फटाके स्टॉलची सुरक्षितता उणे-अधिक

फटाके स्टॉलची सुरक्षितता उणे-अधिक

नाशिक - काटेकोर नियमावलींच्या मान्यतेनंतर शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या फटाके स्टॉल्समध्ये सुरक्षिततेच्या पुरेशा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. परंतु जर दुर्घटना घडली तर नऊ लिटरचे अग्निशमन सिलिंडरमुळे ती आवाक्‍यात येऊ शकते का, असा प्रश्‍न उभा राहतो. त्यातच स्टॉल परिसरात वाहनांना प्रवेश बंदी असतानाही अगदी स्टॉलच्या समोरच ग्राहक वाहने लावत आहेत.

नाशिक महापालिकेतर्फे गोल्फ क्‍लब मैदानावर व गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावरही फटाके व्यावसायिकांचे स्टॉल्स उभारलेले आहेत. फटाके स्टॉल्ससाठी महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्या मान्यतेनंतर परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार मोकळ्या मैदानात गाळे असावेत, दोन गाळ्यांमध्ये किमान तीन मीटरपेक्षा अधिकचे अंतर असावे यांसह चिनी बनावटीसह काही फटाक्‍यांवर बंदी आहे. गोल्फ क्‍लब मैदानावर ३० फटाके स्टॉल्स असून, नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आलेले आहे. तसेच कोणत्याही दुर्घटनेला तोंड देण्यासाठी अग्निशमन दलाचा एक बंब स्टॉलस्थळी सज्ज ठेवण्यात आला आहे. येथील स्टॉलच्या समोरच्या बाजूलाच नऊ लिटरचा अग्निशमन सिलिंडर लावण्यात आला आहे. डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावरही ३० स्टॉल्स आहेत. परंतु या ठिकाणी काही नियमांना धाब्यावर बसविण्यात आलेले आहेत. दोन गाळ्यांमध्ये किमान तीन मीटरचे अंतर अपेक्षित असताना काही दुकानांनी या नियमांचे उल्लंघन केले आहे. काही स्टॉल्समध्ये नऊ लिटरचा अग्निशमन सिलिंडर प्रदर्शनी न ठेवता कुठेतरी आडोशाला ठेवण्यात आला आहे. दुर्घटना घडली तर स्टॉलच्या चालकाच्याही सहजरित्या ते सिलिंडर हाती लागेल याची शाश्‍वती नाही. बहुतांश स्टॉल्सचालकांनी सिलिंडरच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.

पोलिस परवानगीनुसार नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास, अशा फटाके विक्रेत्यांवर नियमांप्रमाणे कारवाई केली जाईल. 
- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com