'सकाळ' मुळे आरम नदीला प्राप्त झाले गतवैभव 

अंबादास देवरे
शनिवार, 30 जून 2018

सटाणा : 'दै. सकाळ' च्या 'नद्यांचे पुनरुज्जीवन' या उपक्रमांतर्गत बागलाण तालुक्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरम नदीपात्राची स्वच्छता करून नदीला गतवैभव प्राप्त झाल्याने शहरवासियांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सटाणा : 'दै. सकाळ' च्या 'नद्यांचे पुनरुज्जीवन' या उपक्रमांतर्गत बागलाण तालुक्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरम नदीपात्राची स्वच्छता करून नदीला गतवैभव प्राप्त झाल्याने शहरवासियांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

तब्बल पाच दिवस चाललेल्या या उपक्रमात सटाणा नगरपरिषद, देवमामलेदार देवस्थान ट्रस्ट, देवमामलेदार रोटरी क्लब, रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण, बागलाण अकेडमी, साईसावली प्रतिष्ठान, राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना व सर्वसामान्य नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतला होता. यापूर्वी अनेकवेळा लोकसहभागातून नदी स्वच्छतेचा प्रयत्न झाला, मात्र 'सकाळ' च्या या उपक्रमाने तालुकावासीयांची मने जिंकून घेतली. 

या अभियानात जेसीबी व पोकलेंड मशीन्स च्या मदतीने आरम नदीपात्रातील सर्व काटेरी झुडुपे, घनकचरा काढण्यात आला. अमर्याद वाळू उपश्यामुळे नदीपात्रात जागोजागी मोठे खड्डे तयार झाले होते. हे खड्डे बुजवून नदीपात्राचे सपाटीकरण करण्यात आले. पोकलंड मशीनद्वारे नदीच्या मध्यभागी पूर्व - पश्चिम दिशेला १०० ते १५० मीटर अंतरापर्यंत खोदकाम करून नालासदृश मोठी चारी तयार करण्यात आली. शहराच्या दक्षिण उताराकडील सांडपाणी ज्या ठिकाणी आरम नदीपात्रात मिसळते, तेथून हे सांडपाणी नाल्यात सोडण्यात आले. योग्य उतार मिळाल्याने हे सांडपाणी पूर्वेकडील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर असलेल्या आरम नदीवरील पुलाखालून पुढे वाहु लागले. त्यामुळे शहराच्या बाजूने असलेल्या किनाऱ्यावरील संपूर्ण दलदल नाहीशी झाली. या दलदलीत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी नदीपात्रात १० ते १५ फुट खोलीचे खोदलेले खड्डे दुषित पाणी आटल्याने उघडे पडले. पावसाळ्यातील पूरपाणी वाहून न जाता खोलवर मुरण्यासाठी नदीपात्र दक्षिण उत्तर नांगरल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. 

या अभियानात द्वारकाधीश साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव सावंत व कार्यकारी संचालक सचिन सावंत तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाने जेसीबी व पोकलेंड मशीन्स विनामुल्य तर बागलाण अकेडमीने मनुष्यबळ उपलब्ध करून दिले होते. रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाणने जेसीबी व पोकलेंड मशीन्ससाठी मोफत इंधन उपलब्ध करून दिले. 
या स्वच्छता अभियानानंतर आरम नदीचे रुपडे बदलले असून आता सटाणा पालिका प्रशासनाने आरम चौपाटीच्या निर्मितीसाठी आराखडा तयार केला आहे. पालिका प्रशासनाचे नदी संवर्धन करून नदीपात्राच्या दोन्ही बाजूकडील किनाऱ्यावर वृक्ष लागवड व जॉगिंग ट्रेक करण्याचे नियोजन आहे. एकूणच भविष्यात आरम चौपाटीच्या निर्मितीत 'सकाळ' चा खारीचा वाटा नागरिक विसरू शकणार नाहीत. 

'दै.सकाळ' च्या या उपक्रमामुळे आरम नदीला गतवैभव प्राप्त होणार असून शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. यापुढेही नदी संवर्धनाचा वसा पुढे सुरूच ठेवणार असून गुजरातच्या धर्तीवर आरम नदीपात्रात सटाणा शहराची चौपाटी करण्याचा मानस आहे.
- सुनील मोरे, नगराध्यक्ष, सनपा

'दै.सकाळ' च्या नदी संवर्धन उपक्रमाने रोटरी क्लबला एक नवी उर्जा मिळाली आहे. तालुक्यातील इतर प्रदूषित नद्याही स्वच्छ करण्याचा आमचा प्रयत्न राहील. 
- प्रदीप बच्छाव, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण
 

Web Title: due to sakal aram river get life again