मंदार पर्वताच्या विकासासाठी केलेल्या कार्याची राष्ट्रपतींकडून दखल

रोशन खैरनार
बुधवार, 5 एप्रिल 2017

डॉ.निलेश देवरे हे मुळचे करंजाड (ता.बागलाण) येथील रहिवासी असून सन 2010 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झाले होते. या परिक्षेत त्यांनी देशात 165 वा तर महाराष्ट्रात पाचवा क्रमांक मिळविला होता. उत्तीर्ण होण्यापुर्वी डॉ.देवरे यांनी बिहार राज्यातील सासाराम जिल्ह्यात एक वर्ष सहाय्यक जिल्हाधिकारी तर त्यानंतर पटना जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी म्हणून सेवा बजावली होती. पटना जिल्ह्यातील चांगल्या कामाची दखल घेत मुख्यमंत्री मांझी यांनी स्वत: लक्ष घालून डॉ.देवरे यांची गया महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली होती.

सटाणा - बागलाणचे भुमीपुत्र व सध्या बांका (बिहार) येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ.निलेश रामचंद्र देवरे यांनी पौराणिक काळात समुद्रमंथनासाठी वापरण्यात आलेल्या बिहार राज्यातील मंदार पर्वताच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची थेट देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विशेष दखल घेतली आहे.

नुकत्याच बांका जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपती मुखर्जी यांनी मंदार पर्वताला भेट देवून पर्वतावरील पर्यटनाच्या दृष्टीने झालेल्या विकासकामांबद्दल जिल्हाधिकारी डॉ.देवरे यांचा गौरव केला.

बिहारच्या भागलपूरपासून 45 किलोमीटर अंतरावर बांका जिल्ह्यात पौराणिक महत्व लाभलेला "मंदार पर्वत' आहे. 700 फुट उंच असलेल्या या पर्वताचा महाभारत व पुराण कथेत उल्लेख झाल्याचे दाखले मिळतात. अमृत प्राप्त करण्याकरीता देवी-देवतांनी समुद्रमंथनासाठी या मंदार पर्वताचा वापर केला होता. या मंथनात हलाहल विष व 14 रत्नांची निर्मिती या दैवभुमीवर झाली होती. समुद्रात आढळणाऱ्या अनेक जैववनस्पती आजही या पर्वतावर जिवीत स्वरुपात आहेत. तसेच शेषनागाच्या अस्तित्वाचीही काही चिन्हे सापडतात. पुर्वी या पर्वत परिसरात समुद्र असल्याचे पुरातत्व अभ्यासातून स्पष्ट होते. मंदार पर्वतावर जैन धर्मियांचे पवित्र स्थान असून पायथ्याला हिंदू व आदिवासी बांधवांची मंदिरे आहेत. पायथा परिसरात असलेल्या "पापहरणी तलाव' मध्ये कर्नाटकातील कुष्ठपिडीत चोलवंशाच्या राजाने मकरसंक्रांतीच्या दिवशी स्नान करून कुष्ठरोगापासून मुक्ती मिळविली होती. तेव्हापासून या तलावाला पापहरणी तलाव असे ओळखले जाते. या तलावाच्या मधोमध लक्ष्मी-विष्णुचे मंदिर असून या पर्वतावर दरवर्षी मकरसंक्रातीला महिनाभर बिहार राज्यातील सर्वात मोठा यात्रोत्सव भरतो. या यात्रोत्सवात लाखो भाविक सहभागी होत असतात.

लाखो भाविक महिनाभराच्या कालावधीत एकत्रित येत असल्याने मंदार पर्वत परिसरात पाणीपुरवठा, शौचालये, स्वच्छतागृहे यासह सार्वजनिक आरोग्याचा मोठा प्रश्‍न निर्माण होत असे. मात्र डॉ.निलेश देवरे यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारल्यानंतर मंदारच्या पर्यटन विकासासाठी गेल्या चार वर्षात 80 कोटी रुपयांची विविध कामे केंद्र व राज्य सरकारकडून मंजूर करून आणली. पर्यटक व भाविकांसाठी पापहरणी तलावात बोटींगची सुविधा सुरु केली. दरवर्षी होणाऱ्या मंदार महोत्सवात नामवंत कलावंतांना आमंत्रित करून महोत्सवाचे स्वरुप बदलले. मंदार पर्वताच्या भोवताली साडेपाच किलोमीटरच्या प्रदक्षिणा मार्गावर भाविकांना चालण्यासाठी ट्रॅक, सहा तलावांचे सौंदर्यकरण, इकोटुरिझमसाठी तलावांच्या भोवताली बांबू हटची निर्मिती, दिल्लीहाटच्या धर्तीवर यात्रा मैदानाचा विकास ही कामेही मार्गी लावली आहेत. या पर्यटन विकासामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आई-वडीलांनी मंदार पर्वतावरील गुरुपाय आश्रमातून दिक्षा घेतली आहे. गुरुंच्या दर्शनासाठी त्यांच्या मातोश्री या पर्वतावर वारंवार येत. त्यामुळे आपणही या पर्वतावर जावून गुरुंचे दर्शन घ्यावे अशी राष्ट्रपती मुखर्जींची इच्छा होती. त्यानुसार राष्ट्रपतींचा दौरा निश्‍चित झाला. स्वातंत्र्यकाळापासून राष्ट्रपतींचा हा पहिलाच दौरा असल्याने या दौऱ्याची संपुर्ण जबाबदारी बिहार राज्य सरकारने जिल्हाधिकारी डॉ.निलेश देवरे यांच्यावर सोपविली होती. बांका हा संपुर्ण नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून परिचित असल्याने राष्ट्रपतींची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवणे अत्यंत आवश्‍यक होते. जिल्हाधिकारी डॉ.देवरे यांनी या दौऱ्यात 4 मिग हेलिकॉप्टर उतरण्यासाठी विशिष्ठ आकाराची मोठी हेलिपॅड्‌स व प्रोटोकॉलनुसार गाड्यांची व्यवस्था केली होती. महिनाभरापासून या सर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ.देवरे यांनी घेतला होता.

पर्वतावरील कार्यक्रमात बिहार राज्य शासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ.देवरे यांनी राष्ट्रपतींचा सन्मान करावा असा आग्रह करण्यात आला. त्यानुसार डॉ.देवरे यांनी स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र देवून राष्ट्रपती मुखर्जी यांचा सन्मान केला. यावेळी राष्ट्रपतींनीही आपल्या भाषणात मंदार पर्वत परिसरात डॉ.देवरे यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून या कामांबद्दल त्यांचा विशेष गौरवही केला. यावेळी केंद्रीय कौशल्यविकास मंत्री राजीव प्रताप रुडी हे देखील उपस्थित होते.

डॉ.निलेश देवरे हे मुळचे करंजाड (ता.बागलाण) येथील रहिवासी असून सन 2010 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झाले होते. या परिक्षेत त्यांनी देशात 165 वा तर महाराष्ट्रात पाचवा क्रमांक मिळविला होता. उत्तीर्ण होण्यापुर्वी डॉ.देवरे यांनी बिहार राज्यातील सासाराम जिल्ह्यात एक वर्ष सहाय्यक जिल्हाधिकारी तर त्यानंतर पटना जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी म्हणून सेवा बजावली होती. पटना जिल्ह्यातील चांगल्या कामाची दखल घेत मुख्यमंत्री मांझी यांनी स्वत: लक्ष घालून डॉ.देवरे यांची गया महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली होती. यानंतर त्यांची आता बांका जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली असून 2 ऑक्‍टोबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचे आयोजनही डॉ.देवरे यांनी यशस्वीरित्या केले होते.

Web Title: Dr. Nilesh Devre development on Mandara mountain in Bihar