Donations of Fodder made to Wadgaon Labe Cow school.jpg
Donations of Fodder made to Wadgaon Labe Cow school.jpg

'सकाळ’च्या वृत्तामुळे गायींना मिळाला चारा; दानशूरांनी केली मदत

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यात निर्माण झालेल्या चारा टंचाई संदर्भात मंगळवारी (१९ नोव्हेंबर) ‘सकाळ’मध्ये ‘पशुधन जगवावे तरी कसे? या मथळ्याखाली वस्तुनिष्ठ वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) येथील वटेश्वर आश्रमातील गायींना चारा मिळावा, यासाठी चाळीसगाव व जामदा परिसरातील दानशूरांनी स्वखर्चाने चारा उपलब्ध करून दिला. ‘सकाळ’च्या वृत्तामुळे गायींना चारा मिळाल्याची भावना गोसेवक रविदास महाराज यांनी व्यक्त केली.

चाळीसगाव तालुक्यात यावर्षी परतीच्या पावसाने अक्षरशः शेतकरी रडकुंडीला आला आहे. चारा सडल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत. ओला दुष्काळामुळे सध्या उद्भवलेली दुष्काळजन्य स्थिती, पशुखाद्य तसेच चाऱ्यांचे वाढलेले भाव, गाव पातळीवर शासनाच्या न पोचलेल्या विविध योजना अशा कारणांमुळे गुरांची संख्या घटत आहे. या संदर्भात १९ नोव्हेंबरच्या दै. ‘सकाळ’मध्ये चाळीसगाव पानावर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियांसह वस्तुनिष्ठ वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यात वडगाव लांबे येथील वटेश्वर आश्रमावरील गो सेवक रविदास महाराज यांच्याकडे लहान मोठ्या सुमारे दोनशेच्या देशी गायी आहेत. या गायींचे चाऱ्याअभावी पालनपोषण कसे करावे? याची चिंता महाराजांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केली होती. हे वृत्त वाचून जामदा (ता. चाळीसगाव) येथील रवींद्र पाटील यांनी आपल्या तीन एकरातील मक्याचा चारा वटेश्वर गोशाळेला दिला. स्वतः टँक्टरद्वारे त्यांनी हा चारा आश्रमात पोचवला.

चाळीसगावहूनही मिळाला ऊस  
गिरणा पट्ट्यात सध्या ऊस सोडला तर इतर कुठलाही चारा मिळेनासा झाला आहे. अशा परिस्थितीत ‘सकाळ’चे वृत्त वाचून चाळीसगाव शहरातील विशाल राजपूत यांनी या बातमीची दखल घेऊन शहरात विक्रीसाठी आलेला उसाचा जवळपास साडेपाच हजार रुपये किमतीचा चारा एका शेतकऱ्याकडून विकत घेतला. उसाचा चारा वडगावलांबे येथे पाचशे रुपये गाडीला भाडे देऊन स्वखर्चाने विशाल राजपूत यांनी गोसेवक ह. भ.प. रविदास महाराज यांच्याकडे सुपूर्द केला. आश्रमातील  गायींना गरजेच्यावेळी चारा उपलब्ध झाल्याने रविदास महाराज यांनी ‘सकाळ’सह गायींना चारा देणाऱ्या दात्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

चाऱ्याअभावी दगावल्या होत्या पंधरा गायी
परतीच्या पावसाने उघडीप दिल्यानंतर वडगावलांबे (ता. चाळीसगाव) येथील वटेश्वर आश्रमातील गो शाळेतील गायींच्या पायाच्या खुरांमध्ये चिखल्या पडल्या. अशातच त्यांना पुरेसा चारा न मिळाल्याने लहान मोठ्या पंधरा गायी दगावल्या. यामुळे येथील चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. चाऱ्याअभावी आपल्या गायी दगावल्याचे दुःख सांगताना रविदास महाराज यांचे डोळे पाणावले होते. ज्यांना विविध कारणांमुळे गायी सांभाळणे शक्य नाही, अशा अनेकांनी या आश्रमाला गायी दान केलेल्या आहेत. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी रविदास महाराज हे समाजातील दाते व ग्रामस्थांच्या सहकार्याने निष्ठेने पार पाडत आहेत.

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत गोमातेला सहकार्य करणे हे  
''आपल्या हिंदू धर्मात अत्यंत उच्च कोटीचे पुण्यप्राप्तीचे कार्य मानले जाते. ज्यांना गायींसाठी चारा द्यायचा असेल त्यांनी या पुण्याच्या कार्यात सहभागी व्हावे. ‘सकाळ’ने हा विषय थेट लोकांपर्यंत पोचवण्याचे काम केल्याने खास करून त्यांचे शतशः आभार मानत आहे.''
- गोसेवक बाबा रविदास महाराज, वडगाव लांबे आश्रम (ता. चाळीसगाव) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com