भुजबळांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीत अध्यक्ष निवडीवरून एल्गार!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

राष्ट्रवादीत अध्यक्ष निवडीची ही बैठक अनधिकृत असून बैठकीमध्ये क्रियाशिल सभासदांना विश्‍वासात न घेता केवळ पाच ते सहा पदाधिकार्‍यांमध्ये ही बैठक पार पडल्याचा आरोप केला आहे.

येवला - एकवेळ भुजबळ म्हणतील तो शब्द प्रमाण असणाऱ्या येथील राष्ट्रवादीत मात्र भुजबळांच्या अनुपस्थितीत पदाधिकारी निवडीवरून कलगीतुरा रंगू लागला आहे. तालुकाध्यक्षपदी साहेबराव मढवई तर शहराध्यक्ष पदावर दीपक लोणारी यांची फेरनिवड करण्यात आल्याने सक्रीय पदाधिकाऱ्यांनी या निवडीला जोरदार आक्षेप घेतला आहे. ही निवड अनधिकृत असल्याने तत्काळ स्थगिती मिळावी अशी मागणी मुख्य पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

भुजबळ येथे आल्यानंतर २००७ पासून तालुकाध्यक्षपदी मढवई तर २०१० पासून लोणारी यांची या पदावर वर्णी लावण्यात आली आहे.मध्यतरी निवडी झाल्या तेव्हा अनेक जन इच्छुक असतांना भुजबळांच्या सुचनेनुसार यांनाच पुन्हा संधी देण्यात आली होती. त्यावेळी इच्छुकांनी नाईलाजाने आपला आवाज दाबून ठेवला होता. मात्र यावेळी अपेक्षा असतांना अचानक निवडी पार पडल्याने व पुन्हा त्याच त्या पदाधिकार्यांना संधी दिल्याने पक्षातूनच रोष व्यक्त केला जाऊ लागला आहे. येथील भुजबळ संपर्क कार्यालयात पक्ष निरीक्षक राजेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडीसाठी झालेल्या बैठकीत या निवडी झाल्या.

मात्र, ही बैठक अनधिकृत असून बैठकीमध्ये क्रियाशिल सभासदांना विश्‍वासात न घेता केवळ पाच ते सहा पदाधिकार्‍यांमध्ये ही बैठक पार पडल्याचा आरोप केला आहे. आज शनिवारी पक्षाचे पदाधिकारी विष्णूपंत कर्‍हेकर, हुसेन शेख, ज्ञानेश्‍वर शेवाळे, विजु खोकले, संजय परदेशी, प्रवीण पहिलवान, भुषण लाघवे, संपत बोरणारे, अकबर शहा, किशोर सोनवणे, राजेश भांडगे, दत्ता निकम, सचिन सोनवणे, रावसाहेब आहेर, भानुदास वाघचौरे, वसंत घनघाव आदींनी या फेरनिवडीला जोरदार विरोध करून एल्गार पुकारला आहे.

राष्ट्रवादीचे सुमारे २०० क्रियाशिल सभासद असतांना देखील केवळ ५ ते ६ सभासद एकत्र येवून येथील संपर्क कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीत मागील १० वर्षापासून शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष असलेल्यांचीच फरेनिवड करण्यात आली. सदर प्रक्रीयेत कुठल्याही क्रियाशिल सभासदांना बैठकीची माहिती न देता सदर बैठक अत्यंत गोपनिय पद्धतीने उरकण्यात आली. विशेष म्हणजे शहराध्यक्षांच्या निवडीत शहरातील एकही क्रियाशील सभासद उपस्थित नव्हता. या निवडीला शहरातील क्रियाशील सभादांनी तीव्र विरोध दर्शवला असून याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दखल घेवून सर्व क्रियाशील सभासदांना विश्‍वासात घेवून नव्याने बैठक बोलवावी व या अनधिकृत निवडीला स्थगिती मिळावी, अन्यथाउपोषण करण्यात असा इशाराही एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.

'पक्षाच्या सूचनेनुसार येथील पदाधिकारी निवडीची प्रकिया पार पडली. याबाबत येथील पक्ष नेते आमदार छगन भुजबळ साहेब यांना कळविण्यात आले होते. याबाबत त्यांनी सध्या आहे तेच पदाधिकारी त्या पदांवर कायम ठेवण्याच्या सूचना दिल्याने या फेरनिवडी करण्यात आल्या आहेत.'
- बाळासाहेब लोखंडे, स्वीय सहायक, भुजबळ संपर्क कार्यालय, येवला

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: differences on presidential election of NCP