डिजिटल शाळा अमेरिकेशी ‘कनेक्‍ट’! - हर्शल विभांडिक

मुंबई - वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी डिजिटल शाळेसंबंधी अहवाल देताना हर्शल विभांडिक.
मुंबई - वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी डिजिटल शाळेसंबंधी अहवाल देताना हर्शल विभांडिक.

धुळे - राज्याला दिशादर्शक ठरलेला येथील डिजिटल शाळेचा प्रकल्प आता अमेरिकेशी ‘कनेक्‍ट’ केला जात आहे. याअंतर्गत शनिवारी (ता. ५) पहिला संभाषण वर्ग सुरू होणार आहे. या प्रकल्पाची माहिती मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी (ता. ३१) दिल्यावर तेही प्रभावित झाले. त्यांच्या प्रेरणेमुळे धुळे जिल्ह्याची कीर्ती आता सातासमुद्रापार जाणार असल्याची माहिती या प्रकल्पाचे प्रेरक हर्शल विभांडिक यांनी आज दिली. 

श्री. विभांडिक म्हणाले, की जिल्हा परिषदेच्या सर्व ११०३ शाळा डिजिटल झाल्या. हा पॅटर्न आपल्या राज्यासह देशातील अनेक ठिकाणी राबविला जात आहे. 

तिथपर्यंत हा प्रकल्प सीमित राहू नये, तसेच या कार्यात मरगळ येऊ नये आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळांच्या दर्जावाढीसह ‘स्मार्ट एज्युकेशन’ची संकल्पना अमलात येण्यासाठी पुढचे पाऊल टाकले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतील भेटीत प्रकल्पाविषयी सर्वंकष माहिती घेतली. त्यांना जिल्ह्यातील डिजिटल शाळेच्या उपक्रमाची माहिती देताना दिल्लीस्थित ‘एनसीपीसीआर’ने केलेल्या ‘इम्पॅक्‍ट ॲनॅलिसिस’ अहवालाचीही माहिती दिली. प्रतही सादर केली.

लोकसहभागातून झालेल्या या प्रकल्पाविषयी पुढच्या टप्प्प्यातील माहिती जाणून घेतल्यावर मुख्यमंत्रीही आणखी प्रभावित झाले.  

दोन हजारांवर तंत्रस्नेही
जिल्ह्यात डिजिटल शाळेच्या माध्यमातून तंत्रस्नेही दोन हजारांवर शिक्षकांची फळी तयार झाली आहे. या माध्यमातून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्यात या शाळा, शिक्षक अमेरिकेशी ‘कनेक्‍ट’ केल्या जात आहेत. तेथील आणि प्रसंगी देशातील शिक्षणतज्ज्ञांचा येथील सर्व डिजिटल शाळा, शिक्षकांशी संवाद घडवून आणला जाणार आहे. यातून ग्रामीण, आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केले जाणार आहे. या उपक्रमाची सुरवात शनिवारपासून केली जात आहे. 

पूर्वतयारीवरही भर
अमेरिकेशी ‘कनेक्‍ट’ करण्यापूर्वी दिवाळीच्या सुट्ट्यांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांना इंग्लिश स्पिकिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना शाळा, गावासह विद्यार्थ्यांची ओळख कशी करून द्यावी याचे प्रशिक्षण देण्यात आले. शिरपूरनंतर शिंदखेडा, धुळे तालुक्‍यातील शिक्षकांना आपली डिजिटल शाळा अमेरिकेशी कशी ‘कनेक्‍ट’ करावी, त्यासाठीच्या तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण दिले जात आहे. ते तीन दिवसात पूर्ण होईल. या माध्यमातून जिल्हा आदर्श व उपक्रमशील म्हणून राज्यात नावारूपाला येत आहे. या प्रयत्नांचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनीही लवकरच सर्व डिजिटल शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असल्याची ग्वाही दिली, असे श्री. विभांडिक यांनी सांगितले. 

दर शनिवारी संभाषण वर्ग
अमेरिकेमधील संबंधित शिक्षणतज्ज्ञांशी, या कार्यातील तेथील नामांकित व्यक्तींशी दर शनिवारी सकाळी आठ ते नऊ या कालावधीत संवाद घडवून आणला जाईल. सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा या एकावेळी ‘कनेक्‍ट’ होतील. अर्धातास संबंधित तज्ज्ञ संवाद साधतील. नंतर निवडक पाच शिक्षक प्रत्येकी पाच मिनिटे संवाद साधून विचारांचे आदानप्रदान करतील, असेही श्री. विभांडिक यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com