धनादेशाने नको, शेतमालाचे पैसे ऑनलाइन द्या !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

व्यापाऱ्याकडून नियम धाब्यावर, आंदोलनाचा शेतकरी संघटनेचा इशारा

येवला - कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव झाल्यावर शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या मोबदल्याची रक्कम व्यापारी धनादेशाने देत आहेत. मात्र, विविध कारणांनी मिळालेला धनादेश वटण्यासाठी २५ ते ३० दिवसांचा कालावधी लागत असून, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

त्यामुळे शेतमाल लिलावानंतर ऑनलाइन बॅंकिंगचे पर्याय वापरत २४ तासांत शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचे पैसे द्यावेत, या मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे यांनी दिला आहे. 

सहकार आणि पणन विभागाच्या नियमाप्रमाणे शेतीमालाचा कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव झाल्यावर शेतकऱ्याला २४ तासांत पेमेंट करण्याची जबाबदारी खरेदीदार किंवा व्यापाऱ्यांची असते. नोटाबंदीच्या निर्णयापासून या धोरणाला व्यापाऱ्यांकडून धाब्यावर बसविले जात आहे. व्यापाऱ्यांनी यासाठी इतर अनेक पर्याय असताना धनादेशाचा पर्यायाने शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे सत्रच सुरू केले आहे. पण, शेतकऱ्यांचे बॅंक खाते खेड्यातील बॅंकेत असतात; तर धनादेश येवल्यातील शाखेचा असतो. परिणामी, खात्यावर पैसे जमा होण्याची वाट पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.

शेतमाल विक्री झाल्यावर शेतकऱ्याला दिला जाणारा धनादेश वटण्यासाठी २५ ते ३० दिवसांच्यावर कालावधी लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

शासन दरबारी कॅशलेस व्यवहाराचा बोलबाला आहे; परंतु शेतकऱ्यांबाबत कॅशलेस व्यवहाराचा अवलंब व्यापारी करताना दिसत नाहीत. माल खरेदीनंतर आरटीजीएस, एनईएफटी, ऑनलाइन बॅंकिंग हे पर्याय वापरून व्यापारी लगेच पैसे देऊ शकतात. पण, नियम धाब्यावर ठेवून व्यापारी धनादेश देत असून, यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक हेळसांड सुरू आहे. शेतमजुरांचे पैसे देणे, डिझेल, खते, बी-बियाणे खरेदीसाठी लागणारे पैसे यासाठी शेतकऱ्याला उधार, उसनवारी, वेळप्रसंगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेण्याची वेळ आली असल्याने त्यास सर्वस्वी शासन जबाबदार असल्याचा टोला पत्रकात लगावला आहे. सहकार खात्याने व्यापाऱ्यांना शेतमाल विक्रीचे पैसे त्याच दिवशी खात्यावर जमा करण्याचे बंधन घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकरी रास्ता रोको, उपोषण, घेराव आंदोलन यांसारख्या लोकशाही मार्गांचा अवलंब करणार असल्याचा इशारा पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.

यापूर्वी व्यापारी माल विक्रीनंतर लगेच रोख रक्कम हातात देत होते. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयाचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी धनादेश देणे सुरू केले असून, जवळपास सर्वजण पुढील तारखांचे धनादेश शेतकऱ्यांना देत आहेत. त्यात बॅंकांतून उशिराने धनादेश वटतो. त्यामुळे धनादेशाद्वारे पैसे न देता आरटीजीएस, ऑनलाइन बॅंकिंग हे पर्याय वापरून तत्काळ पैसे द्यावेत. 
- संतू पाटील झांबरे, अध्यक्ष, शेतकरी संघटना, उत्तर महाराष्ट्र

Web Title: Do not check, agricultural goods cash online!