PHOTO : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 'त्या' जिल्हा कार्याध्यक्षाची पित्यासह हत्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

ज्ञानेश्वर फोकणे यांनी एसएमबीटी परिसरात हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. त्यांचा संपूर्ण परिवार तेथे जाऊन-येऊन वास्तव्यास असायचा. शुक्रवारी रात्री परिवाराने जेवण केल्यावर दहाच्या सुमारास सर्व जण हॉटेलकडे निघून गेले. ज्ञानेश्वर फोकणे हे वडिलांना सोबत म्हणून मळ्यात मुक्कामी थांबले.

नाशिक : घोटी खुर्द (ता. इगतपुरी) येथे शुक्रवारी (ता. 29) मध्यरात्री एकच्या सुमारास पित्यासह मुलाचा मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली. काशीनाथ वामन फोकणे (वय 67) आणि ज्ञानेश्‍वर काशीनाथ फोकणे (49), अशी बापलेकांची नावे आहेत. ज्ञानेश्‍वर फोकणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत. या घटनेने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

घोटी खुर्दला मळ्यात मध्यरात्री झोपेत मारेकऱ्यांचा हल्ला 

इगतपुरी तालुक्‍याच्या पूर्व भागातील घोटी खुर्द येथील ज्ञानेश्वर काशीनाथ फोकणे हे वडील, पत्नी, तीन मुलगे व सून यांच्यासह राहत होते. त्यांची शेती असून, वडील काशीनाथ वामन फोकणे एकटे राखणीसाठी मळ्यात राहायचे. ज्ञानेश्वर फोकणे यांनी एसएमबीटी परिसरात हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. त्यांचा संपूर्ण परिवार तेथे जाऊन-येऊन वास्तव्यास असायचा. शुक्रवारी रात्री परिवाराने जेवण केल्यावर दहाच्या सुमारास सर्व जण हॉटेलकडे निघून गेले. ज्ञानेश्वर फोकणे हे वडिलांना सोबत म्हणून मळ्यात मुक्कामी थांबले. मात्र, रात्री एक ते दीडच्या सुमारास अनोळखी व्यक्तींनी फोकणे पिता-पुत्रावर जोरदार हल्ला करून त्यांचा खून केला. वडील काशीनाथ फोकणे यांचाही खून झाला. ही घटना मळ्यातील घरात घडली. शनिवारी (ता. 30) सकाळी या घटनेची माहिती पोलिसपाटील कैलास फोकणे यांनी वाडीवऱ्हे पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाला वेगाने सुरवात केली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, उपअधीक्षक अरुंधती राणे, गुन्हे अन्वेषण विभाग व श्‍वान पथकाच्या सहाय्याने मारेकऱ्यांचा सुगावा काढला आहे. 

Image may contain: Ashok Shukla

हेही वाचा > ड्रायव्हरने 'त्या' मुलींना धडक दिली..पण पुढे..

मारेकऱ्यांच्या शोधाचे आव्हान पोलिसांसमोर

मारेकऱ्यांच्या शोधाचे आव्हान वाडीवऱ्हे पोलिसांसमोर आहे. ज्ञानेश्‍वर फोकणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जिल्हा कार्यकारिणीवर पदाधिकारी होते. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्‍यासह नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या हत्येमागे राजकीय वाद आहे का, याचा वाडीवऱ्हे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हत्येच्या कारणांची शक्‍यता पडताळत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.  

वाचा सविस्तर > चेंबरमध्ये तळमळत पडलेल्या चिमुकल्याची झुंज 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District President of NCP, Dnyaneshwar Fokne killed by murderer at Nashik Marathi News