जिल्ह्यात डिजिटल सातबाराची ५१ गावांमध्ये कामे अपूर्ण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

जळगाव - राज्यात संगणकीकृत सातबारा उतारा डिजिटल स्वाक्षरीने देण्याची घोषणा महसूलमंत्र्यांनी केली आहे. मात्र, ते पालकमंत्री असलेल्या जळगाव जिल्ह्यात अद्यापही ५१ गावांतील सातबारा संगणकीकरणाचे काम अपूर्ण आहे. टक्केवारीत हे काम केवळ चार टक्के कमी दिसत असले, तरी तब्बल एक ते दीड महिना ते सुरू राहील. हे काम अधिकाधिक ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदार, संबंधितांच्या सलग चार दिवसांच्या सुट्याही रद्द केल्या आहेत.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत डिजिटल सिग्नेचर असलेल्या सातबारा एक मेपासून मिळण्याची घोषणा केली होती. इतर जिल्ह्यात सातबारा उतारे कमी संख्येने असल्याने त्या जिल्ह्याचे कामे पूर्ण झाली. जळगाव जिल्ह्यात हे काम चार टक्के अपूर्ण असले, तरी सातबारा उताऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. एक उतारा डिजिटल करण्यास वीस मिनिटे ते अर्धातास लागतो. जिल्ह्यात आठ तालुक्‍यातील ५१ गावांचे सातबारा संगणकीकरणाचे काम अपूर्ण आहे. हे पूर्ण करण्यासाठी तलाठ्यांना रात्रंदिवस एक करून काम करावे लागेल. किमान काम पूर्ण होण्यासाठी तलाठी, मंडळाधिकारी, तहसीलदारांच्या शासकीय सुट्या रद्द केल्या आहेत. जिल्हा प्रशासनातर्फे सर्व काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होण्यासाठी तलाठी, तहसीलदारांचा कामांबाबत सतत आढावा घेतला जात आहे. 

अत्याधुनिक यंत्रणेचा अभाव
एकीकडे शासन सर्वच कामाबाबत ऑनलाईनचा आग्रह धरते. ऑनलाईन यंत्रणेसाठी चांगल्या स्पीडने चालणारी तांत्रिक यंत्रणा लागते. दुसरीकडे गेल्या दोन वर्षांपासून तलाठ्यांना सातबारा संगणकीकरणाचे काम करण्यास दिलेले सर्व्हर, एडिट मॉड्यूलचा स्पीड अतिशय कमी होता. तलाठ्यांनी, तलाठी संघटनांनी याबाबत शासनाकडे, महसूलमंत्र्यांकडे अनेकवेळा तक्रारी केल्या, निवेदने केली. तरीही तब्बल दीड वर्ष स्पीड असलेली यंत्रणा तलाठ्यांना दिली गेली नाही. सहा महिन्यांपासून स्पीड असलेले यंत्र मिळाले. मात्र, आता एकमेच्या आत सातबारा उतारे संगणकीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण होणे तांत्रिक दृष्ट्या अशक्‍य आहे.

आता काय होणार?
जिल्ह्यातील एरंडोल, बोदवड, भडगाव, यावल, रावेर या तालुक्‍यांतील सातबारा उताऱ्यांचे संगणकीय काम शंभर टक्के पूर्ण झाले. यामुळे तेथील नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीचा उतारा दिला जाईल. नंतर ज्या ज्या तालुक्‍याचे काम शंभर टक्के पूर्ण होईल तसतसा डिजिटल स्वाक्षरीचा उतारा नागरिकांना दिला जाणार आहे.

Web Title: digital satbara 51 village work uncompleted