासन दिले. तसा प्रस्ताव देखील सादर करण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर धुळे आगाराचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, विभागीय अभियंता एम. एस. बाविस्कर, दुय्यम अभियंता एस. आर. सोनवणे यांनी ग्रामपंचायतीने दिलेल्या जागेची पाहणी केली. व समाधान व्यक्त केले. ही जागा एसटी महामंडळाकडे वर्ग करण्यात येईल. त्यानंतर धुळे, शिरपूर, नंदूरबार कडे जाणाऱ्या सर्व साधी, जलद, अतिजलद गाड्यांना येथे थांबा दिला जाईल. आमदार कुणाल पाटील यांच्या आमदार निधी तसेच अन्य शासकीय निधीच्या उपलब्धतेनुसार 10 बस एकाचवेळी थांबतील तसेच दोन कार्यालय व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. उद्यापासूनच आराखडा व अन्य कागदपत्रे तयार केले जातील असे श्री. देवरे यांनी सांगितले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन, उपसरपंच धनंजय कासार, तंटामुक्तीचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, ग्रामपंचायत सदस्य विशाल मोरे, प्रेमल पाटील, गुड्डू सोनार, माजी उपसरपंच प्रकाश गुजर, चुडामण पाटील, कैलास लोहार, विशाल भारती आदी उपस्थित होते.

Web Title: Dhule news ST bus stand in Songir