ई-कचरा संकलनासाठी स्वतंत्र घंटागाडीचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

नाशिक - मेट्रो शहरांमध्ये ई-कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असताना वाढणाऱ्या शहरातही भविष्यात समस्या वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आतापासूनच नियोजनाचा भाग म्हणून घनकचरा संकलनाबरोबरच ई-कचरा संकलित करण्यासाठी स्वतंत्र घंटागाडी सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी घेतला. शहरातील ई-कचरा संकलित करून पाथर्डी येथील कचरा डेपोच्याच बाजूला ठेवण्याचे नियोजन केले जाणार आहे.

मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली व पुण्यासारख्या मेट्रो शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना घनकचऱ्यासोबतच नादुरुस्त फ्रीज, टीव्ही, संगणकासारख्या ईलेक्‍ट्रॉनिक कचरा वाढत आहे. घनकचरा उचलण्याची सोय सर्वच शहरांमध्ये आहे, परंतु ई-कचऱ्याबाबत फारशी जागरुकता नाही. सरकारच्या पर्यावरण विभागाने मोठ्या शहरांमध्ये आता घनकचऱ्याबरोबर ईलेक्‍ट्रॉनिक कचऱ्याची सोय लावण्याची सूचना केली आहे. शहर विकास आराखड्यामध्ये स्वतंत्र जागा राखीव ठेवण्याच्या सूचना यापूर्वी दिल्या आहेत. त्यादृष्टीने तयारीही सुरू झाली आहे. परंतु नाशिकसारख्या टू व थ्री टायर शहरांमध्ये अजून जागरुकता नाही. अगदी कमी प्रमाणात ई-कचरा बाहेर पडत असला तरी त्याचे नियोजन आतापासूनच करणे गरजेचे असल्याने त्यादृष्टीने महापालिकेने पावले उचलली आहेत.

विल्हेवाट गरजेची
घनकचऱ्यापेक्षाही ई-कचरा धोक्‍याचा आहे. फ्रीज, टीव्ही, संगणकसारख्या ईलेक्‍ट्रॉनिक वस्तूंमध्ये घातक विषारी वायू असतात त्या बाहेर पडल्यास प्रदूषण वाढते. शिवाय त्या वस्तूंचा स्फोट झाला तरी जीवित हानी होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे अशा प्रकारच्या ई-कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मुंबई, दिल्ली शहरांमध्ये अशा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. नाशिकमध्ये भविष्याचा विचार करून आतापासूनच नियोजन केले जाणार आहे.

Web Title: E-waste collection ghantagadi