डॉक्‍टर होण्याच्या स्वप्नास आर्या फाउंडेशनचे बळ

जळगाव - वैद्यकीय शुल्कासाठी धनादेश देताना आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील. डावीकडून मीलनची आई रीमा पोपटानी, वडील घनश्‍याम पोपटानी, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. राहुल महाजन.
जळगाव - वैद्यकीय शुल्कासाठी धनादेश देताना आर्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील. डावीकडून मीलनची आई रीमा पोपटानी, वडील घनश्‍याम पोपटानी, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. राहुल महाजन.

जळगाव - डॉक्‍टर होण्याचे स्वप्न उराशी होते. नीट परीक्षाही उत्तीर्ण; पण घरातील आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने पुढील शिक्षणाला अडथळा होता. मीलनच्या या स्वप्नाला आर्या फाउंडेशनचा हात मिळाला. यामुळेच मीलन आपले स्वप्न साकार करू शकत आहे.

शहरातील पांडे डेअरी चौक येथे मीलन पोपटानी यांचे कुटुंब आहे. आई शिवणकाम आणि  ब्यूटीपार्लरचा छोटा व्यवसाय करून घर चालविते. तर वडील वेळेनुसार छोटी-मोठी कामे करून संसाराचा रहाटगाडा ओढतात. कुटुंबातील विजिगीशु वृत्तीचा मुलगा डॉक्‍टर होण्याच्या जिद्दीने नीट परीक्षेत चांगले गुण मिळवून गेल्या वर्षी उत्तीर्ण झाला. परंतु, एमबीबीएसच्या शिक्षणासाठी प्रवेश शुल्क अडथळा ठरत असल्याने शहरातील नेत्रतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी आर्या फाउंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षणासाठी मीलनला दत्तक घेतले. त्यासाठी प्रथम वर्षाचे शिक्षण शुल्क ७८ हजार रुपये गेल्या वर्षी मदत म्हणून फाउंडेशनकडून दिले. त्यामुळे आज मीलन हा नायर हॉस्पिटल मुंबईमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे.

मीलनचे पहिल्या वर्षी यश
डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या प्रयत्नांनी आर्या फाउंडेशनच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक आणि मानसिक मदतीचे चीज करीत मीलन हा प्रथम वर्ष एमबीबीएसमध्ये ७६.३३ टक्के गुण मिळवत महाविद्यालयात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

दुसऱ्या वर्षीही मदत
एमबीबीएसच्या द्वितीय वर्षासाठी आवश्‍यक असलेले शुल्क एक लाख तीस हजार दोनशे रुपये भरणे पुनः अडथळा होऊ पाहत होते. डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी मित्रपरिवारात मदतीसाठी चर्चा केली असता शहरातील एका नामांकित डॉक्‍टरने पुढे येत नाव जाहीर न करण्याच्या अटीवर फाउंडेशनला १ लाख ३० हजार २०० रुपयांची मदत पोहोचवली आहे. याचा धनादेश अध्यक्ष डॉ. पाटील, संचालक डॉ. राहुल महाजन, संचालक डॉ. प्रशांत देशमुख यांनी घरी जाऊन मीलनच्या आई- वडिलांकडे सुपूर्द केला. पुढील वर्षी देखील शैक्षणिक शुल्काची जबाबदारी फाउंडेशन उचलेल, असे डॉ. पाटील म्‍हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com