पावसामुळे नवीन वसाहतींमधील रस्त्यांचे अस्तित्व संपुष्टात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

शहराबाहेर असलेल्या व पालिका हद्दीत नुकताच समावेश करण्यात आलेल्या नविन वसाहतींमधील रस्त्यांचे नुकत्याच झालेल्या पावसामुळे अस्तित्वच संपुष्टात आले असुन या रस्त्यांवरून पायी चालणेही मुश्कील झाले आहे. रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता पालिकेने किमान मुरूम अथवा खडीचा कच टाकून रहिवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी महिलांनी केली आहे.

एरंडोल- शहराबाहेर असलेल्या व पालिका हद्दीत नुकताच समावेश करण्यात आलेल्या नविन वसाहतींमधील रस्त्यांचे नुकत्याच झालेल्या पावसामुळे अस्तित्वच संपुष्टात आले असुन या रस्त्यांवरून पायी चालणेही मुश्कील झाले आहे. रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता पालिकेने किमान मुरूम अथवा खडीचा कच टाकून रहिवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी महिलांनी केली आहे.

शहराच्या बाहेर तीस ते पस्तीस नविन वसाहती असुन यापूर्वी सर्व नविन वसाहती पालिकेच्या हद्दीबाहेर होत्या. त्यामुळे पालिकेच्या वतीने या ठिकाणी केवळ पाणी पुरवठा केला जात होता. मात्र मागील वर्षापासून पालिकेची हद्दवाढ झाली असुन सर्व नविन वसाहतींचा पालिका हद्दीत समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत नुकत्याच झालेल्या अल्पशा पावसाने सर्व नवीन वसाहतींमधील रस्त्यांचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. पावसामुळे सर्व रस्त्यांवर ठिकठीकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असुन सर्वत्र चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. या रस्त्यांवरून पायी चालणे देखील मुश्कील झाले आहे. रस्त्याच्या दुरावास्थेचा सर्वाधिक त्रास महिला व बालकांना होत आहे.

सर्वत्र चिखल निर्माण झाल्यामुळे अनेक दुचाकी फसत असुन अनेकजण घसरून पडत आहेत. नवीन वसाहतींमधून पालिकेच्या वतीने विविध करांची वसुली केली जात असुन सोयी व सुविधा पुरेशा प्रमाणात पुराविल्या जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. सर्वच वसाहतींमध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारींची सोय नसल्यामुळे पाणी परिसरातच तुंबत असते. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच रस्त्यांवर शोष खड्ड्यांची काळी माती टाकल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. नविन वसाहतींचा पालिका हद्दीत समावेश झाल्यामुळे याठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली असल्याचे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले. याबाबत पालिकेने या सर्व रस्त्यांवर किमान मुरूम अथवा खडीचा कच टाकून खड्डे बुजवावेत व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Due to the rains the existence of new colonies in the existence of roads