जिल्हा बॅंकेतर्फे "एटीएम' सेवा सुरू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

धुळे - अत्यंत बिकट परिस्थिती असताना धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने तुलनेने चांगली कामगिरी केली आहे. येत्या काळात तालुक्‍याच्या ठिकाणी तसेच आर्थिक व्यवहारांना प्रतिसाद आहे अशा शाखांमध्ये "एटीएम' सुरू करण्याचे नियोजन आहे. या एकत्रित प्रयत्नांतून येत्या काळात बॅंकेला यापेक्षा चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा बॅंकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी व्यक्त केली. 

धुळे - अत्यंत बिकट परिस्थिती असताना धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने तुलनेने चांगली कामगिरी केली आहे. येत्या काळात तालुक्‍याच्या ठिकाणी तसेच आर्थिक व्यवहारांना प्रतिसाद आहे अशा शाखांमध्ये "एटीएम' सुरू करण्याचे नियोजन आहे. या एकत्रित प्रयत्नांतून येत्या काळात बॅंकेला यापेक्षा चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा बॅंकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी व्यक्त केली. 

जिल्हा बॅंकेच्या येथील गरुडबाग मुख्य शाखेत आज सकाळी अकराला बॅंकेच्या "एटीएम'चे उद्‌घाटन तसेच शेतकरी सभासद व ठेवीदारांना रूपे डेबिट कार्ड, रूपे किसान क्रेडिट कार्ड वितरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री. कदमबांडे बोलत होते. बॅंकेचे संचालक सुरेश पाटील, हर्षवर्धन दहिते, प्रकाश पाटील, प्रभाकर पाटील, अग्रणी बॅंकेचे श्री. गिलाणकर, जिल्हा उपनिबंधक श्री. रत्नाळे, अधिकारी, शेतकरी उपस्थित होते. 

"एटीएम'चे उद्‌घाटन 
जिल्हा बॅंकेच्या गरुडबाग मुख्य शाखेत जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांच्या हस्ते बॅंकेच्या एटीएमचे उद्‌घाटन झाले. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी सभासद, ठेवीदारांना रूपे डेबिट कार्ड, किसान क्रेडिट कार्ड तसेच पीककर्जाचे धनादेश श्री. पांढरपट्टे यांच्या हस्ते वितरित झाले. 

53 हजार सभासदांना क्रेडिट कार्ड 
श्री. कदमबांडे म्हणाले, की टप्प्याटप्प्याने बॅंकेच्या तालुक्‍याच्या ठिकाणी तसेच ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहारांना प्रतिसाद आहे अशा प्रत्येक शाखेच्या ठिकाणी एटीएम सुविधा देण्याचे नियोजन आहे. 53 हजार शेतकरी कर्जदार सभासदांना रूपे किसान क्रेडिट कार्ड वाटपाचे नियोजन असेल. पहिल्या टप्प्यात 20 हजार कार्डचे वाटप करण्यात आले आहे. निधीचा तुटवडा, डिपॉझिटची कमी यामुळे पीककर्ज वितरणात अडचणी आहेत. शासनाने पीककर्जासाठी निधी उपलब्ध केला तर मोठी मदत होईल. कर्जमाफीचा निर्णय झाल्यास शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचाही विचार करून त्यांना फायदा द्यावा. पीकविमा सरकारी विमा कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात यावा, अशी मागणीही श्री. कदमबांडे यांनी केली. 

डिजिटल व्यवहार सुरक्षित 
जिल्हाधिकारी पांढरपट्टे म्हणाले, की अनेक ठिकाणी जिल्हा बॅंकांची स्थिती वाईट असल्याने या बॅंकांकडे साशंकतेने बघितले जाते. धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने मात्र शेतकरी, सभासदांमध्ये विश्‍वास निर्माण केला आहे, ही बाब प्रशंसनीय आहे. एटीएम सेवा सुरू करून बॅंकेने पुढचे पाऊल टाकले आहे. डिजिटल व्यवहार सुरक्षिततेच्या दृष्टीनेही चांगला आहे. खिशात जास्त नोटा बाळगणे आता मागासपणाचे मानले जाते. त्यामुळे डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे. बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी प्रास्ताविक केले. बी. ओ. चौधरी यांनी आभार मानले. 

बॅंकेचा "सीआरएआर' 11.55 टक्के 
मार्च 2016 मध्ये बॅंकेचा "सीआरएआर' 6.37 टक्के होता. मार्च 2017 अखेर 9.00 टक्के राखावा असे रिझर्व्ह बॅंकेचे निर्देश होते. जिल्हा बॅंकेने 31 मार्च 2017 अखेर 11.55 टक्के एवढा "सीआरएआर' राखला अशी माहिती श्री. चौधरी यांनी दिली. 

Web Title: District bank ATM service launched