'मराठा आरक्षणाला विरोध नको, एकत्र नांदूया'

'मराठा आरक्षणाला विरोध नको, एकत्र नांदूया'

नाशिक - मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याची महाराष्ट्रानेच नव्हे देशाने दखल घेतली आहे. इतक्‍या चांगल्या पद्धतीने लढा लढला. तसेच मराठा समाजाला इतर कुणाच्या वाट्याचे नव्हे, तर स्वतंत्र आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाविरोधात ज्यांनी याचिका दाखल केली त्यांना सांगणे आहे, की मराठा समाजाचे आरक्षण इतर कुणाच्या वाट्याचे नाही. त्यामुळे त्याला विरोध करू नये, सगळ्यांनी एकत्र नांदूया, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शनिवारी (ता. 15) येथे केले. 

राज्याच्या विधानसभेत व विधान परिषदेत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळाल्याबद्दल छावा क्रांतिवीर सेनेतर्फे आडगाव येथे विजयी मेळावा व संघटनेच्या चौथ्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे आयोजन आडगाव येथे करण्यात आले होते. छत्रपतींचे तेरावे वंशज छत्रपती संभाजीराजे अध्यक्षस्थानी होते. सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, दुग्ध व पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, ऍड. शिवाजी सहाणे, नगरसेवक उद्धव निमसे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील, सुनील बागूल, विलास शिंदे, तुषार जगताप, रामकृष्ण महाराज लहवितकर, संजय पाटील, अभिजित राणे, गणेश कदम आदी उपस्थित होते. उमेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. 

या वेळी मार्गदर्शन करताना खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले, की मराठा समाजाला आरक्षण मिळाले पण आता मिळालेले आरक्षण टिकविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणाच्या विषयावर मी एकटा मराठा खासदार बोललो. शाहू महाराजांनी सर्वप्रथम आरक्षणाचा विचार केला. मी छत्रपती आहे. सगळ्या जाती-धर्माच्या बहुजनांना एकत्र आणण्याच्या बाजूने आहे. सगळ्यांना एकत्र नांदण्याच्या बाजूने बोलणार. छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांवरील धडे केवळ तिसरी चौथीत नव्हे, तर नववी, दहावीतही असावेत, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली. 

दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मराठा आरक्षणाच्या निमित्ताने फ्रेंच राज्यक्रांतीपेक्षाही मोठे आंदोलन उभे राहिले. समाजाने शिस्तबद्ध मोर्चांद्वारे आगळीवेगळी क्रांती घडविली आहे. राज्य शासनातर्फे सुरू असलेल्या मेगाभरतीबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी समाजातील मुलांनी जातीचे प्रमाणपत्र कसे मिळेल हे पाहण्याचा सल्ला दिला. कर्मकांडे थांबवा अन्‌ आई-वडिलांच्या नावे किमान पाच झाडे लावा, असा सल्ला मंत्री खोतकर यांनी उपस्थितांना दिला. 

आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या वाटचालीची माहिती दिली. हे आरक्षण 80 च्या दशकात मिळाले असते तर समाजातील दोन-तीन पिढ्यांना त्याचा लाभ झाला असता, असे सांगितले. आजवर समाजाचा वापर केवळ मतांसाठीच करण्यात आल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. या वेळी सहकार, आरोग्य, सामाजिक, शेती आदी क्षेत्रात मोठे काम उभारणाऱ्या कार्यकर्त्यांचा संभाजीराजांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमानंतर फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com