जैताणेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 5 एप्रिल 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश हासरथ सोनवणे यांच्या ३४व्या वाढदिवसानिमित्त संजयनगरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज (ता. ५) त्यांच्या मित्रपरिवाराने शालेय विद्यार्थ्यांना रोख रकमेसह शैक्षणिक साहित्य वाटप केले. याचदिवशी वाढदिवस असलेली, इयत्ता दुसरीत शिकणारी भिल्ल समाजाची आदिवासी विद्यार्थिनी गायत्री दत्तू पवार हिचे सरपंच संजय खैरनार यांनी पुढील शिक्षण पूर्ण होईपर्यंत पालकत्व स्वीकारत एक अनोखा विधायक पायंडा पाडला.

मित्रपरिवार, विद्यार्थी व शिक्षकांसमवेत केला वाढदिवस साजरा..
यावेळी सुरेश सोनवणे यांच्यासह सरपंच संजय खैरनार, उपसरपंच आबा भलकारे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे, सामाजिक कार्यकर्ते अजित बागुल, राहुल जयस्वाल, संजय मोरे, नरेंद्र देवरे, जाकीर सय्यद, समाधान काटके, श्री. विसपुते, मुख्याध्यापिका श्रीमती मंदा परदेशी, शिक्षिका पी. आर. वानखेडे, शिक्षक शंकर गांगुर्डे, किशोर देवरे, शिक्षिका श्रीमती नमल सूर्यवंशी, मयुरी जाधव आदी उपस्थित होते.

सरपंचांनी गरजू आदिवासी विद्यार्थिनीचे स्वीकारले पालकत्व..
योगायोगाने सुरेश सोनवणे यांच्यासोबतच शाळेतील गायत्री दत्तू पवार ह्या भिल्लवस्तीत राहणाऱ्या व दुसरीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीचाही वाढदिवस असल्याने सरपंच खैरनार यांनी तिचे पुढील पूर्ण शिक्षण होईपर्यंत तिचे पालकत्व स्वीकारले. शालेय साहित्यासह रोख रक्कम देऊन तिचा गौरव केला. विद्यार्थ्यांना मिठाईसाठी सरपंच संजय खैरनार यांनी एक हजार, तर उपसरपंच आबा भलकारे यांनी पाचशे रुपये, असे एकूण पंधराशे रुपये रोखीने शाळेच्या मुख्याध्यापिका मंदा परदेशी यांच्याकडे सुपूर्द केले.

दिडशेवर विद्यार्थ्यांना लाभ..
शाळेची पटसंख्या १६१ एवढी असून उपस्थित सुमारे १५४ विद्यार्थ्यांनी ह्या मोफत शैक्षणिक साहित्याचा लाभ घेतला. आगामी काळात विद्यार्थ्यांना दप्तरे, रेनकोट, शाळेला अद्ययावत साउंड सिस्टीम आदी उपलब्ध करून देण्याचा मानस सरपंच खैरनार यांनी व्यक्त केला. पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करून व केवळ केक कापून कुठेतरी हॉटेलात वाढदिवस साजरा करण्यापेक्षा तो ज्ञानमंदिरात साजरा झाला याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

ग्रामपंचायतीतर्फेही सत्कार व शुभेच्छा..
सामाजिक कार्यकर्ते सुरेश सोनवणे यांचा ग्रामपंचायतीतर्फेही सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार, सदस्या आशा सोनवणे, छाया कोठावदे, सुरेखा भिल, दादा भिल, युवराज बोरसे, भिका न्याहळदे, परशराम खलाणे, प्रकाश गवळे, भालचंद्र कोठावदे, भगवान भलकारे, ईश्वर पेंढारे, ग्रामविकास अधिकारी योगेंद्र सोनवणे, लिपिक यादव भदाणे आदींनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: Distribution of educational material to students in Jaitane