दुष्काळातही द्राक्ष निर्यातीचा ५ वर्षांतील उच्चांक

रासायनिक अंशविरहित द्राक्षे पिकविल्याबद्दल भाऊसाहेब बोराडे यांचा सत्कार करताना.
रासायनिक अंशविरहित द्राक्षे पिकविल्याबद्दल भाऊसाहेब बोराडे यांचा सत्कार करताना.

येवला - ज्या तालुक्‍यात शंभर गावे टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवतात, त्या तालुक्‍यात द्राक्षाचे पीक जोमात आले आणि तब्बल तीन हजार ७८६ टन द्राक्षे परदेशात दिमाखात रवाना झाली, असे सांगितले तर आश्‍चर्य वाटेल, पण येवल्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी टंचाईवर अनेक पर्याय शोधत ही किमया साधली. विशेष म्हणजे, दुष्काळातही गेल्या पाच वर्षांतील उच्चांकी निर्यात शेतकऱ्यांच्या हिमतीमुळे झाली.

ब्रिटिशकालीन दुष्काळी असे बिरूद मिरवणाऱ्या येवला तालुक्‍यात पाणीटंचाईवर शेततळ्यांचा पर्याय स्वीकारत शेतकऱ्यांनी जिरायती शेतीलाही बागायती केल्याची अनेक उदाहरणे आहेत. यामुळे मका, कपाशी, कांद्यासोबतच शेतकऱ्यांनी बांबू, स्कॉट बोनेट मिरची, केसर आंबा, हळद, केळी, शेवगा व आले या नावीन्यपूर्ण पिकांची यशस्वी शेती करून अनेकांना मोहिनी घातली. पालखेड लाभक्षेत्रातील पाटोदा परिसरातील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून शेततळ्याच्या पाण्यावर आपली शेती हिरवीगार करत द्राक्षाच्या टुमदार बागा फुलविल्या आहेत. एकट्या पाटोदा परिसरातच २२०, तर मुखेड परिसरात १५० हेक्‍टर द्राक्षबागा तालुक्‍यात असून, कातरणीसारख्या टंचाईग्रस्त गावातदेखील ३८ एकर द्राक्षबाग फुलविण्याची किमया शेतकऱ्यांनी साधली. यंदा कृषी विभागाकडे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी ५५४ शेतकऱ्यांनी ३०३ हेक्‍टर क्षेत्र अन्‌ सुमारे सात हजार ५८५ टन द्राक्ष निर्यातीची नोंदणी केली होती. नवीन नोंदणीवाले २३३, तर नूतनीकरण  करणारे ३२१ पैकी २८५ शेतकऱ्यांची १५१ हेक्‍टरवरील द्राक्षांची निर्यात होऊ शकली. देशमाने, मुखेड, सोमठाण देश, शिरसगाव, मानोरी आदी गावांतील शेतकऱ्यांनी मेहनतीने थॉमसन, क्‍लोन-२, सोनाका, शरद सीडलेस, क्रीम सन जातींची द्राक्षांची निगा राखत निर्यातक्षम उत्पादनही केले आहे. या शेतकऱ्यांनी ‘अपेडा’सह निर्यातदारांच्या मदतीने ३७८६ टन द्राक्ष यूके, नेदरलॅंड, रशिया, चीन, बांगलादेश आदी ठिकाणी पाठवली आहेत. 

साधारणतः एक ते तीन एकरांमधील द्राक्षे प्रत्येकाने निर्यातीसाठी पाठवली. यातील रासायनिक अंशविरहित द्राक्षांना ७५ रुपयांपेक्षा अधिक, तर ४ अंशांपर्यंत ४० रुपयांचा किलोचा भाव मिळाला. निगा राखत निर्यातक्षम उत्पादित केल्याने ‘अपेडा’सह निर्यातदारांच्या मदतीने द्राक्ष यूके, रशिया, बांगलादेश, जर्मनी, नेदरलॅंड, इटली, स्पेन, स्विझर्लंड आदी देशांत पोचली आहेत. शेतकऱ्यांना मार्गदर्शनासह नोंदणीसाठी तालुका कृषी अधिकारी अभय फलके, फायटो सॅनेटरी इन्स्पेक्‍टर प्रकाश जवणे, साईनाथ कालेकर यांचे सहकार्य मिळाले.

पाणीटंचाई असताना शेततळे, ठिबक सिंचनाचा पर्याय वापरला. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने वेळोवेळी पिकावर फवारण्या आणि आपत्तीत काळजी घेता आली. फोर-बी व इतर ऑनलाइन नोंदी घेताना सुटीच्या दिवशीदेखील कृषी विभागाने मदत केली. भयानक दुष्काळ असताना आमचे उत्पादन परदेशात गेल्याचा अभिमान आहे. 
- रतन बोरणारे, द्राक्ष उत्पादक, पाटोदा 

सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये पावसाने नुकसान करूनही शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक यावर मात केली. मागील दहा वर्षांत द्राक्ष निर्यातीचा आलेख उंचावत राहिला असून, यंदा तर विक्रमी निर्यात झाली आहे. मेहनत, जिद्द व निगा राखल्याने या वर्षी रासायनिक अंशविरहित द्राक्षे शेतकऱ्यांनी पिकविली. फायटो सॅनेटरी इन्स्पेक्‍टर प्रकाश जवणे, साईनाथ कालेकर यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. 
- अभय फलके, तालुका कृषी अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com