नेटवर्क नसल्याने बँकेचे व्‍यवहार ठप्प

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

पैशांची चणचण, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज

धानोरा (ता. चोपडा) - सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या येथील शाखेत इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी नसल्याने (नेटवर्क) कामकाज पूर्णपणे ठप्प पडले आहे. नोटाबंदीमुळे बॅंकांमध्ये रांगा सुरूच आहेत. मात्र, नेटवर्कच्या अडचणींमुळे तीन दिवसांपासून बॅंकेत शुकशुकाट आहे. 

पैशांची चणचण, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज

धानोरा (ता. चोपडा) - सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या येथील शाखेत इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी नसल्याने (नेटवर्क) कामकाज पूर्णपणे ठप्प पडले आहे. नोटाबंदीमुळे बॅंकांमध्ये रांगा सुरूच आहेत. मात्र, नेटवर्कच्या अडचणींमुळे तीन दिवसांपासून बॅंकेत शुकशुकाट आहे. 

सेन्ट्रल बॅंकेच्या धानोरा येथील शाखेत १० ते १५ खेड्यांचा आर्थिक व्यवहार निगडित आहे. यामुळे नेहमीच मोठी गर्दी बॅंकांमध्ये होते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून बाहेरगावाहून येणाऱ्या बॅंक ग्राहकांना बॅंकेचे नेटवर्क नसल्याने परत जावे लागत आहे. दररोज होत आलेल्या या प्रकाराने ग्राहकांना याचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेतकरी आपल्या शेतीचे कामे पैशांअभावी खोळंबल्याने संताप व्यक्त करीत आहे. मजूर वर्गाला बॅंक बंद असल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. सामान्य बॅंक ग्राहकांना रोज बॅंकेच्या खेटऱ्या माराव्या लागत आहेत. नेटवर्क नसल्याने बॅंक बंद असल्याचे बोर्ड पाहूनच बॅंकेतून काहीएक व्यवहार न करता ग्राहकांना तसेच परत जावे लागत आहे.

नेटवर्कची अडचण नेहमीचीच
सेंन्ट्रल बॅंकेत नेहमी नेटवर्क नसल्याचा फलक लावलेला असतो. यात बॅंक ग्राहकांची गैरसोय होत असते. बॅंकेचे पासबुक एन्ट्री करण्याचे प्रिंटर मशीनही नेहमी बंद अवस्थेत असल्याने ग्राहकांना आपल्या खाते पुस्तकाची एन्ट्री करता येत नाही. यामुळे बॅंक खात्यावर किती रक्कम शिल्लक आहे हे समजणे कठीण होते.

एटीएम मशिन बंदच
गेल्या दोन महिन्यापासून एटीएम मशीन बंद अवस्थेत असल्याने ते फक्त एक शोपीस होऊन पडले आहे. बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धानोरा सेंट्रल बॅंकेच्या असलेल्या या विविध समस्या सोडवाव्यात व ग्राहकांचे होणारे हाल थांबवावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.

गेल्या तीन दिवसांपासून मी बॅंकेत येत आहे. मात्र, नेटवर्क नसल्याने बॅंकेचा व्यवहार पूर्णपणे बंद आहे. मला मजुरांची मजुरी द्यायला पैसे नाहीत. बाजाराला मजुरांना खरेदीसाठी पैसा कोठून उपलब्ध करावा असा प्रश्न आहे.
- अनंत महाजन (शेतकरी), धानोरा बॅंक ग्राहक

झ्याकडे पुढच्या हप्त्यामध्ये लग्न येऊन ठेपले आहे. मी मागील एक महिन्यापासून धनादेश जमा करायला दिला आहे. पैसे काढण्यासाठी रोज येत आहे. मात्र, सध्या बॅंक बंद असल्याने रिकामे हाती परतावे लागते.
- गोकूळ कोळी, पुनगाव, बॅंक ग्राहक  

बॅंकेचे नेटवर्क संबंधीचे कामे तीन दिवसापासून सुरू आहेत. यासाठी जळगाव येथून विशेष अभियंते आलेले असून लवकरच बॅंकेचे व्यवहार पूर्वपदावर येतील.
- सौरभ साकेत, व्यवस्थापक, सेन्ट्रल बॅंक, धानोरा, ता. चोपडा

Web Title: dont network bank transaction stop