कॅन्सरला हरवून 'तेजस' नव्या 'लढाई'वर

Tejas Potdar
Tejas Potdar

कासारे : येथील खानदेश गांधी बाळूभाई मेहता विद्यालयाचा दहावीतील विद्यार्थी तेजस पोतदार "वर्ल्ड चिल्ड्रन्स विनर्स गेम इन मॉस्को' या स्पर्धेत रशियात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रवाना झाला. ही जागतिकस्तरावरील स्पर्धा बुधवारपासून (ता. 31) सुरू होत आहे.

कॅन्सरसारख्या आजाराने ग्रासलेल्या भल्याभल्यांचे धाबे दणाणते. शरीर व मनाने बलदंड व्यक्तीही केवळ कॅन्सर आजाराला घाबरून अर्धा संपतो आणि त्या धसक्‍यातच जीवही गमावतो, असे असताना कासारे (ता. साक्री, जि. धुळे) येथील खानदेश गांधी बाळूभाई मेहता विद्यालयाचा दहावीचा विद्यार्थी तथा कलाशिक्षक भालचंद्र पोतदार यांचा मुलगा तेजस पोतदार कॅन्सरसारख्या आजाराने लहानपणापासून ग्रासला. शिक्षक भालचंद्र पोतदार यांनी हार न मानता मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये हेलपाटे घालून मुलाला आजारातून बरे केले.

देशभरातून 15 मुलांची निवड 
कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून वाचलेली 20 मुलांचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी त्यांना क्रीडा स्पर्धेत उतरवणे अधिक लाभदायक राहील, यादृष्टीने मुंबईत स्पर्धा घेतल्या गेल्या. 7 ते 15 वर्षे वयाच्या 20 मुलांपैकी 15 मुलांची निवड झाली व त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जात होते. तेच भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यात तेजस पोतदारही सहभागी आहे. 

31 मेस मॉस्कोत स्पर्धा 
जागतिकस्तरावर 31 मेस होणाऱ्या ऑलिम्पिकशी संबंधित खेळात कॅन्सरसारख्या आजारातून वाचलेली मुले "वर्ल्ड चिल्ड्रन्स विनर्स गेम्स' मॉस्को (रशिया) येथील स्पर्धेत सहभागी होत आहेत. दहा मुले मुंबईतील (महाराष्ट्र) असून, अन्य वेगवेगळ्या राज्यांतील आहेत. ही सर्व मुले कॅन्सर उपचारासाठी टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये होते. ही स्पर्धा "गिफ्ट ऑफ लाइफ फाउंडेशन'तर्फे घेतली जाते. तीत सुमारे 20 देशांतील कॅन्सरमधून वाचलेली मुले सहभागी होत आहेत. 

आत्मविश्‍वास वाढीसाठी प्रोत्साहन 
कॅन्सरच्या उपचारादरम्यान रेडिएशन, किमोथेरेपी आणि बोन मॅंरो ट्रान्सप्लांट यासारख्या जीवघेण्या उपचारांमुळे कॅन्सरग्रस्त मुलांचा आत्मविश्वास संपलेला असतो. त्यांना प्रोत्साहनासाठी समाजसेविका अमिता भाटिया यांनी खेळातून प्रोत्साहन मिळावे, यासाठी स्पर्धेत या मुलांना सहभागी केले आहे. त्यात बुद्धिबळ, धावणे, रायफल शूटिंग, टेनिस, फुटबॉल आणि स्वीमिंग या खेळांचा सहभाग आहे. तेजस भारतासाठी "पदक' मिळवून आणणेच, असे त्याचे प्रशिक्षक पाटील व कपिल बागूल यांना विश्वास आहे. कासारे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रमाकांत देसले, प्राचार्य राजेंद्र देसले व शिक्षकांनी तेजसला शुभेच्छा दिल्या. तेजसने ही स्पर्धा जिंकली, तर कासारेचे नाव सातासमुद्रापार जाईल, असे श्री. देसले म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com