सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आराखड्याचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

जळगाव - राज्य शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरातील नवीन व जुन्या जलवाहिन्यांचे काम होणार आहे. याच योजनेंतर्गत शहरातील सर्व भूमिगत गटारी तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामाचा आराखडा राज्य शासनाने मागितला आहे. दरम्यान, या कामांचा आराखडा तयार करण्यास सुरवातही झाली आहे.

जळगाव - राज्य शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरातील नवीन व जुन्या जलवाहिन्यांचे काम होणार आहे. याच योजनेंतर्गत शहरातील सर्व भूमिगत गटारी तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामाचा आराखडा राज्य शासनाने मागितला आहे. दरम्यान, या कामांचा आराखडा तयार करण्यास सुरवातही झाली आहे.

राज्य शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरातील ४६६ किलोमीटरच्या नवीन जलवाहिनीच्या कामांसाठी २४९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कामांसाठी निधी मंजूर झाला असून, कामांच्या निविदांवर मक्तेदारांनी घेतलेल्या आक्षेपावर राज्य शासनाकडून निर्णय येणे बाकी आहे. अमृत योजनेंतर्गत संपूर्ण शहरातील भूमिगत गटारी केल्या जाणार आहेत. या गटारांतून निघणाऱ्या सांडपाण्यावर शहराबाहेर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पाचे कामही होणार असून, या कामांसाठी सुमारे तीनशे कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार आहे. या कामांच्या आराखड्याचे काम जीवन प्राधिकरण विभागाकडून केले जाते. त्यानुसार आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेकडे दहा लाख रुपयांची मागणी केली असून, लवकरच हा आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरवात होणार असल्याची माहिती शहर अभियंता थोरात यांनी दिली. 

महिनाभरात काम पूर्ण होणार
अमृत योजनेंतर्गत शहरातील भूमिगत गटारी, तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाचा आराखडा शासनाने मागितला आहे. त्यानुसार या कामाच्या आराखड्याचे काम सुरू करण्याबाबतच्या प्रक्रियेस सुरवात झाली आहे. याबाबत बैठकीत नियोजन ठरवून महिनाभरात हे काम पूर्ण करून शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे.

निविदा उघडण्यासाठी प्रतीक्षा
अमृत योजनेच्या फेरनिविदेत आलेल्या निविदांमध्ये एका मक्तेदाराने तांत्रिक बाबींवर आक्षेप घेऊन तक्रार केली होती. याबाबत नाशिक येथील जीवन प्राधिकरण विभाग समितीकडे पत्र पाठविण्यात आले असून, या समितीने निविदा प्रक्रिया योग्य असल्याचे मत नोंदविले आहे. आता हा विषय राज्य शासनाकडे गेला आहे. परंतु, अद्याप यावर निर्णय झालेला नाही. जीवन प्राधिकरण विभागाने यासंदर्भात शासनाशी पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेला त्यासंबंधी पत्र दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: dranage water processing project work plan