दोन तास उलटूनही मुली आल्या नाहीत...पालकांना धडकी...पुढे...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनींना नियोजनाप्रमाणे घेऊन जाणारी बस सायंकाळी पाचऐवजी तब्बल दोन तास उशिरा सातला पोचल्याने वाड्या, वस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अंधारातून वाट काढत रात्री आठच्या सुमारास घर गाठता आले. त्यामुळे धडकी बसलेल्या पालकांनी आगाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. 

नाशिक : मालेगाव एस. टी. आगार सध्या नेहमीच चर्चेत राहिले आहे. ढिसाळ नियोजनाअभावी बस उशिरा सुटणे, रस्त्यात बस बंद पडणे, पाटे तुटणे, ब्रेक डाऊन होणे, प्रसंगी प्रवाशांकडून धक्का मारून बस सुरू करणे असले प्रकार वारंवार होत आहेत. याचाच प्रत्यय आघार बुद्रुक येथील विद्यालयाला सोमवारी (ता. 25) आला. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनींना नियोजनाप्रमाणे घेऊन जाणारी बस सायंकाळी पाचऐवजी तब्बल दोन तास उशिरा सातला पोचल्याने वाड्या, वस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अंधारातून वाट काढत रात्री आठच्या सुमारास घर गाठता आले. त्यामुळे धडकी बसलेल्या पालकांनी आगाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. 

बसची क्षमता ५५ आणि ७५ विद्यार्थिनीं
"मविप्र'च्या आघार बुद्रुक येथील जनता विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या गरीब व आदिवासी कुटुंबातील एकूण ७५ विद्यार्थी दररोज चिंचावड फाटा, मांजरे नाला, इंदिरानगर, शर्मा वस्ती, ढवळीविहीर, कोरा वस्ती, करसर वस्ती या चार किलोमीटर अंतरावरून एस. टी. महामंडळाच्या विद्यार्थ्यांनी मोफत प्रवास उपक्रमांतर्गत ये-जा करीत आहेत. बसची क्षमता ५५ आसनांची असतानाही ७५ विद्यार्थिनींना ज्ञानार्जनासाठी उभ्याने प्रवास करावा लागत आहे. दरम्यान मालेगाव एस.टी. आगाराची विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी नियमित बस वेळेवर येत नसल्याने पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात आगाराविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या.

Image may contain: one or more people and people standing

photo : आघार बुद्रुक येथील जनता विद्यालयाचे विद्यार्थी रात्री बसची वाट पाहताना

हेही वाचा >जिल्हा न्यायालयात आगीत शेकडो फाइल खाक..कोणत्या होत्या त्या फाईल? 

आगारप्रमुखांकडून उडवाउडवीचे उत्तरे

काही पालकांनी व प्राचार्यांनी आगारप्रमुख धनवटे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, उडवाउडवीचे उत्तरे दिली जात होती. नंतर ब्रेक डाऊनची सबब पुढे केला. हा प्रकार नित्याचा झाला असून, या मुला- मुलींना अंधारात वाट शोधत घरी जावे लागत आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पालकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, यापुढे असा प्रकार पुन्हा झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा काशीनाथ पवार, रामचंद्र हिरे, पोपट निकम, कोंडाजी पवार, नामदेव पवार, अनिल हिरे, सचिन निकम, दीपक हिरे, भुरा गायकवाड, बळिराम हिरे आदी संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. 

हेही वाचा >थरारक अपघात....गाडीत होते खेळाडू....दीड तास गाडीच्या कॅबिनमध्ये 'तो' अडकून होता

अनुचित प्रकार घडल्यास एस. टी. महामंडळच जबाबदार

विद्यार्थिनी उशिरा रात्री वाट काढत घरी जातात. त्यांच्यासोबत अनुचित प्रकार घडल्यास एस. टी. महामंडळच जबाबदार राहील. - रामचंद्र हिरे, सामाजिक कार्यकर्ता 

वारंवार आगारप्रमुख बस सोडली आहे, असे उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करता आली नाही. शाळेसाठी बस वेळेत सोडायला हवी. - जे. एन. खैरनार, प्राचार्य 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to a two hour bus late Parents are worried at Malegaon Nashik Marathi News