
Dhule News : पिंपळनेर बसस्थानक समस्यांचे आगार; प्रवाशांची गैरसोय
पिंपळनेर : येथील बसस्थानकावर सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पिण्याच्या पाण्याची असुविधा, स्वच्छतेचा अभावामुळे वराहांनचा वावर व असभ्य पार्किंगवर होत असलेली अरेरावी यामुळे प्रवासी वैतागले असून बसस्थानक समस्यांचे आगार बनले आहे. (Due to lack of facilities at bus station passengers are being inconvenienced pimpalner dhule news)
शहर बसस्थानकावरून दैनंदिन हजारो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून बसस्थानक प्रशासन आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात असफल ठरत आहे. बाकड्यांवर व बाकांखाली नेहमी घाण साचलेली राहते. दिवसभर ही घाण तशीच पडून असल्यानंतरही याची साफसफाई करण्यात दिरंगाई केली जाते.
हिरकणी कक्षही धूळखात
बस स्थानक बैठक व्यवस्थेच्या पाठीमागे पडलेल्या कचऱ्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तसेच, बसस्थानकाची साफसफाई केली जात नसल्यामुळे कचरा पडलेला असतो. या ठिकाणी खेड्यापाड्यांवरून प्रवास करणारे विद्यार्थी व नागरिक बाकावर न बसता थांबूनच बसची बराच वेळ प्रतीक्षा करणे पसंत करतात. यामुळे थांबणाऱ्या प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हिरकणी कक्षही धूळखात पडलेला आहे.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

बसस्थानकातील अस्वच्छ व पाणी नसलेली पिण्याची टाकी
विकत घ्यावे लागते पाणी
पिण्याच्या पाण्याची सोय बसस्थानकावर करण्यात आली आहे, पाण्याची टाकीची कित्येक महिन्यांपासून साफसफाई करण्यात न आल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने दिली. व त्यात पाणीच भरलेले नसते.
या ठिकाणी प्रवासी लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय केली नसल्यामुळे प्रवाशांना आजूबाजूच्या हॉटेलमध्ये जाऊन किंवा पिण्याचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. यामुळे प्रवाशांचे आर्थिक नुकसानही होताना दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित परिवहन विभागाने बसस्थानकावर असलेल्या समस्यांचे निराकरण करावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.