चिमुरडीच्या साक्षीने आई-वडील बोहल्यावर

wedding
wedding

निजामपूर-जैताणे (धुळे) - समाजात एका बाजूला जातीपातीच्या भिंती घट्ट होत असताना छगन सदाशिव माळी यांचा एकुलता मुलगा अशोक (वय-२५) आणि चंद्रकांत मधुकर पवार (सोनार) यांची मुलगी माधुरी (वय-२०) यांचा परिवर्तनवादी आंतरजातीय विवाह शुक्रवारी पार पडला. दुपारी वैदिक पद्धतीने भामेर शिवारातील गोकुळमाता देवस्थानात हा सोहळा पार पडला. विशेष म्हणजे अशोक आणि माधुरी यांच्या विवाहाची त्यांची तीन महिन्यांची कन्या अनन्याही साक्षीदार बनली.

माळी समाजाचा वर अशोक हा पाच बहिणींचा एकुलता भाऊ आहे. त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तो सुरतला हिरेउद्योग-व्यवसायात कामाला आहे. तर वधु माधुरी ही सोनार समाजाची असून, तिचे नववीपर्यंत शिक्षण झाले आहे. दोघांचे सुरतमध्येच प्रेमसंबंध जुळले. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी त्यांची प्रेमकथा आहे. सुरुवातीस कौटुंबिक व सामाजिक विरोधास दोघांनाही सामोरे जावे लागले. दोघांच्या आईवडिलांची इच्छा असूनही केवळ सामाजिक दबावापोटी ते विवाहास परवानगी देत नव्हते. शेवटी कौटुंबिक व सामाजिक दबाव झुगारून अशोक व माधुरीने बंडखोरी करत वर्षभरापूर्वी सुरत येथेच एकमेकांच्या मर्जीने प्रेमविवाह केला. तेथेच वेगळी खोली घेऊन दोघेही एकत्र राहू लागले.

परंतु काही दिवसांनी कौटुंबिक विरोध निवळला. अशोकच्या आई-वडिलांनी माधुरीचा सून म्हणून स्वीकार केला. त्यांना घरी बोलावून सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र राहू लागले.  दरम्यानच्या काळात अशोक-माधुरीला कन्या झाली. त्यांनी तिचे नाव 'अनन्या' ठेवले. एकुलत्या मुलाच्या अंगाला हळद लागावी व समाजासमोर त्याचा वैदिक पद्धतीने विवाह व्हावा असे अशोकच्या कुटुंबियांचे मत होते. त्यानुसार आज भामेर (ता.साक्री) शिवारातील अशोक आणि माधुरीचा मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत वैदिक पध्दतीने विवाह झाला.

वधु-वरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार...
यावेळी वधु-वरांचा खुडाणेच्या सरपंच कल्पनाबाई गवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते पराग माळी, महेश माळी, पंडित वाघ, बापूजी जगदाळे, बापू जाधव, रवींद्र जाधव, गणेश महाजन, राकेश पवार, वैजयंताबाई माळी, कमलबाई पवार, उषाबाई वाघ आदींसह मोजके नातेवाईक व मित्रपरिवार यावेळी उपस्थित होता.

आंतरजातीय विवाहांना सामाजिक स्वीकृतीची गरज..
"समाजात आंतरजातीय विवाह होत असताना रूढी-परंपरांना चिकटलेल्या समाजातून त्याला प्रखर विरोधही होतो. सामाजिक बंधनांना झुगारून असे विवाह केले तरी संबंधितांना दैनंदिन जीवन जगताना अनेक अडचणी येतात. जातपंचायतीमार्फत त्यांना वाळीत टाकण्यासारखे बेकायदेशीर प्रकारही घडतात. तसे न होता आंतरजातीय विवाहांचा कुटुंब व समाजाने स्वीकार करावा." अशी प्रतिक्रिया सुरत येथील सामाजिक कार्यकर्ते पंडित राजाराम वाघ यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com