जिल्हा उद्योग केंद्राचे सहा कोटी लाटले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्यात अपात्र उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन अनुदानाचे वाटप करत तब्बल सहा कोटी तीन लाखांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापकासह 32 जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत फिर्याद दाखल केली. 

नंदुरबार - नंदुरबार जिल्ह्यात अपात्र उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन अनुदानाचे वाटप करत तब्बल सहा कोटी तीन लाखांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापकासह 32 जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत फिर्याद दाखल केली. 

जिल्हा उद्योग केंद्रातून अपात्र उद्योगांना अनुदानाचे वाटप केल्याबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक के. बी. खेडकर यांनी तक्रार दाखल केली. 14 एप्रिल 2015 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपायुक्तांच्या पत्रानुसार जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुरूपसिंग पाया वसावे, दामू शंकर पाडवी, विजयकुमार म्हसुदेव निकरड, जगदीश रघुनाथ श्रीवास, उद्योग निरीक्षक ओंकार गुरुदयाल चव्हाण, खासगी व्यक्ती रशीद अब्दुल सत्तार मेमन यांची चौकशी करण्यात आली. सामूहिक प्रोत्साहन योजना 2001 राबविताना लाभधारक घटकांनी या योजनेचा लाभ घेताना जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संगनमत करून बेकायदा दिलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. त्यात 26 उद्योग घटकांना लाभ देण्यात आला. त्यातून सहा कोटी तीन लाख 14 हजार 862 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे या कागदपत्रांतून निष्पन्न झाले आहे. या सर्व प्रकारात उद्योग केंद्रातील पाच अधिकारी, एक मध्यस्थ आणि लाभ घेणारे 26 उद्योग घटकांचे संचालक अशा 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

अस्तित्वात नसलेले उद्योग 
वाटप अनुदानाच्या यादीतील दहा उद्योग हे अस्तित्वात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, तर सहा उद्योगांनी बॅंक, प्रदूषण नियंत्रण मंडळ, वीज वितरण कंपनी, ग्रामपंचायत ना हरकत दाखल्यांसह अन्य बनावट कागदपत्रे निव्वळ अनुदान लाटण्यासाठी दाखल केली. दहा उद्योगांनी नियम आणि शर्तींबाबत बनावट दाखले दिले. त्यांनाही अनुदान वाटप दाखविण्यात आले आहे. 

Web Title: District Industries Centre, six million