डिजिटल जीवनशैलीबाबत तरुणाईच्या सजगतेची अनुभूती 

डिजिटल जीवनशैलीबाबत तरुणाईच्या सजगतेची अनुभूती 

नाशिक - माणूस पैशांभोवती नव्हे, तर पैसा माणसांभोवती फिरावा, असा संदेश देणाऱ्या डिजीधन मेळ्याला डिजिटल लाइफस्टाइलबाबत जागरूक असलेल्या तरुणाईने आज उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे नाशिकची तरुणाई नावीन्यपूर्ण कॅशलेस सुविधांबाबत किती सजग आहे, याचाही प्रत्यय यातून आला. "कॅशलेसबाबत सजग करणारा आगळावेगळा उपक्रम' अशा शब्दांत तरुण-तरुणींनी आपल्या भावना "सकाळ'शी बोलताना व्यक्त केल्या. 

बॅंकेत खाते उघडण्यापासून केंद्राच्या कॅशलेस योजनांपर्यंत आणि बॅंकांच्या ऍप्लिकेशनपासून तर कॅशविरहित कामकाजापर्यंत सर्वच प्रकारची माहिती प्रदर्शनात उपलब्ध होती. ठक्कर डोम मैदानावरील "वायफाय फ्री' झोनमधील या अनोख्या उपक्रमात शहरातील नामांकित शिक्षण संस्थांमधील तरुण-तरुणींनी गर्दी करीत डिजिटल व कॅशलेस कामकाजाच्या दिशेने सुरू झालेल्या प्रवासाची आवश्‍यकता दर्शवली. अनेक महाविद्यालयांनी खास वाहनांची सोय करून विद्यार्थ्यांना प्रदर्शनास उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध करून दिली. 60 स्टॉलवर राष्ट्रीयीकृत बॅंकांपासून दैनंदिन वापराच्या वस्तू, खाद्यपदार्थ, कृषी निविष्ठांपर्यंत कॅशलेस व्यवहारासाठीचे स्टॉलही होते. 

चर्चासत्र अन्‌ यशोगाथा 
प्रदर्शनात एका बाजूला ग्राहकांच्या सोयीसाठी चर्चासत्रातून कॅशलेस कामकाजाची माहिती देण्याची सोय होती. त्यात कॅशलेस संकल्पनेपासून निती आयोगाच्या धोरणांपर्यंत आणि धोरणांच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीयीकृत बॅंका, वित्तीय सेवा देणाऱ्या संगणकीय संस्थांनी बाजारात आणलेल्या विविध ऍप्लिकेशनपर्यंत सर्वच माहिती दिली जात होती. देशातील आणि जिल्ह्यातील "डिजीग्राम' यशोगाथांचे सादरीकरणही सुरू होते. गावातील अर्थव्यवस्था कॅशलेस पद्धतीने कशी चालते, याची काही उदाहरणे सादरीकरणातून मांडली जात होती. 

स्टॉलवर गर्दी 
दुसऱ्या बाजूला राष्ट्रीयीकृत बॅंका, मोबाईल कंपन्यांसह अनेक वित्तसंस्थांचे स्टॉल होते. त्यात राष्ट्रीयीकृत बॅंकेत खाते उघडण्यापासून तर जागेवरच रोख रक्कम उपलब्ध करून देण्यापर्यंतच्या सेवा होत्या. अनेकांनी एटीएम कार्ड, आधारकार्डाच्या आधारे आपल्या खात्यातील रोख रकमा काढल्या. बॅंकांनी गुंतवणूक योजना, विविध हप्ते थेट खात्यात कसे जमा करावेत, याचे सादरीकरण केले. जिओ, भारती एअरटेल, आयडिया, बीएसएनएल आदी मोबाईल कंपन्यांनी त्यांच्या इंटरनेट प्लॅनसह कॅशलेस योजनांचे विविध ऍप्लिकेशन डाउनलोड कसे करावेत, याची माहिती देण्याची सोय येथे उपलब्ध करून दिली होती. कृषी निविष्ठा, खाद्यपदार्थ यांची खरेदी-विक्री विना रोकड कशी होऊ शकते, याची माहिती देण्यासाठी खाद्यपदार्थ आणि दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंच्या स्टॉलवरही कॅशलेस कामकाज दाखविले जात होते. 

एटीएम कार्डचे वाटप 
बॅंकेत खाते उघडलेल्यांना एटीएम कार्ड वाटप करण्याची सुविधाही या मेळाव्यात होती. स्टेट बॅंकेने दीड हजाराहून अधिक ग्राहकांना प्रदर्शनात एटीएम कार्ड, पासबुक वितरणाची सोय केली होती. स्टेट बॅंकेचे जिल्हा समन्वयक पी. एस. डोंगरवार यांनी सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. स्टेट बॅंकेच्या विविध ऍप्लिकेशनला उदंड प्रतिसाद मिळाला असून, अनेकांनी जागेवर रोख रकमा काढल्याचेही त्यांनी सांगितले. 

फ्री वायफाय 
भारती एअरटेलच्या नयन बोरसे यांनी सांगितले, की प्रदर्शनात सहभागी होणाऱ्यांना भारती एअरटेलतर्फे फ्री वायफाय सेवा दिली होती. त्याला तरुणाईने चांगला प्रतिसाद दिला. भारती एअरटेलच्या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद हा कंपनीचे खास तंत्रज्ञान सर्वांना आवडलेल्याचेच द्योतक असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

सेल्फीचा आनंद 
भारतीय चलनाचा आतापर्यंतचा इतिहास दर्शविणारे नाणेसंग्रहालयाचे प्रदर्शन, हेही या प्रदर्शनातील एक आकर्षण होते. दुर्मिळ नाण्यांबरोबर सेल्फी घेण्याचा आनंद अनेकांनी या प्रदर्शनात लुटला. 

कॅशलेसबाबत उत्सुकता आहे. आम्ही कामकाज करतो; पण एका छताखाली सर्व प्रकारच्या ऍप्लिकेशनची माहिती मिळाल्याने कॅशलेसशी संबंधित कामकाजासाठी कुठले ऍप सोयीचे, कुठले गैरसोयीचे हे समजण्यास मदत झाली. कॅशलेसची गरज वाढत असल्याने हे प्रदर्शन माहिती देणारे होते. 
- हर्षदा बेझेकर 
 

अतिशय नेटके असे प्रदर्शन आहे. कॅशलेस कामकाजात आपण वेळेची कशी बचत करू शकतो, हे शिकविणारे प्रदर्शन म्हणून या उपक्रमाचे स्वागत केले पाहिजे. घरबसल्या ऑनलाइन बॅंकिंगद्वारे कामकाज कसे करता येईल, याची बरीच माहिती मिळाली. 
- मेघा पाटील 
 

वाणिज्य शाखेचा विद्यार्थी असूनही अनेक बॅंकिंग ऍप्लिकेशनची माहिती असतेच, असे नाही. प्रदर्शनाच्या निमित्ताने एका छताखाली सर्व प्रकारच्या बॅंकांच्या सोयी-सुविधांची, कॅशलेस कामकाजाची माहिती मिळाली. जे भविष्यात आम्हाला कायम मदतीचे ठरणार आहे. 
- सतीश रायते 
 

शेतकरी कुटुंबातील घटकांना कॅशलेस इकॉनॉमीची माहिती करून घेण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचे प्रदर्शन आहे. रोख रकमेशिवाय काही अडत नाही. आपले कामकाज आपण करू शकतो, हे या निमित्ताने लोकांपर्यंत पोचण्यास खऱ्या अर्थाने मदत झाली. 
- निवृत्ती गांगुर्डे 
 

महाराष्ट्र बॅंकेच्या महा मोबाईल ऍप्लिकेशनबाबत तरुणांना विशेष रस दिसला. प्रीपेड, रूपे कार्डाबाबत चौकशी झाली. कॅशलेससाठी तरुणांत जास्त जागरूकता आहे. 
- आर. एम. पाटील (क्षेत्रीय प्रबंधक, महाराष्ट्र बॅंक) 

पॉइंट ऑफ सेल (स्वाइप मशिन) व आधार लिंक योजनेबाबत माहिती देण्यासाठी बॅंकेचा स्टॉल होता. आज दिवसभरात 200 रूपे कार्ड आणि दहा स्वाइप यंत्रांचे वितरण झाले. 
- दिवाकर प्रभू (उपक्षेत्रीय प्रबंधक, देना बॅंक) 

कॅशलेस गाव संकल्पना लोकांच्या पसंतीला उतरली आहे. यू मोबाईल, युनियन बॅंक, यूपीआय, एफ पासबुक, डीजी पर्स ऍप हे सगळे बॅंकांचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्यांच्या वापराबाबत स्टॉलवर माहिती दिली गेली. 
- विनायक टेंभुर्णे (क्षेत्रीय व्यवस्थापक, युनियन बॅंक ऑफ इंडिया) 

इन्स्टंट मनी टान्स्फर (आयएमटी) ऍप्लिकेशन योजनेबाबत स्टॉलवर तरुणांमध्ये उत्सुकता दिसली. व्यापाऱ्यांना आयटी रिटर्न भरण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या या ऍप्लिकेशनबाबत माहिती दिली गेली. 
- रमण पारकर (मुख्य प्रबंधक, बॅंक ऑफ इंडिया) 

सेंट यूपीआय ऍप्लिकेशनबाबत माहिती दिली. एम पासबुक, इंटरनेट बॅंकिंग, पीओएस, मोबाईल बॅंकिंग, डेबिट- क्रेडिट कार्ड अशा सर्व कामकाजाची माहिती दिली गेली. 
- एच. के. नाईक (क्षेत्रीय प्रबंधक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया) 

आधार लिंक पेमेंट सिस्टिम (एईपीएस) यंत्रणेद्वारे व्यवहाराची माहिती देण्यात आली. आधारकार्डाचा वापर करीत बॅंकिंग कामकाज कसे करायचे, याविषयी माहिती देण्यात आली. ही माहिती ग्रामीण भागातील नागरिकांना उपयुक्त ठरेल. 
- अखिलेश मिश्रा (क्षेत्रीय प्रबंधक, आयडीबीआय बॅंक) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com