आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

जळगाव - गेल्या दोन दिवसांपासून व पुढील काही दिवस खानदेशात कडक उन्हाळा असणार आहे. उन्हाळ्यात काही घटना घडल्यास तत्काळ उपाय योजनांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. 

जळगाव - गेल्या दोन दिवसांपासून व पुढील काही दिवस खानदेशात कडक उन्हाळा असणार आहे. उन्हाळ्यात काही घटना घडल्यास तत्काळ उपाय योजनांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. 

दरम्यान, मंगळवारी पाडव्याच्या दिवशी जळगावचे तापमान 44 अंश सेल्सियस नोंदल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारीही (ता.29) तापमानाचा पारा 43 अंशांपर्यंत पोचला होता. किमान तापमानही 25 अंशांपर्यंत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून सातत्याने कमाल तापमानाचा पारा उंचावत आहे. आठ दिवसांपूर्वी चाळीशीच्या आतील कमाल तापमान चारच दिवसांत चाळीसच्या वर आणि दोन दिवसांपासून तर ते 44 अंशांपर्यंत पोचले आहे. कमाल तापमानासोबतच किमान तापमानाचा पाराही चढाच असल्याने नागरिक वाढत्या उष्म्यामुळे अक्षरश: त्रस्त झाले आहेत. 

उष्माघात टाळण्यासाठी उन्हापासून स्वतःचा बचाव करणे हाच एकमेव उपाय आहे. यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतर्फे करण्यात आली आहे. 

उष्माघातापासून सुरक्षेसाठी या दक्षता घ्या 
* दुपारी 12 ते 3 उन्हात फिरू नका 
* मद्यसेवन, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्‍स घेऊ नका त्यामुळे डिहाइड्रेशन होते. 
* मांसाहार, शिळे अन्न खाणे टाळा 
* पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका 

या गोष्टी करा 
* तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या 
* सौम्य रंगाचे, सैल, कॉटनचे कपडे वापरा 
* उन्हात डोक्‍यावर छत्री, टोपींचा वापरा करा 
* डोके, गळा, चेहऱ्यासाठी ओल्या कपड्याचा वापर करा 
* अशक्तपणा जाणवत असेल तर लागलीच डॉक्‍टरांकडे जा 
* बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट, चप्पल वापरा 
* प्रवास करताना सोबत पाणी घ्या 
* आपले घर थंड ठेवा. पडदे, झडपा, सनशेड बसवा 
* रात्री खिडक्‍या उघड्या ठेवा 
* ओआरएस, घरची लस्सी, लिंबू पाणी, ताक घ्या 
* प्राण्यांना सावलीत ठेवा. 
* फॅनचा वापर करा, थंड पाण्याने अंघोळ करा 

अजून काही दिवस जिल्ह्यात तापमान उच्चांकी राहणार आहे. यामुळे नागरिकांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. ज्याठिकाणी उष्माघाताची तीव्रता वाढल्यास मोफत हेल्पलाइन क्रमांक 1077/108 यावर संपर्क साधावा. 
- नरविरसिंह रावळ  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी. 

Web Title: Disaster management control room set up