दुष्काळ उठला शेतकऱ्यांच्या जिवावर 

दीपक कच्छवा
मंगळवार, 28 मे 2019

वाढत्या उन्हामुळे केळी करपू लागली 
गिरणा परिसरात उसासह केळीची देखील लागवड झालेली आहे. जमिनीतील पाण्याचा स्रोत कमी झाल्याने रात्रंदिवस चालणाऱ्या विहिरी वीस मिनिटांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे केळीला पाणी मिळणे कठीण झाले आहे. अशातच वातावरणात उन्हाची तीव्रता कमी होण्याचे नाव घेत नसल्याने वाढत्या उन्हामुळे केळी करपू लागली आहे. परिणामी, ऊस उत्पादकांसह केळी उत्पादकांनाही यंदा मोठा फटका बसला आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव)  : ‘हिरवी पालवी झडली उन्हाच्या तप्त झळांनी. हिरवीगार पिके वाळली भर उन्हाच्या ज्वालांनी...’ या कवी संजय सोनवणे यांच्या ‘दुष्काळ’ कवितेतील ओळींचा प्रत्यय गिरणा पट्ट्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात दिसून येत आहे. डोळ्यांसमोर हिरवीगार असलेली पिके करपत आहेत. त्यामुळे यंदाचा दुष्काळ शेतकऱ्यांच्या जिवावरच उठल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे उभ्या पिकांची लाहीलाही होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

तालुक्यातील मेहुणबारे, वरखेडे, तिरपोळे, लोंढे, दरेगाव, उंबरखेडे, पिंपळवाड म्हाळसा, धामणगाव, टाकळीसह अनेक गावांमध्ये उसाची लागवड करण्यात आली आहे. यापूर्वी लागवड झालेल्या चार हजार हेक्टर क्षेत्रावर दुपटीने वाढ झाली असून सद्यःस्थितीत सुमारे आठ हजार हेक्टरवर उसाची लागवड झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. यावर्षी पिण्याच्या पाण्यासाठी परिसरात भटकंती करावी लागत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ऊस आहे अशांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. केवळ ज्यांच्या विहिरींना थोड्या फार प्रमाणावर पाणी आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस काहीसा हिरवागार आहे. इतर भागात मात्र ऊस पिवळसर पडून सुकण्याच्या मार्गावर दिसत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने क्रेनच्या साहाय्याने गाळ काढण्यासह विहिरीतील खडक फोडण्याची कामे सुरू आहेत. मागील वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कपाशीला पाहिजे तसा भाव मिळाला नाही. ही परिस्थिती पाहता बळीराजाला शेती नकोशी झाली आहे. 

डोळ्यांसमोर जळतोय ऊस 
चाळीसगाव तालुक्यात तीन वर्षापासून अत्यंत कमी पावसामुळे गिरणा परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले आहे. मागीलवर्षी चार ते पाच हजार हेक्टरच्या आसपास उसाची लागवड होती. यावर्षी पाऊस कमी प्रमाणात असला तरी गिरणा धरणातून सुटणाऱ्या आवर्तनामुळे नदीकाठच्या विहिरींना पाणी असते. या पाण्याच्या उपलब्धतेवर यंदा आठ हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. उर्वरित क्षेत्रावर मात्र उसाचे पीक अक्षरशः जळताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सर्वाधिक ऊस लागवड ही २६५, ६०३२, २३८ व ८६०५ या जातीची असून यासोबतच इतरही जातीच्या उसाची लागवड झालेली आहे. मात्र, हे पीक सुकू लागल्याने बळीराजा हताश झाला आहे. 

काहींनी सोडले तर काहींनी विकले 
राज्यात सर्वत्र दुष्काळाचे चटके बसत असल्याने चारा व पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गिरणा परिसरात बहुतांश शेतकऱ्यांनी उसासह केळीची लागवड केली आहे. मात्र, पाण्याअभावी सुकत चाललेल्या कच्यापक्या उसाची तोडणी करून शेतकरी चारा म्हणून विकताना दिसत आहे. चाऱ्यासाठी जाणाऱ्या या उसाला २ हजार ३०० ते २ हजार ४०० रुपये टनाचा भाव मिळत आहे. या उसाच्या बांडी व पाचटसह वजन केले जात असल्याने चांगला भाव मिळत आहे. मात्र, काही प्रमाणात हिरवागार असलेल्या उसाला तीन हजार रुपये टनाचा भाव मिळेल, अशी आशा संबंधित शेतकऱ्यांना असल्याने त्यांनी उसाचे क्षेत्र राखून ठेवले आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत उसाचा चारा चाळीसगावसह धुळे जिल्ह्यातील शिरूड, तरवाडे तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगावसह इतर गावांमधील शेतकरी घेऊन जात आहेत. ज्यांच्याकडे उसाला देण्यासाठी पाण्याचा एक थेंब देखील नाही किंवा ज्यांना पावसाची अपेक्षा आहे, 
अशांनी आपल्या उसाचे क्षेत्र सोडून दिल्याचे दिसत आहे. 

वाढत्या उन्हामुळे केळी करपू लागली 
गिरणा परिसरात उसासह केळीची देखील लागवड झालेली आहे. जमिनीतील पाण्याचा स्रोत कमी झाल्याने रात्रंदिवस चालणाऱ्या विहिरी वीस मिनिटांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे केळीला पाणी मिळणे कठीण झाले आहे. अशातच वातावरणात उन्हाची तीव्रता कमी होण्याचे नाव घेत नसल्याने वाढत्या उन्हामुळे केळी करपू लागली आहे. परिणामी, ऊस उत्पादकांसह केळी उत्पादकांनाही यंदा मोठा फटका बसला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drought affect on farmers in Chalisgaon