मधुमेही डॉ. शिंदेवर ग्लुकोजचा मारा 

मधुमेही डॉ. शिंदेवर ग्लुकोजचा मारा 

नाशिक - स्त्रीभ्रूणहत्येसारख्या सामाजिक अपराधातील आरोपी डॉ. बळिराम निंबा शिंदे याचा तुरुंगात मृत्यू होण्यापूर्वी त्याच्यावर तब्बल तीन तास कोणी व कोणते उपचार केले, हा सखोल चौकशीचा भाग असताना, कारागृह प्रशासनाने नंतरच्या दोन महिन्यांमध्ये केलेली सारवासारव, असे मृत्यू एखाद्या मोठ्या षड्‌यंत्राचा भाग तर नाहीत ना, अशी शंका उपस्थित होते. याबाबत औरंगाबादचे कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांची भूमिका महत्त्वाची होती, असे बोलले जाते. डॉ. बळिराम शिंदे याला तीव्र मधुमेह होता. सूत्रांच्या मते, डॉ. ससाणे हे कनिष्ठ असल्याने प्रत्यक्षात डॉ. सुदाम मुंडे हाच उपचार करीत होता. तीव्र मधुमेह असल्याने ग्लुकोज देऊ नका, असे डॉ. शिंदे कळवळून सांगत असतानाही त्याला एकाहून अधिक ग्लुकोज सलाइनद्वारे देण्यात आले. 

ई-मेलमुळे भंडाफोड 
अयूब अलिमुद्दीन शेख नावाचा मुंबईतील कैदी त्या वेळी दोन वर्षांपासून नाशिक रोड कारागृहात होता. त्यालाही हृदयविकाराचा झटका आला होता. नाशिकच्या सामान्य रुग्णालयात अँजिओग्राफीची सुविधा उपलब्ध नसल्याने अयूब शेखला तपासणीसाठी मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये पाठवा, असे 27 फेब्रुवारीला कळविण्यात आले होते. त्यासाठी अयूबची पत्नी सारा शेख तुरुंगाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीत असतानाच तीन मार्चच्या पहाटे डॉ. शिंदे याचा मृत्यू झाला. त्याबाबत 18 मार्चला अयूबने प्रत्यक्ष भेटीत दिलेल्या माहितीच्या आधारे डॉ. शिंदे याचा मधुमेह व ग्लुकोज सलाइन, तडफडून मृत्यू हा सगळा उल्लेख सारा शेख यांनी 21 मार्चला नाशिक रोड कारागृह अधीक्षकांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये आहे. 

मुंडेला व्हीआयपी ट्रिटमेंट 
हा सगळा संशय वेळीच व्यक्‍त झाल्यानंतरही पुढच्या दोन महिन्यांमध्ये राज्याच्या तुरुंग प्रशासनाने संपूर्ण प्रकरण दडपून टाकले. कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांची 21 मार्चला तडकाफडकी अमरावतीला बदली झाली. डॉ. सुदाम मुंडे यास देण्यात आलेल्या व्हीआयपी सुविधांचा भंडाफोड होऊ नये, तसेच डॉ. शिंदे मृत्यू प्रकरणातील त्याचा कथित सहभाग उजेडात येऊ नये म्हणून 5 मे 2017 ला त्याला औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात हलविण्यात आले. तशीही बीडवरून नाशिकच्या कारागृहात हलविल्यापासूनच डॉ. मुंडेला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात होती. मोबाईलद्वारे बाहेरच्या जगाशी मुक्‍त संवाद व अन्य सुविधा मिळविल्या होत्या. एम. डी. असलेल्या डॉ. मुंडेचा कारागृह दवाखान्यात दबदबा होता. औरंगाबाद व नाशिकचे अधिकारी त्याने खिशात टाकले होते. तरीही डॉ. मुंडे याने मुठीत घेतलेल्या प्रशासनाचे गुप्त अहवाल बाजूला ठेवून दरवेळी बीडमधील खटल्याच्या सुनावणीवेळी नाशिक पोलिसांकडून पुरेसा बंदोबस्त उपलब्ध होत नसल्याचे कारण त्याला औरंगाबादला हलविण्यासाठी दाखविले गेले. 

कारवाईनंतर पोलिसांत हजर 
परळी (जि. बीड) येथील डॉ. सुदाम व डॉ. सरस्वती मुंडे यांच्या खासगी रुग्णालयात 18 मे 2012 ला भोपा (ता. धारूर) येथील विजयमाला पटेकर या सहा महिन्यांच्या ऊसतोड मजूर गर्भवतीचा गर्भपातावेळी मृत्यू झाला होता. त्यानंतर उजेडात आलेल्या गर्भलिंगनिदान प्रकरणाने संपूर्ण देश हादरला. स्त्रीरोगतज्ज्ञ दांपत्य राजरोस बेकायदा गर्भलिंगनिदान व स्त्रीभ्रूणहत्या करायचे व पाडलेले गर्भ कुत्र्यांना खाऊ घालायचे, असा आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघे पती-पत्नी महिनाभर फरारी होते. महसूल खात्याने त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर, मुलगा पापा मुंडे याचे बॅंक खाते गोठविल्यानंतर तो 17 जून 2012 ला पोलिसांत हजर झाला. 

तीनपैकी दोन खटल्यांत शिक्षा 
डॉ. सरस्वती व डॉ. सुदाम मुंडे दांपत्याविरुद्ध तीन खटले दाखल होते. त्यांपैकी दोन खटल्यांचा निकाल लागला असून, दोघेही चार वर्षांसाठी कारागृहात आहेत. "लेक लाडकी' अभियानाच्या ऍड. वर्षा देशपांडे व ऍड. शैलजा जाधव यांनी सातारा येथील गर्भवतीला बनावट रुग्ण म्हणून 19 सप्टेंबर 2010 ला मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये पाठवून "स्टिंग ऑपरेशन' केले. त्या खटल्याचा निकाल 15 जून 2015 ला लागला. परळीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एल. जी. पाच्छे यांनी दोघांना वेगवेगळ्या सहा कलमांखाली प्रत्येकी सहा महिने, म्हणजे एकूण 48 महिने कारावास व 80 हजार रुपये दंड सुनावला. रुग्णालयाशी संबंधित कागदपत्रांमधील अनियमिततेच्या अन्य खटल्यातही या दांपत्याला प्रत्येकी सहा महिन्यांची शिक्षा झाली आहे. राज्य, तसेच देशभर गाजलेल्या 2012 मधील विजयमाला पटेकर मृत्यू प्रकरणाचा निकाल मात्र अजून लागायचा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com