धुळे: पाणीटंचाई दूर करण्यासाठी डोंगरगाव धरणाजवळ विहीर

एल. बी. चौधरी
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

ग्रामपंचायतीत आमदार कुणाल पाटील यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित केलेल्या बैठकीत सोनवद धरणाजवळ विहीर खोदायचे ठरले होते. बैठकीस  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाधरन, गटविकास अधिकारी सी. के. माळी, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता एस. बी. पड्यार होते.

सोनगीर (जि. धुळे) : येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तापी नदीतून जलवाहिनीद्वारे येथे पाणी मिळण्याची योजना कार्यान्वित होण्यासाठी बराच वेळ जाणार असून आजच पाणी टंचाई जाणवत असल्याने तात्पुरती व्यवस्था म्हणून डोंगरगाव (ता. शिंदखेडा) येथील सोनवद धरणाजवळ विहीर खोदून तेथून जलवाहिनीद्वारे गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी आज (ता. 1) दापुरा शिवारात भूमीपूजन करण्यात आले. 

येथील ग्रामपंचायतीत आमदार कुणाल पाटील यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित केलेल्या बैठकीत सोनवद धरणाजवळ विहीर खोदायचे ठरले होते. बैठकीस  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाधरन, गटविकास अधिकारी सी. के. माळी, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता एस. बी. पड्यार होते. त्यानुसार आज पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन यांचे हस्ते भूमीपूजन झाले. यावेळी भूजल तज्ज्ञ सुजीत शिंपी, पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाचे राहूल सैंदाणे, उपसरपंच धनंजय कासार, माजी उपसरपंच प्रकाश गुजर व सर्व ग्रामपंचायत सदस्य हजर होते. सोनवद धरणालगत प्रत्येकी 20 फूट लांबी व रुंदी तसेच सुमारे 50 फूट खोल अशी विहीर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत खोदली जाणार असून सहा लाख रुपये खर्च लागेल. जलवाहिनीसाठी सुमारे 15 ते 20 लाख रुपये खर्च लागेल म्हणून वेगवेगळ्या योजनेतून जलवाहिनी टाकण्यात येईल.  येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तापी नदीतून जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा व्यवस्था करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.

त्यासाठी मोठय़ा खर्चासह वेळही लागणार आहे.  त्यासाठी विशेष प्रयत्न  सुरू आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र आजच पाणीप्रश्न तीव्र असल्याने तातडीचा पण तात्पुरता उपाय म्हणून सोनवद धरणाजवळ विहीर खोदून पाणी येथील सार्वजनिक विहीरीत टाकणे या पर्यायावर काम सुरू करण्यात आले. मात्र सोनवद धरण हा पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत नाही. म्हणून तापी नदीतून येथे पाणी पुरवठा करणारी योजना होणे गरजेचे आहे. सध्यातरी आजची पाणीटंचाई दूर होत असल्याने ग्रामस्थांत समाधान व्यक्त केले जात आहे.

Web Title: Dhule news well near Dongargaon dam