वाढत्या उष्णतेचा वीटभट्ट्यांना फटका 

chalisgaon
chalisgaon

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : तालुक्यात पाणीटंचाई आणि दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस गडद होत चालल्याने दोन वर्षांपासून वीटभट्टी व्यवसायाला घरघर लागली आहे. वाढत्या उष्णतेमुळे तालुक्यातील ४८ पैकी २१ वीटभट्ट्या बंद पडल्या आहेत. वीटभट्टीचालकांना सद्यःस्थितीत दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. 

चाळीसगावचा गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार विटा तयार करण्यामध्ये नावलौकिक होता. मात्र, तालुक्यात अत्यल्प पडणाऱ्या प्रत्येक वर्षी एक-दोन करीत वीटभट्टी मालकांचे विटा थापण्याचे काम कायमस्वरूपी बंद पडत आहेत. मातीपासून विटा तयार करायला खूप परिश्रम करावे लागत असल्याने त्यासाठी मजूरही उपलब्ध होत नाहीत. मजूर मिळाले तरी त्यांना अधिक मजुरी द्यावी लागत असल्याने हा व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. ऊस तोडणीसाठी जसे मजूर शोधावे लागतात, तशाच प्रकारे विटभट्टीचालकांनाही मजुरांना शोधून आणावे लागत आहे. सद्यःस्थितीत कुठेही पाणी नसल्याने हा व्यवसाय डबघाईला आला आहे.  

उचलनंतरच मिळतात मजूर
पाणीटंचाई, वाढती मजुरी, मजुरांची कमतरता, महागलेला कोळसा, मातीची टंचाई आदींमुळे वीटभट्टी व्यावसायिक हतबल झाले आहेत. त्यामुळे त्यांना वीटभट्टी व्यवसाय बंद करावा लागत आहे. मजुरांना पन्नास हजार रुपयांच्यापुढे उचल द्यावी लागत असल्याने मध्येच कायमस्वरूपी विटा तयार करणाऱ्या कामगारांना ऊस तोडणीचे वेध लागतात. कारण त्या ठिकाणी एक लाखाहून अधिक उचल मिळते, म्हणून विटा तयार करणारे कामगारांना ऊस तोडणीसाठी जातात. यामुळे कामगार जाऊ नये यासाठी त्यांना करारबद्ध केले जाते. 

माती, पाणीटंचाईचा सामना 
चाळीसगाव तालुक्यातील सर्व लघु व मध्यम प्रकल्प ठणठणाट आहे. विहिरींची पातळीही प्रचंड खालावली आहे. पाणीटंचाईचे चटके वीटभट्टी व्यावसायिकांनाही चांगलेच बसत असल्याने ते हवालदिल झाले आहेत. विना चुनखडीची, लाल-तांबडी, चिकट, भस्सर मुरूमची आणि नदीचा गाळ असलेली माती विटा तयार करण्यासाठी उपलब्ध होत नाही. विटा तयार करण्यासाठी गुणवत्तापूर्ण माती या भागात तरी कुठेही मिळत नाही. त्यात सततच्या दुष्काळामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेतीलाही पाणी नाही. माणसांना, गुरांना पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे विटा तयार करण्यासाठी पाणी कसे मिळणार? असा प्रश्न वीटभट्टी व्यावसायिकांना पडला आहे.

विटभट्टटी रचण्याची कला 
वीटभट्टी रचणे हे देखील एक कसब आहे. प्रत्येक थरात व थरातील प्रत्येक ओळीत हवेसाठी पोकळी ठेवावी लागते. भट्टी रचताना त्यात लाकडाचा भुसा, लाकडी पट्ट्या व तुकडे वापरले जातात. त्याची योग्य रचना झाल्यावर भट्टी पेटवली जाते. त्यातून आतल्या बाजूलाच ज्वाला उडतात. सध्याच्या दुष्काळी तडाख्यात आता विटभट्या रचणे तर दूरच परंतु तयार विटा देखील विकल्या जात नाही. पाण्याअभावी बांधकामे रखडलेली आहेत. आजही बहुतांश वीटभट्टींवर तयार विटांच्या भट्ट्या ओस पडल्या आहेत. विटा विकल्या जात नसल्याने व्यवसायिक  कर्जबाजारी होत असल्याचे एका वीटभट्टी चालकाने सांगितले. 

शासनाच्या मदतीची गरज 
या व्यवसायाला गरज आहे ती शासनाकडून सहकार्याची. सुरुवातीला खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे कर्जरूपाने ५० टक्के अनुदान स्वरूपात या व्यवसायाला वित्त पुरवठा केला जायचा. सद्यःस्थितीत तो होत नसल्याने शासनाकडून अनुदानप्राप्त वित्तीय मदत मिळाली तरच नुकसानीत असलेला हा व्यवसाय भविष्यात तग धरू शकेल आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने ‘विठ्ठलाचे पायी वीट झाली भाग्यवंत’ असे म्हणताना वीट व्यावसायिक निश्चितच सुखावतील.

विटभट्टिसाठी माती मिळणे कठीण झाले आहे.चार ते पाच वर्षांत मातीची विट दुर्मिळ होणार असून अशी दुष्काळी परिस्थिती राहिल्यास आम्हाला हा व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय नाही. माल विक्री होत नसल्याने मजुरांना ठेवणे कठीण झाले असून शासनाने यासाठी मदत विटभट्टि व्यवसायाला मदत करावी. 
- सुभाष निकम, विटभट्टि व्यवसायिक मेहुणबारे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com