ड्रोनने उडविली पोलिसांची झोप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

नाशिक - त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या प्रतिबंधित क्षेत्राचे छायाचित्रण ड्रोनच्या छुप्या कॅमेऱ्यात केल्याप्रकरणी ड्रोनची नोंद असलेल्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली. मात्र, हाती काहीही लागलेले नाही. शहरात अनेकांनी ड्रोन खरेदी केलीय. मात्र, किती जणांकडे ड्रोन आहेत, याचीही नोंद नसल्याचेही यानिमित्त समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांची झोप उडाली आहे. 

महाराष्ट्र पोलिस अकादमीत पोलिस उपअधीक्षकांपासून ते उपनिरीक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. पोलिस अधिकारी व विशेष कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणवर्ग घेतले जातात. अतिसंवेदनशील असलेल्या अकादमीची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. तेथे छायाचित्रणास प्रतिबंध आहे. चोख सुरक्षव्यवस्था असतानाही शुक्रवारी (ता. ३०) अकादमीच्या मैदानात जॉगिंग करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना अकादमीच्या क्षेत्रात ड्रोन उडत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ही बाब अकादमीच्या अधिकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर ड्रोन बेपत्ता झाले. घटनेची वाच्यता होताच पोलिस आयुक्तालयाने गंगापूर पोलिसांना कळविले. तत्काळ शोध सुरू झाला. मात्र, तीन दिवस उलटूनही ड्रोन कोणाचे होते आणि काय उद्देश होता, याचा शोध लागलेला नाही.

पोलिसांकडे नोंद असलेल्या ड्रोनमालक-चालकांना चौकशीसाठी बोलावले. कसून चौकशीनंतरही त्यांच्यापैकी कोणीही त्या क्षेत्रात ड्रोन उडविला नसल्याचे सांगितले. चौकशीतून नोंदी झालेल्या व्यक्तिव्यतिरिक्त अनेकांनी ड्रोन खरेदी केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यासंदर्भातही शोध घेतला असता, शहरात ड्रोन विक्री करणारा कोणीही नाही. त्यामुळे मुंबईतही चौकशी झाली. त्यांच्याकडेही ड्रोन विक्री केल्याची नोंद नाही. यामुळे तीन दिवसांच्या चौकशीतून पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही. ड्रोनच्या माध्यमातून छायाचित्रण केले असल्यास यामागे काही घातपाताचा कट तर नाही ना, असा संशय बळावत आहे. त्या ‘ड्रोन’ने पोलिसांची झोप उडविली आहे.

Web Title: Drone Police