पंकज भुजबळांच्या पीए संस्कृतीमुळे तालुक्याचा विकास खुंटल्याची चर्चा

पंकज भुजबळांच्या पीए संस्कृतीमुळे तालुक्याचा विकास खुंटल्याची चर्चा

मनमाड - आमदार पंकज भुजबळ यांनी नांदगाव तालुक्यावर लादलेल्या पीए संस्कृतीमुळे तालुक्याचा विकास खुंटला आहे. तहसील कार्यालय सोडले तर एकही नजरेत भरणारे काम झालेले नाही. भुजबळ नावाला असलेले राज्याचे वलय नांदगाव तालुक्यात कमी होताना दिसत आहे. पीएमुळे अनेक जण दुरावत चाललेले असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत भुजबळांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्याची राजकीय वर्तूळात चर्चा आहे. 

मौनी आमदार म्हणून पंकज भुजबळ यांना नांदगाव तालुक्यात ओळखले जाते. जास्त बोलायचं नाही आणि कोणाच्या वाटेलाही जायचे नाही. तालुक्याचा कारभार पीएच्या हाती सोपवून मुंबईत राहण्यातच ते धन्यता मानतात कोणत्या कामासाठी कोणता पीए आहे. आहे हे देखील मतदारांना माहीत नाही. या पीए नी मनमानी करत तालुक्याचा विकास खुंटवला आहे. राष्ट्रवादीकडील विधानसभा सोडली तर संपूर्ण तालुका शिवसेनेच्या ताब्यात आहे. 

मनमाड, नांदगाव नगर परिषद, दोन्ही बाजार समिती, अनेक ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर सत्ता नाही. त्यामुळे मोठं घर पोकळ वासा काहीसा असाच प्रकार आमदार पंकज भुजबळ यांच्या बाबतीत घडत आहे. वडील राज्याचे हेविवेट नेते, माजी उपमुख्यमंत्री राहिले बाजूच्याच येवला मतदारसंघात आमदार म्हणून त्यांचे वर्चस्व, कार्य आणि पंकज यांचे नांदगाव मतदार संघातील कार्य याची तुलना केली तर बेटे पेक्षा बाप सवाई असे म्हणावे लागेल तुरुंगात असतांनाही आपल्या मतदारसंघाची काळजी घेणारा आमदार छगन भुजबळ आणि पीएच्या हाती तालुक्याची धुरा देऊन नामानिराळा होणारा आमदार पंकज भुजबळ वेगळेच. पीए संस्कृतीमुळे पंकज यांना तालुक्यावर पकड ठेवता आली नाही. एकामागून एक सत्तास्थाने हातातून निघून गेली केवळ आमदारकी मिरवण्यातच धन्यता मानत असल्याचे चित्र भुजबळांच्या डोक्यात आहे. राष्ट्रवादी पक्षाचे कमी होणारे बळ आणि दुरावणारा कार्यकर्ता याकडे कानाडोळा केला जात आहे. बोटावर मोजणारे नेते पदाधिकारी खुश असले तरी नाराजींची एक मोठी फळी धुसफूसते आहे. भुजबळ नावाला असलेले राज्याचे वलय नांदगाव तालुक्यात कमी होताना दिसत आहे तालुक्याचे पालकत्व त्यांच्याकडे आहे. महिन्यातून वेळ मिळाल्यास बंगल्यावर, कार्यालयात किंवा एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावून आल्या पावले माघारी फिरायची भुजबळ पध्द्त सर्वांनाच ठाऊक आहे. तालुक्यात काय चालू आहे. याचे काही घेणे देणे नाही पीए जे सांगतील तेच प्रमाण मानून आमदारांनी आताची चार वर्षे आणि मागची पाच वर्षे घालवली या मतदारसंघात आमदारांपेक्षा पीए नाच जास्त ओळखले जाते आणि महत्व आहे. पीए खुश तरच काम होईल म्हणून त्यांच्या पुढेपुढे करणारी काही पक्षीय मंडळीमुळे या पीएचे भागते आहे. पीएच्या चुकीच्या धोरणामुळे तालुक्याचा सारीपाट होऊन खेळ झाला आहे. तरी आमदारांचे डोळे उघडू शकले नाही पक्षासह इतर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते अनेकांनी या पीए संस्कृतीला विरोध केला. मात्र विधानसभा जवळ येऊन ठेपली तरी ही पीए संस्कृती तालुक्यावर लादली जात आहे. इतकेच काय सतत कार्यकर्त्यांचे असलेले मोहळ या पीए मुळे आज दिसेनासे झाले आहे. अनेकांना आमदारांच्या जवळ जाऊ दिले जात नाही बोलू दिले जात नाही पंकज यांचा सर्वसमन्यांशी संपर्क होऊ दिला जात नाही. आठवण ठेवून कार्यकर्त्यांची विचारपूस करणाऱ्या वडिलांचा आदर्श घरात असतांना आमदारांचे हे असे वागणे स्वपक्षासह सर्वानाच खटकत आहे दोन पंचवार्षिक आमदार पंकज यांनी मनमाड शहरासह तालुक्यात कोणती विकास कामे केली ते सांगावे आणि जी केली आहे. त्याची काय स्थिती आहे तेही बघावे केवळ तहसील कार्यालय बांधून लोकांचे दैनंदिन समस्या सुटू शकत नाही मनमाड शहराचा अद्यापही पाणीप्रश्न सुटलेला नाही 'पाणीप्रश्न सोडला नाही तर भुजबळ नाव लावणार नाही ही मोठ्या भुजबळांची भुजबळगर्जना' सर्वांनाच ठावूक आहे. 

दोन टर्म भुजबळांवर मतदारांनी विश्वास ठेवून त्यांना काट्याच्या टक्करीतही विजयी केले मात्र पिता सारखा विकास कामांचा ठसा नांदगाव तालुक्यात उमटवू शकले नाही. कोट्यवधी निधी आल्याचे पीए सांगतात मग तो मुरला कुठे याचा थांगपत्ता नाही पीएनी पक्षातही गटबाजी केली असून, जवळच्या माणसांना कामे देत असल्याचा आरोप काहींनी केला आहे. कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाला विचारा आमदारांचे कार्य त्यांचे विचार ऐकून भोवळ येईल अशी मते मतदार मांडतात आमदारकी केवळ पैशावर लढवता येत नाही. डोक्यात असलेली हवा काही वेळा जमिनीवर पाय आणत असते. नेते मंडळींच्या घरी भेटी देऊन त्यांना खुश करून सर्वकाही होत नाही. मुळात स्थानिक नेत्यांवरही मतदारांचा विश्वास राहिला नाही मतदार सुज्ञ आहेत. सर्वकाही जाणून आहे. पैशावर नाही तर मतदारांमध्ये उमेदवारासंदर्भात गोडी देखील पाहिजे आणि हीच गोडी कमी झालेली दिसते निवडणूक जवळ येऊ लागली म्हणून नाराजांकडे हातजोडी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मधल्या काळात आमदार दाखवा बक्षीस मिळवा अशी टीकेची झोड उठली होती. आयात केलेला उमेदवार असाच असतो आशा टिकेलाही सामोरे जावे लागले होते.

पीएच्या संदर्भात तक्रारी असतील तर माझ्या कानावर घालाव्या पीएना सांगून काम होत नसेल तर माझाकडे संपर्क साधा मतदार, पक्षाचे कार्यकर्ते अथवा कोणीही थेट माझ्याशी संपर्क साधा मी जनतेचा आमदार आहे. त्यामुळे पीएची आडकाठी रहाणार नाही. 
- पंकज भुजबळ, आमदार, नांदगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com