लाल-पिवळ्या सिमला मिरची पॉलिहाऊसमधून लाखोंची कमाई  

नरेश हाळणोर
गुरुवार, 19 जुलै 2018

आज त्यांच्या पॉलीहाऊसच्या लाल-पिवळ्या मिरच्या राज्यातच नव्हे तर परराज्यात आणि दुबईत भाव खाताहेत. कारण, एका मिरचीचे वजन आहे पावशेर. 

नाशिक : नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावात अवघ्या दोन एकरात पॉलिहाऊस उभारून लाल अन्‌ पिवळ्या रंगाच्या सिमला मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या, पाच भावंडांच्या कुटूबियांनी आधुनिक शेतीचा आदर्श मार्गच समाजाला दाखविला आहे. पाच भावंडांपैकी एक जेलर तर दुसरा सैन्याचे सेवानिवृत्त अधिकारी असून तिसरा भाऊ पोलीस, चौथा जलसंपदा तर पाचवा खासगी नोकरी सांभाळून शेतीत राबताहेत. मात्र याहीपेक्षा कौतुकास्पद बाब म्हणजे या पाचही भावंडांची 8 मुले, ज्यांनी कधी शेती केली नाही मात्र इंजिनिअरिंगसह विविध शैक्षणिक पदव्या घेतल्या आहेत. त्यांनीच पुढाकार घेत आधुनिक शेतीचे रितसर प्रशिक्षण घेऊन हे पॉलिहाऊस उभे केले आहे. आज त्यांच्या पॉलीहाऊसच्या लाल-पिवळ्या मिरच्या राज्यातच नव्हे तर परराज्यात आणि दुबईत भाव खाताहेत. कारण, एका मिरचीचे वजन आहे पावशेर. 
 
भालेराव भावंडांनी शेतीत मोलमजुरी केली परंतु शेती करण्याचा अनुभव नव्हता. तरीही शेती असावी, याच हेतूने त्यांनी विंचूरगवळीत तीन एकर शेती घेतली. पारंपरिक पद्धतीने त्यांनी शेती केली. परंतु त्यांच्या मुलांनी आधुनिक शेतीकडे कल पाहून त्यांनी मुलांना पाठिंबा दिला. समाधान आणि प्रशांत या दोघा चुलत भावंडांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कृषी विभागातून सिमला मिरचीच्या शेतीचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणामुळे त्यांना बॅंकेकडून कर्ज उपलब्ध झाले. त्यातून त्यांनी दोन एकरावर सुमारे1 कोटी रुपये खर्चून पॉलीहाऊस उभारले. एका एकरात पिवळ्या तर एका एकरात लाल रंगाच्या सिमला मिरचीची लागवड गेल्या मार्च महिन्यात केली. कोणतेही रासायनिक खतांचा वापर न करता ऑर्गेनिक पद्धतीने त्यांनी या मिरचीचे उत्पादन घेतले. त्यामुळे मागणीप्रमाणे त्यांच्या पॉलिहाऊसमधून 500 ते 700 किलो मिरचीचे एका दिवसाला उत्पादन होते आहे. खुल्या बाजारात लाल-पिवळ्या सिमला मिरचीचा दर हिरव्या मिरचीपेक्षा तिप्पट-चौपटीने असतो. तर मुंबईसारख्या बाजारात 200 ते 250 ग्रॅम मिरची 100 ते 125 रुपयांचा विकली जाते. 

एकत्रित भालेराव कुटूंबिय -
मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या आडगावपासून अवघ्या चार ते पाच किलोमीटर अंतरावर विंचूर-गवळी हे गाव वसलेले आहे. मूळचे चापडगाव (ता. दिंडोरी) येथील रहिवाशी असलेले कै. बाबुराव भालेराव हे पाटकरी होते. पाटकरीची नोकरी अन्‌ मोलमजुरी करून त्यांनी आपल्या पाचही मुलांना शिकविले. थोरले अशोक हे काही वर्षांपूर्वी कारागृह अधिक्षक तर दुसरे विनायक भालेराव हे लष्करातून सेवानिवृत्त झाले. शिवाजी भालेराव हे सरकारवाडा पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तर चौथे तानाजी भालेराव हे जलसंपदामध्ये नोकरीला असून धाकटे राजेंद्र भालेराव हे खासगी नोकरी करतात. या पाचही भावंडांना आठ मुले आहेत. त्यापैकी समाधान याने बीएची पदवी, प्रशांत याने बीएस्सी ऍग्री, तर निलेश व जयेश यांनी अभियांत्रिकीची शिक्षण घेतले असून आकाश हा उच्च शिक्षण घेतो आहे. यांच्यापेक्षा लहान असलेली शाळा-महाविद्यालयीन शिक्षण घेताहेत. 

ऑर्गेनिक सिमला मिरचीसाठी... 
* दोन्ही पॉलिहाऊसमध्ये 18 हजार रोपांसाठी ठिबक सिंचन 
* एका रोपाचे आयुष्यमान 18 महिने 
* एका रोपाला 18 महिन्यात किमान 12 ते 15 किलो मिरची 
* ठिबकद्वारे दिवसातून फक्त 10 ते 15 मिनिटे पाणी 
* पाणीही र्निजंतूक व फिल्टर केलेले 
* ऑर्गेनिक खत म्हणून दूध-दही, सडलेल्या भालेभाज्यांचा रस, कडूलिंबाच्या पानांचा रस 
* पॉलिहाऊसमधील तापमानाचा समतोल राखण्यासाठी शेल्टर 
* पावसाळ्यात पॉलिहाऊसवरील पाण्याचे हॉर्वेस्टिंग

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Earning millions from red yellow capsicum polyhouse