मद्यधुंद मुख्याध्यापकाची आदिवासी विद्यार्थ्यांना मारहाण

मद्यधुंद मुख्याध्यापकाची आदिवासी विद्यार्थ्यांना मारहाण

मोखाडा : मोखाड्यातील सूर्यमाळ येथील शासकीय आश्रमशाळेतील आदिवासी मुलांना गेल्या दोन दिवसांपासून येथील मुख्याध्यापक रमेश नंदनने दारूच्या नशेत मारहाण करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्याथीॅ, पालक आणि स्थानिक व्यवस्थापन समितीने या मुख्याध्यापकावर कठोर कारवाईची मागणी केली. याबाबत एक निवेदन प्रकल्प अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे देण्यात आले. 

आदिवासी मुलांच्या निवासी शिक्षणासाठी शासनाने आश्रमशाळांची स्थापना केली. या आश्रमशाळा सोयी-सुविधांविषयी नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. मात्र, त्यापुढे जाऊन मोखाड्यातील सुर्यमाळ शासकीय आश्रमशाळेच्या रमेश नंदन या मुख्याध्यापकाने 26  व  27 फेब्रुवारीला रात्री दारूच्या नशेत खोलीचा दरवाजा बंद करून सुमारे 25 ते 30 विद्यार्थ्यांना मारहाण केली. या मारहाणीत काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यामधील नामदेव वाघमारे या विद्यार्थ्याला खोडाळ्यातील दवाखान्यात उपचार करण्यात आले आहे. तर या मुख्याध्यापकाने अर्वाच्च भाषेत विद्यार्थ्यांना जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच या घटनेची कोणालाच माहिती न देण्याचा सज्जड दमही दिला. 

ऐन परीक्षेच्या तोंडावर मारहाण झालेल्या या विद्यार्थ्यांना ही बाब आपल्या पालकांना व स्थानिक व्यवस्थापन समितीला सांगितली. त्यामुळे सकाळी संतप्त झालेल्या पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सदस्यांनी आश्रमशाळेत येऊन जाब विचारला. मात्र, मुख्याध्यापक रमेश नंदन येथून फरार झाला. त्यामुळे पालक, विद्यार्थी व व्यवस्थापन समितीने जव्हारला जाऊन प्रकल्प अधिकारी अजित कुंभार यांना निवेदन देऊन मुख्याध्यापक नंदनवर कठोर कारवाईची मागणी केली. 

''दोन दिवसांपासून नंदन सर आम्हाला दारू पिऊन मारहाण करत आहेत. त्यांच्याकडून आम्हाला मिळेल त्या जागेवर मारहाण केली गेली. पहिली, दुसरीपासून अकरावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला त्यांनी मारले. तुमचे आई, बाप माझ्याकडे भीक मागायला येतात, असे सांगून त्यांनी आम्हाला शिवीगाळही केली आहे''

- निलेश भगरे, मारहाण झालेला विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com