आता डिसेंबरनंतरच सुरु होणार "तमाशा"... 

tamasha fad.jpg
tamasha fad.jpg

नाशिक : राज्यातील अवकाळी पावसाचा फटका तमाशा फडांनाही बसला आहे. राज्यात तंबू लावून तिकीट बारीवर तमाशा करणारी दहा पथके आहेत. अन्य दोनशे पथके आहेत. यात नारायणगाव व परिसरातील शंभरहून अधिक पथके हंगामी आहेत. प्रामुख्याने ऑक्‍टोबरपासून तमाशा फडांना सुरवात होते. जून ते सप्टेंबरदरम्यान फारसे तमाशाचे कार्यक्रम होत नाहीत. या हंगामात पहिल्या नमनालाच पावसाने तडाखा दिल्याने अनेक तमाशांचे १५ नोव्हेंबरपर्यंतचे कार्यक्रम जवळजवळ रद्द झाले आहेत. राज्यातील डिसेंबरमधील विविध कार्यक्रम व यात्रोत्सवातूनच तमाशामालकांना आता अपेक्षा आहेत. यात्रांमधील उलाढालींवरही काहीसा परिणाम होणार आहे. 

तमाशा फडांनाही "अवकाळी'चा फटका...डिसेंबरनंतर जोर 

खरिपाच्या पीक काढणीनंतर शेतकऱ्यांना थोडी विश्रांती असते. बागायती क्षेत्राचे प्रमाण कमी असल्याने रब्बीची मोठी धावपळ नसते. या काळात प्रामुख्याने ग्रामीण भागात यात्रा-जत्रा, दसरा-दिवाळीनिमित्त लोकवर्गणीतून तमाशाचे कार्यक्रम होतात. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम मिळतात. यात्रांमध्ये तमाशाचे फड रंगतात. तमाशा फडाच्या माध्यमातून सुमारे दहा हजार जणांना रोजगार उपलब्ध होतो. लहान तमाशा पथकात 35 ते 40 कलावंत असतात. तंबू ठोकून तमाशा करणाऱ्या नावाजलेल्या कलापथकात 80 ते 125 पर्यंत कलावंतांसह मदतनीस असतात. मुळातच तमाशा व सर्कस ही मनोरंजनाची साधने हळूहळू कालबाह्य होत आहेत. आवक व खर्चाचा ताळमेळ बसत नसतानाही लोककला जतन करणारे अनेक जण आहेत. राज्यातील नावाजलेली तमाशा पथके लाखापासून पावणेदोन लाखांपर्यंतची सुपारी घेतात. पावसाळ्यानंतर दसरा, दिवाळीला कमी कार्यक्रम असले, तरी लहान तमाशा पथके 28 ते 40 हजार रुपयांपर्यंत सुपारी घेतात. चैत्रोत्सव व आखाजीच्या काळात मोठ्या संख्येने यात्रोत्सव असतात. या वेळी फडांना उसंत नसते. या गावाहून त्या गावाला सातत्याने ग्रामीण भागात कार्यक्रम असतात, असे तमाशा व्यवस्थापकांनी सांगितले. 

ऑक्‍टोबर व नोव्हेंबरमधील अनेक कार्यक्रम रद्द

यात्रेचे स्वरूप, गावाची लोकसंख्या, लोकवर्गणी, यात्रेतील उलाढालीवरच सुपारी अवलंबून असते. लहान गाव असल्यास कमी बिदागी मान्य केली जाते. तमाशामालक कलावंतांना आठ महिन्यांसाठी ठराविक रक्कम निर्धारित करून देतात. जिल्ह्यात देव मामलेदार, चंदनपुरी, नैताळे यांसह अनेक प्रसिद्ध यात्रा आहेत. गावोगावी तिथीनिहाय यात्रा ठरलेल्या असतात. अतिपाऊस व खरिपाच्या नुकसानीचा फटका काही प्रमाणात यात्रांनाही बसणार आहे. अवकाळी पावसामुळे ऑक्‍टोबर व नोव्हेंबरमधील अनेक कार्यक्रम रद्द झाले. काही ठिकाणी डबल कार्यक्रम केले, असे दत्तात्रेय सोनवणे (भोकरेकर) यांनी सांगितले. 

राज्यातील प्रसिद्ध तमाशा कलापथके 
रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे, पांडुरंग मुळे, काळू-बाळू, कैलास नारायणगावकर, आनंद महाजन. 

प्रतिक्रिया
तमाशा कलापथकासाठी तिकीटदर वाढवूनही खर्च पेलवत नाही. आवक कमी झाली. महागाईमुळे खर्च वाढला. तमाशाचा प्रेक्षकही काहीसा कमी झाला आहे. तमाशा कला जिवंत ठेवण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. कलापथकातील शंभर-सव्वाशे जणांचा कुटुंबाप्रमाणे सांभाळ करावा लागतो. त्यांच्या अडीअडचणी, सुख-दु:खात लक्ष द्यावे लागते. आमच्या कलापथकात कलावंत, स्वयंपाकी, चालक, तिकीट विक्री करणारे, मदतनीस यांसह 140 जण आहेत. त्यावरूनच खर्चाचा अंदाज येईल.- शफी शेख, व्यवस्थापक, रघुवीर खेडकर तमाशा कलापथक 

ऑक्‍टोबरपासूनच तमाशाच्या कार्यक्रमांना सुरवात होते. दसऱ्यानंतर तमाशा पथकांचा जोर सुरू होतो. यंदा अवकाळीने फटका बसला. अनेक ठिकाणी पावसामुळे कार्यक्रम रद्द झाले. काही ठिकाणी दोनदा कार्यक्रम करूनही पावसाच्या व्यत्ययामुळे सुपारी घेताना अडचणी आल्या. आम्हा सामान्य कलावंतांना त्याचा मोठा फटका बसला. माझ्या वडिलांचे नथुभाऊ भोकरे कलापथक 1945 पासून आहे. आता मी हे कलापथक सांभाळत आहे. आवक व खर्चाचा ताळमेळ बसत नाही. अनंत अडचणींचा सामना करीत लोककला जिवंत आहे. -दत्तात्रेय सोनवणे-भोकरे, मालक, नथुभाऊ भोकरे तमाशा कलापथक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com