योग्य भाव न मिळाल्याने रस्त्यावर ओतले कांदे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

येवला : उन्हाळ कांद्याची दरातील घसरण सुरुच येथील बाजार समितीत आज विक्रीला आणलेल्या कांद्याला १८२ रुपये क्विंटलला भाव मिळाल्याने वैभव खिल्लारे या शेतकऱ्याने बाजार समितीसमोरील रस्त्यावरच कांदे ओतून आपला संताप व्यक्त केला. शासनाने शेतकऱ्यांची व्यथा समजून घेत कांद्याच्या भावावर तोडगा काढावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

येवला : उन्हाळ कांद्याची दरातील घसरण सुरुच येथील बाजार समितीत आज विक्रीला आणलेल्या कांद्याला १८२ रुपये क्विंटलला भाव मिळाल्याने वैभव खिल्लारे या शेतकऱ्याने बाजार समितीसमोरील रस्त्यावरच कांदे ओतून आपला संताप व्यक्त केला. शासनाने शेतकऱ्यांची व्यथा समजून घेत कांद्याच्या भावावर तोडगा काढावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक नेहमीप्रमाणे होती. सकाळी लिलावाच्या सत्रामध्ये उन्हाळ कांद्याला १०० ते ५०० च्या दरम्यान भाव होते. मात्र, लिलावातील दोन तीन हारी संपल्यावर कांद्याला १०० च्या आसपास भाव पुकारले जाऊ लागले. पारेगाव येथील शेतकरी वैभव खिल्लारे यांच्या ट्रॅक्टरमधील कांद्याला अवघा १८२ रुपये भाव मिळाला. मोठ्या अपेक्षेने ६ महिनेहून अधिक काळ कांदा साठवणही उत्पादन खर्चाच्या १०-२० टक्के कमी दर मिळाल्याने खिल्लारे संतप्त होत बाजार समिती समोरील मालेगाव कोपरगाव राज्य महामार्गावर त्यांनी कांदा ओतून कांद्याच्या दरातील घसरणीचा निषेध केला.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सुमारे २८० ट्रॅक्टर कांद्याची आवक होती. काही ठराविक उन्हाळ कांद्याला पाचशेच्या आसपास दर मिळाला. मात्र, बहुतांश उन्हाळ कांदा हा २५०-२७५ च्या सरासरीने गेला तर कमीत कमी १०० रुपये प्रति क्विंटल असे दर होते. लाल कांद्याला मात्र किमान २०० तर कमाल ८५१ , सरासरी ८५१ असे दर होते. अजूनही शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांकडे उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात साठवणुकीमध्ये असून कांद्याच्या दरातील या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

“गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या गडगडणाऱ्या बाजार भावाने शेतकरी हैराण झाला असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने आज माझा संताप अनावर झाला. भावाची वाट लागली असताना यावर उपयायोजना केली जात नसल्याने   
तब्बल ७ क्विंटल कांदा बाजार समितीच्या बाहेर येवला-मनमाड रस्त्यावर ओतून देत शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला. हा बाजारभाव मिळाल्याने यातून वाहनाचे भाडेही वसूल होणार नसल्याने आमचे दुख कुणासमोर मांडावे.”

- वैभव खिल्लारे, शेतकरी

Web Title: Due to lack of value of onion in Yevla onions on the road