आठ महिन्यांत चार हजार रुपयेच उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

गेल्या आठ महिन्यांत चार हजार रुपयांचे खतविक्री केले.  त्यामुळे त्र्यंबकेश्‍वरचा खतप्रकल्प म्हणजे ‘पांढरा हत्ती’ की काय, असा प्रश्‍न येथील नागरिक विचारत आहेत.

त्र्यंबकेश्‍वर -  येथे नोव्हेंबरपासून त्र्यंबकेश्‍वर तहसील कचेरीच्या मागे कार्यान्वित केलेला खतप्रकल्प सध्या बंद असून, गेल्या आठ महिन्यांत चार हजार रुपयांचे खतविक्री केले. तेही पालिकेच्या नगरसेवकांच्या नावे हे विशेष! त्यामुळे त्र्यंबकेश्‍वरचा खतप्रकल्प म्हणजे ‘पांढरा हत्ती’ की काय, असा प्रश्‍न येथील नागरिक विचारत आहेत.

शहरातला टनावारी निघणारा कचरा वर्गीकृत करून या कचरा डेपोत नेण्यात येतो. ओल्या कचऱ्यापासून २५ दिवसांत खत बनते. साधारण दिवसाला तीन टन कचरा या डेपोत जमतो. एक टन कचरा तळवाडे येथील अशोक प्रकल्पाला देण्यात येतो. प्लॅस्टिक क्रश करून त्याच्यापासून नवनिर्मिती बिंदू महाराजांचे शिष्य करीत असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले. प्रत्यक्षात आरोग्य विभागाच्या सभापती माधवी भुजंग यांनी, यापूर्वी खतप्रक्रिया चालू होती. सध्या ती बंद असून, आधीच्या कचऱ्याचा ठेका घेणाऱ्याची सर्व यंत्रे येथे खताची निर्मिती करत होती. सध्या दिशा एजन्सीकडे हे काम आहे. त्यांची येथे काही सामग्री नाही. त्यामुळे खतप्रकल्प बंद अवस्थेत आहे, असे स्पष्ट केले. येथील एच. आर. ठाकरे या विभागाचे काम पाहतात. त्यांनी १४, १५ गोण्या खत म्हणजे ४०० किलो खत आहे; परंतु ग्राहक नसल्याचे सांगितले. म्हणजे मोठे उत्पन्न मिळत आहे, असा गाजावाजा करीत केलेले हे काम फक्त कागदोपत्री मेळ घालण्याचा प्रकार होत असल्याची टीका होत आहे. यात दोन नगरसेवकांनी दोन हजारांचे प्रत्येकी खत घेतल्याचेही  शंकास्पद वाटते.

कचरा डेपोत सध्या टनावारी कचऱ्याचे ढीग असून, या परिसरात त्याची प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. लगतची तहसील, पालिका कर्मचारी निवासस्थाने व पुढे नवीन वसाहती यातील नागरिकांना या वासाने नकोसे होते. त्यांच्या वेळोवेळीच्या तक्रारींची दखलही घेतली जात नाही. सध्या कचरा संकलित करणाऱ्या वाहनांवर त्र्यंबकराजाची स्वच्छतेची धून लावलेली असते; परंतु हे वाहन रस्त्यात धक्का खात कचरा सांडत जाते. मधे बंदही पडते. चार दिवसांआड पगार न मिळाल्याने, अथवा विविध अडचणींमुळे कचरा संकलनाला स्वच्छता कर्मचाऱ्यांची दांडी असते. नागरिक या सर्व सोयी-सुविधांसाठी कर भरतात. कचरा वेगळा करून कचरागाडीची वाट पाहण्यास वेळ घालवत त्या गाडीपर्यंत कचरा नेऊन देतात. त्यामुळे हा खतप्रकल्प केवळ देखाव्यापुरताच आहे का, असा प्रश्‍न येथील नागरिकांना पडला आहे.

वरिष्ठांनाच विचारा!
येथील खत प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी पालिका कार्यालयात गेल्यावर त्याच विभागातील कर्मचाऱ्यांना विचारा. वरिष्ठांनाच विचारा, अशी व मोघम उत्तरे देऊन टाळण्यात येत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eight months only 4 thousand rupees