नाशिक - ठिय्या आंदोलनामुळे नळजोडणीचे काम सुरू

राजेंद्र बच्छाव
मंगळवार, 10 एप्रिल 2018

इंदिरानगर (नाशिक) : प्रभाग क्रमांक 30 वडाळा येथील घरकुल योजनेत घर मिळाले, मात्र अवघ्या 20 फूट लांबीच्या नळजोणीसाठी टोलवा टोलवी करणाऱ्या अधिकाऱ्यांना कंटाळून स्थानिक नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी दुपारी साडे बारा वाजता येथील लाभार्थ्यांसोबत रस्त्यावर ठिय्या देत आंदोलन सुरु केले आणि जोडणी मिळत नाही तोपर्यंत येथून उठणार नाही अशी भूमिका घेतल्याने 2 तासात येथे जोडणीच्या कामाला सुरवात करण्यात आली.

२३ फेब्रुवारी रोजी घरकुल योजनेची सोडत झाली त्यानंतर पंचवीस दिवसांनी येथे कुलकर्णी यांच्या प्रयत्नाने सामयिक विज मीटर बसले परंतु फक्त वीस फूट पाण्याचा पाइप टाकण्यासाठी गेले पंधरा दिवसांपासून त्या दररोज घरकुल योजनेचे अधिकारी रविंद्र धारणकर, पाणी पूरवठा विभागाचे उदय धर्माधिकारी, जितेंद्र पाटोळे यांच्याकडे प्रयत्न करत होत्या. मात्र पाणीपुरवठावाले म्हणतात बांधकाम विभागाचे काम आहे, बांधकाम विभाग म्हणते पाणीपुरवठय़ाचे काम आहे, मात्र जोडणी मिळत नव्हती.

त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी पाच मजले या मंडळीला चढ उतार करावा लागत होता. तर वापरण्यासाठी सार्वजनिक शौचालयात असणाऱ्या सार्वजनिक नळाचे पाणी आणावे लागत होते. पाणी नाही म्हणून 67 पैकी अवघे 20 कुटुंब येथे आले आहेत. म्हणून आज संतप्त झालेल्या नगरसेविका डॉ. कुलकर्णी यांनी छाया काळे, अनीता गायकवाड, सुनीता येवले, गंगू मोरे, शोभा पाटोळे, सुनीता सोनवणे, लक्ष्मी पात्रे, संगीता मोर, द्वारका पारखे आदींसह जोपर्यंत पाण्याची पाइपलाइन टाकत नाही तोपर्यंत येथेच बसून राहील अशी भूमिका घेत अधिकाऱयांना निर्वाणीचा संदेश दिले .

त्यामुळे मग वेगाने चक्रे फिरली आणि 2 तासात पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता एस.आर. खाडे यांनी अॅक्शनमध्ये येत ठेकेदार पी.आर. चौधरी आणि त्यांच्या माणसांना येथे तातडीने पाठवून येथील आवश्यक असलेले काम सुरू केले. त्यामुळे नगरसेविका कुलकर्णी यांनी देखील आंदोलन मागे घेतले. मात्र आवश्यक कामासाठी देखील एवढा वेळ लागत असेल आणि ठिय्या देण्याची वेळेत असेल हे बरोबर नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे मत व्यक्त केले आहे. दरम्यान या ठिकाणी आता नियमित पाणीपुरवठा होणार असल्याने येथील लाभार्थींनी आनंद व्यक्त केला असून नगरसेविका कुलकर्णी यांचे आभार मानले आहेत.

Web Title: due to agitation work of water pipe line starts