दिपाली आहिरे ठरली गावातील पहिली महिला पोलिस

दीपक खैरनार
रविवार, 8 एप्रिल 2018

सर्वसामान्य कुटुंबातील दिपाली एकनाथ आहिरे यांनी पोलिस दलात भरती होऊन पंचक्रोशीतील पहिली महिला पोलिस होण्याचा बहूमान मिळविला आहे. 

अंबासन (जि. नाशिक) - 'लेक माझी...पोलिस झाली...घराचेच नाही तर गावाचे नावही मोठे केलेयं...माझ्या या लेकीनं.' गावात पहिलीच महिला पोलिस झाल्याने आई लताबाई आहिरे आपल्या लेकीला मिठी मारत आपल्या भावना व्यक्त केल्या. या भागातील अनेक तरुण सध्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. पण पोलिस दलात मुला, मुलींचा सहभाग नाही. अशा परिस्थितीत येथील सर्वसामान्य कुटुंबातील दिपाली एकनाथ आहिरे यांनी पोलिस दलात भरती होऊन पंचक्रोशीतील पहिली महिला पोलिस होण्याचा बहूमान मिळविला आहे. त्यांच्या नियुक्ती नंतर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रामतीर (ता. बागलाण) येथील शेतकरी एकनाथ आहिरे यांचे जेमतेम पाचवीपर्यंत शिक्षण झाले आहे. तर आई लताबाई यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलेयं. या दांम्पत्याला तीन मुली एक मुलगा, आपण शिक्षणापासून वंचित राहिलो. मात्र आपली पोरं शिकली पाहिजे असा ध्यास धरत. सर्वांत लहान म्हणजे दिपाली अभ्यासात अतिशय चंचल दिपालीने पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच घेतले आहे. शेतापासून तब्बल दोन किलोमीटरावर पायपीट करून शाळेत जावे लागले. दिपालीची दिनक्रमाची सुरवात पहाटे चार वाजल्यापासून होते. जनावरांच्या गोठ्यातील साफसफाई, चारापाणी देणे. नववीत असतांनाच महाराष्ट्र पोलिस होण्याचा संकल्प केला. तेव्हापासून पोलिस होण्याचे स्वप्न, तशी तयारीही सुरू केली यात शिक्षकांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. दहावीनंतर पुढील शिक्षण नामपुर येथे झाले. मात्र; आजही ग्रामीण भागात बसेसची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. अशीच काहीशी परिस्थिती रामतीर गावात आहे. या कठीण परिस्थितीतही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत शिक्षण घेतले. तालुक्यातील आर्य करिअर अकॅडमीला पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण घेतले. त्यानंतर नुकत्याच धुळे येथे झालेल्या पोलिस भरतीत दिपालीची निवड झाली. पोलिस भरतीत लेकीची निवड झाल्याचे कळताच आई लताबाई व वडिल एकनाथ यांना आनंदाश्रूंनी वाट मोकळी करून दिली. गावातच नव्हे तर पंचक्रोशीत निसंकोच व धाडसी असलेल्या पहिली महिला पोलीस दिपालीने सर्वांची मने जिकंली.

दिपालीचा जल्लोषात सत्कार 
पंचक्रोशीतील रामतीर, रातीर, सुराणे या परिसर आजही कोणी पोलिस सेवेत नव्हते. मात्र रामतीरची दिपालीने पोलिस महिला होण्याचा पहिला मान मिळविला. रामतीर गावातील राममंदिरात ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी जल्लोषात सत्कार केला. यावेळी पुढील शिक्षणासाठी ग्रामसेवक जे. टी. निकुभं यांनी जबाबदारी घेतली आहे. सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी दिपालीचा सत्कार केला. सत्कारादरम्यान पोलिस भरतीसाठी केलेली मेहनत हे सांगताना दिपालीला अश्रू अनावर झाले होते. 

'गाव परिसर अनेक पिढ्या खपल्या मात्र पंचक्रोशीत पोलिस सेवेत कोणीही जात नव्हते. मात्र दिपालीने सर्वांची मने जिकंली. पोलिस दलातील पहिलीच महिला पोलिस होण्याचा मान मिळविला आहे. मुली-मुलांनी दिपालीचा आदर्श घेणे गरजेचे आहे', असा आनंद बागलाण पंचायत समिती सदस्य कान्हू आहिरे यांनी व्यक्त केला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Dipali Aahire Become a First Lady Police in Baglaan