ई- टीचिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तज्ज्ञांची मदत

Education
Education

नाशिक - शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सराव कालवधीत गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयांचे सखोल मार्गदर्शन मिळावे या हेतूने आदिवासी विकास विभाग आणि स्वंयसेवी संस्थेच्या पुढकाराने ई-टीचिंगच्या माध्यमातून राज्यातील निवडक दहा आश्रमशाळांत प्रायोगिक तत्त्वावर या विषयातील तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे. प्रथम टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर असलेला हा उपक्रम नवीन शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये राबविण्याचा मानस आदिवासी विकास विभागाने व्यक्त केला आहे. 

राज्यातील आश्रमशाळांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची गणित, इंग्रजी आणि विज्ञानातील भीती कमी करण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभागामार्फेत शैक्षणिक वर्षात या क्षेत्रातील नामवंत संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. या धर्तीवर दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान आणि इंग्रजीच्या परीक्षेला सामोरे जाताना कुठलीही भीती निर्माण होऊ नये यासाठी आदिवासी विकास विभाग आणि ‘पार्थ नेटवर्क’ या संस्थेच्या माध्यामातून प्राथमिक तत्त्वावर दहा आश्रमशाळेत ‘ई-टीचिंग फॉर एसएसएसी एक्‍सलन्स’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना सराव गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांची एक उजळणी म्हणून सरावाच्या कालावधीत तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यात प्रत्येक दिवसाला एक विषय घेऊन तज्ज्ञांकडून दोन तास दररोज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. फेब्रुवारी महिना अखेर विद्यार्थ्यांना याचे मार्गदर्शन मिळणार असून विद्यार्थ्यांकडूनही या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात विद्यार्थ्यांना शंका असल्यास त्याचे निराकरणही ऑनलाइनच्या माध्यामातून तत्काळ तज्ज्ञांकडून केले जात आहे.

या उपक्रमास विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद बघता नवीन शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील सर्व ५०२ आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळवून देण्यासाठी विभाग प्रयत्नशील राहणार असून, याकरिता आश्रमशाळेत आवश्‍यक ती सर्व प्रणाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

५०२ - राज्यातील आश्रमशाळा
१० - निवड झालेल्या शाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com