बंडखोरीच्या धास्तीने उमेदवारांना थेट "बी फॉर्म'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

नाशिक - महापालिकेत "हंड्रेड प्लस'साठी निष्ठावंतांकडे कानाडोळा करीत "इनकमिंग'चा धडाका उडवून देणारे भारतीय जनता पक्षाचे नेते बंडखोरी होण्याच्या शक्‍यतेने चांगले धास्तावले आहेत. कधी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नावाखाली, तर कधी प्रदेशकडे यादी पाठविल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा फंडा राबविण्यात आला. मात्र, आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरल्याने उमेदवारांना थेट "बी फॉर्म' देण्याचा फंडा राबविला जाणार आहे.

वसंत-स्मृती कार्यालयात इच्छुकांशी शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप संवाद साधत होते. त्या वेळी उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार, याची विचारणा बहुतांश जण करीत होते. श्री. सानप यांनी शहरातील दहा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या "ए फॉर्म' आणि स्वाक्षरीचा नमुना पाठवून दिल्याची माहिती दिली. स्वाक्षरीचा नमुना दिल्याने "बी फॉर्म'मुळे उमेदवारीचा गोंधळ होणार नाही, याची काळजी घेण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आमचे उमेदवार कधी जाहीर होतात, याकडे शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मनसेचे लक्ष लागले आहे, असे सांगत श्री. सानप यांनी पालकमंत्री आणि संघटनमंत्री किशोर काळकर हे नाशिकमध्ये आल्यावर उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती दिली.

कार्यालयात चर्चेवेळी उपस्थित असलेल्या एकाने अगदी सहजपणे रात्री उशिरा यादी जाहीर करून पळापळ कशाला करायला लावता, अशी प्रतिक्रिया नोंदवली. त्यावर श्री. सानप यांनी तुम्ही म्हणता तर मग उद्या (ता. 2) यादी जाहीर करूयात, असे उत्तर दिले. याच श्री. सानप यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यासाठी रविवारचा मुहूर्त जाहीर केला होता. खरे म्हणजे, उमेदवारांची यादी जाहीर करून विरोधकांना आयते "मोहरे' कशाला द्यायचे? बंडखोरीची डोकेदुखी कशाला करून घ्यायची? अशा प्रश्‍नांवर उत्तर म्हणून भाजपने उमेदवारांना थेट "बी फॉर्म' देण्याची योजना आखलेली दिसते.

प्रभाग 22 मधील उमेदवारांचा शोध
नाशिक रोडच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पोटनिवडणुकीत दोन जागा जिंकल्याने आत्मविश्‍वास बळावलेल्या भाजपच्या नेत्यांचा प्रभाग 22 मधील उमेदवारांचा शोध अद्याप संपलेला नाही. शिवसेनेच्या दिग्गज उमेदवारांच्या विरोधात नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची, यासंबंधाने चर्चा करण्यासाठी स्थानिकांना पक्षाच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. विशेषतः एका राखीव जागेसाठी पाच ते बावीसपर्यंत इच्छुक असल्याने नेत्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. मोठ्या उत्साहात आरक्षणाच्या जागेसाठी वाढलेल्या इच्छुकांची माहिती नेते देताहेत खरे. पण, अशा जागांवर बंडखोरी झाल्यास ही बाब पक्षाला कितपत परवडणारी असेल, याबद्दलची चिंता नेत्यांच्या बोलण्यातून डोकावत नाही. सर्वांना समाजसेवा करण्यासाठी निवडणूक लढवायची आहे, अशी टिप्पणी करीत नेमक्‍या याच मुद्याला बगल देण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Direct fear of rebel candidates 'Form B'