'डाॅ. टोणगावकर मेश' जागतिक संशोधकांच्या यादीत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

धुळे : स्वित्झर्लंडमधील "स्प्रिंजर' या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या "मॅनेजमेंट ऑफ ऍबडॉमीनल हर्नियाज' (Management of Abdominal Hernia's) या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीत हर्नियावर मूलभूत संशोधन करणाऱ्या जगातील 47 व्यक्तींच्या यादीत दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर यांचा समावेश झाला आहे. या यादीत भारतातील ते एकमेव डॉक्‍टर आहेत. त्यांच्या रूपाने धुळे जिल्ह्याची कीर्ती पुन्हा सातासमुद्रापार गेली आहे. ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. 

हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी बाजारातील महागड्या जाळीला पर्याय म्हणून मच्छरदाणीच्या कापडाचा वापर करण्याचा प्रयोग डॉ. टोणगावकर यांनी सुरू केला. तो आता जगभरातील 28 देशांतील डॉक्‍टर वापरतात. या जाळीच्या संशोधनाची दखल घेत स्वित्झर्लंडमधील स्प्रिंजर या प्रकाशन संस्थेने "मॅनेजमेंट ऑफ ऍबडॉमीनल हर्नियाज' या पुस्तकात घेतली. 

डॉ. टोणगावकर म्हणाले, की हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी 2003 पासून नव्या मच्छरदाणीच्या कापडाचा वापर सुरू केला. ही जाळी विदेशी जाळीपेक्षा चार हजार पटींनी स्वस्त हे लक्षात आल्यावर तिचा रुग्णांवर वापर सुरू केला. या कापडाचा कोणताही दुष्परिणाम झाल्याचे समोर आले नाही. हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी महागड्या विदेशी जाळीचा उपयोग व्हायचा, त्याचा भुर्दंड रुग्णांना सोसावा लागत होता. 

भारतात जांघेतील हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी परदेशी जाळीची किंमत दोन हजार होती. डॉ. टोणगावकरांनी संशोधित केलेल्या मच्छरदाणीच्या जाळीसाठी फक्त 50 पैसे लागतात. पोटाच्या मोठ्या हर्नियासाठी बाजारातील जाळीची किंमत दहा हजार रुपये असते, तर डॉ. टोणगावकरांनी संशोधित केलेल्या जाळीला फक्त दोन रुपये लागतात. भारतासह विदेशातील अनेक डॉक्‍टरांनी या जाळीचा उपयोग सुरू केला. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्जन प्रो. टेहेमटन उडवाडिया यांच्या सहकार्यामुळे हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी मच्छरदाणीचा वापर हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याचे डॉ. टोणगावकरांनी आवर्जून नमूद केले.

आज मागासलेल्या 28 देशांमध्ये मच्छरदाणीच्या कापडाचा वापर सुरू आहे. गेल्या 18 वर्षांत भारतासह जगभरात साधारण 35 हजारांवर हर्नियाच्या शस्त्रक्रिया या जाळीचा वापर करून केल्या गेल्या. त्यामुळे बाजारातील महागड्या जाळीच्या तुलनेत रुग्णांचे जवळपास 15 कोटी रुपये वाचल्याचे डॉ. टोणगावकर यांनी सांगितले. भारतासह विदेशातील डॉक्‍टरांना ही जाळी आपण मोफत पाठवीत असतो, असेही ते म्हणाले. या महत्त्वपूर्ण संशोधनाची दखल प्रो. किंग्जनॉर्थ यांनी "मॅनेजमेंट ऑफ ऍबडॉमीनल हर्नियास' या पुस्तकात घेतली.

पुस्तकातील "बायोग्राफिकल नोट्‌स' या प्रकरणात गेल्या तीनशे वर्षांत ज्या शास्त्रज्ञांनी हर्नियावर मूलभूत संशोधन केले. अशा 47 व्यक्तींच्या यादीत दोंडाईचासारख्या ग्रामीण शल्यचिकित्सकाचा समावेश होणे बाब खूप मोठी व म्हणूनच आनंदाची असल्याचे डॉ. टोणगावकर म्हणाले.

Web Title: Dr Tangaonkar Mesh In the list of global researchers