येवला - खरीप मातीत, आता रब्बी तरी पिकू दे

yeola
yeola

येवला - बिगर पावसात अख्खा खरीप हंगाम वाया गेल्याचे प्रथमच अनेक शेतकऱ्यांनी यंदा पाहिले.यामुळे खरिपाची पिके मातीतच गेली पण ही झीज भरून काढण्यासाठी एक-दोन मुसळधार पाऊस पडून रब्बी हंगाम फुलू दे अशी आर्त हाक बळीराजा देत आहे. पोळा, गणपती कोरडा गेला तरी नवरात्राकडून पावसाची अपेक्षा अजूनही आशावादी शेतकऱ्यांना आहे.

परिसरातील खरीप हंगामातील पिके पावसा अभावी करपलेली आहेत. खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे. जून, जुलैमध्ये रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. परंतु पुन्हा पाऊस पडला नाही. त्यामुळे हातातोंडला आलेली पिके वाया गेली. पिके जागेवर करपल्याने खरीप वाया गेला आहे. खरीपात शेतीला लावलेले भांडवलही मका,कांदे,सोयाबीन,कपाशीची झालेली वाताहात पाहता मिळणार नाही.यामुळे चिंताग्रस्त शेतकरी आता तरी वरुणराजाने कृपा करावी आणि मुसळधार पाऊस पाडून रब्बी फुलवावा अशी वाट पाहून आहेत.यामुळे झालेले नुकसान तरी भरून निघेल अशी अपेक्षा आहे.

तलाव,बंधारे,विहिरी कोरड्या पडल्या असून चारा व पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. गुरे-ढोरे जगवायची कशी असा गंभीर प्रश्न आहे.खरीप तर गेला पुढे रब्बीची पेरणी होतेय का नाही याच चिंतेत शेतकरी आहे. हा दुष्काळी तालुका रब्बीमुक्त होतो कि काय याची भीती वाटत आहेत. तालुक्यातच्या शासकीय नोंदीत १२४ पैकी ५२ गावेच रब्बीची आहेत.तथापि,शंभरवर गावात रब्बीची पेरणी होते.पण पालखेड डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ४२ गावात हंगाम निघण्याची शश्वती असते. मात्र आजचे या भागातले चित्र पाहता पुढे आवर्तनाचे व रब्बीचे खरे नसल्याचे दिसते.तालुक्याचे खरिपाचे क्षेत्र ५३ हजार हेक्टर तर रब्बीचे क्षेत्र १३ हजार ४८६ हेक्टर आहे.त्यातही सर्वच शेतकरी आगाद पेरणी करतात, म्हणून जी काय होते ती पेरणी मार्गी लागते.यावेळी रब्बीचे भवितव्य आता परतीच्या पावसावरच अवलंबून आहे.

“कर्ज काढून शेतीला भांडवल लावले.पण आता हातात खर्चही पडतो कि नाही अशी स्थिती आहे.वरुणराजाने कृपा केली तर रब्बी निघणार आहे.सध्याची स्थिती पाहता शासनाने दुष्काळ जाहीर करावा व खरीपातील पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.”
-अनिल रा. वाघ,शेतकरी,राजापूर

असे आहे रब्बीचे क्षेत्र (हे.)
पीक  = येवल्यातील सरासरी क्षेत्र  = जिल्ह्याचे प्रस्तावित क्षेत्र
ज्वारी  = १३६०      = ४४२०
गहू    = ८०२३      = ७००००
मका   = २४      =  ३००० 
हरभरा    = ४१०३     = ४१०००
कांदा  =  ११५२५  ==     ---
बाजरी =    ००    = २००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com