टोकियोत जागतिक 'हेल्थ 20' परिषद; डॉ. रवी वानखेडकर मांडणार भारताची बाजू 

Ravi Wankhedkar
Ravi Wankhedkar

धुळे : सांख्यिकीय आकडेवारीतून देश आरोग्यदृष्ट्या सुदृढ दर्शविण्याचा प्रयत्न त्या- त्या सरकारकडून होताना दिसतो. तरीही यातील विषमता लपून राहिलेली नाही. दिवसागणिक वैद्यकीय सेवा महागडी होत आहे. यावर नेमके काय उपाय करावेत आणि सर्वांना माफक दरात, उत्तम आरोग्य सेवा कशी मिळू शकते, यावर भारताची भूमिका जागतिक वैद्यकीय संघटनेचे कोशाध्यक्ष तथा "आयएमए'चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर हे टोकियो (जपान) येथील जागतिक हेल्थ 20 या वैद्यकीय परिषदेत मांडणार आहेत. 

टोकियोत उद्यापासून (ता. 13) ही दोनदिवसीय परिषद होत आहे. तीत जागतिक वैद्यकीय संघटनेवर प्रथमच भारताचे प्रतिनिधित्व करणारे येथील डॉ. वानखेडकर सहभागी होतील. ही धुळ्यासह खानदेशसाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.

टोकियोत जूनअखेर "जी 20' मधील वीस राष्ट्रांची परिषदही होणार आहे. "जी 20'मध्ये भारत सदस्य आहे. त्यापूर्वी जागतिक वैद्यकीय संघटनेच्या पुढाकाराने जगात प्रथमच टोकियो येथे "हेल्थ 20' ही आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. तीत डॉ. वानखेडकर यांच्यासह "जी 20'मधील राष्ट्रांचे वीस प्रतिनिधी विचार मांडतील. या परिषदेत झालेले निर्णय "जी 20'च्या परिषदेत सहभागी होणाऱ्या राष्ट्रप्रमुखांपुढे मांडले जातील. 

देशात खिशातूनच खर्च 
या पार्श्‍वभूमीवर डॉ. वानखेडकर म्हणाले, की भारताच्या आरोग्य सुधारणेला दिशा मिळावी आणि प्रभावी उपाययोजना राबविल्या जाव्यात म्हणून टोकियोत होत असलेल्या परिषदेत सखोल विचारमंथन होईल. देशात आजही एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 70 टक्के नागरिक स्वखर्चातून आरोग्य सेवा विकत घेत आहेत. हे प्रमाण जगात सर्वाधिक भारतात आहे. त्यामुळे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत तीन टक्के म्हणजेच 40 लाख नागरिक दरवर्षी दारिद्य्राच्या खाईत लोटले जातात.

देशाच्या एकूण अर्थसंकल्पीय रकमेत आरोग्य सुविधेवर केवळ एक टक्का तरतूद केली जाते. ती किमान 3.8 टक्के होणे गरजेचे आहे. देशात पोलिओ निर्मूलन वेगाने झाले तरी इतर लसीकरणाच्या मोहिमा पुरेशा प्रमाणात यशस्वी झालेल्या नाहीत. महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडूची आरोग्यविषयक सांख्यिकीय आकडेवारी समाधानकारक असली, तरी तुलनेत या आधारावर इतर अनेक राज्ये अद्याप आजारीच आहेत. ब्रिटन, अमेरिका, न्यूझीलंड, जर्मनीत "युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज' चांगले आहे. म्हणजेच त्याप्रमाणे भारतात सर्वांना चांगली, उत्तम व माफक दरात वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

"आयुष्यमान भारत' विस्तारावी 
आयुष्यमान भारत योजनेत उपचारार्थ दाखल झाल्यावरच लाभ मिळण्यास सुरवात होते. वास्तविक, प्राथमिक आरोग्य केंद्र, सुविधा या योजनेच्या कक्षेत आणणे गरजेचे आहे. तसे झाल्यास सर्वांना आयुष्यमान भारत योजनेचा खऱ्या अर्थाने लाभ मिळू शकेल. तसेच देशात 1980 मध्ये शासकीय रुग्णालयांमधून 70 टक्के औषधे मोफत मिळत होती. हे प्रमाण आता 35 ते 36 टक्‍क्‍यांवर आले आहे. रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागतात. यात जेनरिक औषधांचा प्रयोग संशोधनाचा भाग ठरत असल्याचे डॉ. वानखेडकर यांनी सांगितले. या पार्श्‍वभूमीवर भारतात "युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज' कसे चांगल्या पद्धतीने मिळू शकेल, त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याविषयी डॉ. वानखेडकर सविस्तर भूमिका परिषदेत मांडतील. यात उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची असल्याने "हेल्थ 20' परिषदेतील निर्णय "जी 20' परिषदेत मांडले जातील. त्यामुळे देशातील विविध समस्यांवर मार्ग निघू शकेल, असे डॉ. वानखेडकर यांनी सांगितले. "जी 20' आणि "एच 20'मध्ये भारत, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्‍सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, उत्तर कोरिया, तुर्की, इंग्लंड आणि अमेरिकेचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com