लाचलुचपत कार्यालयात पुन्हा खडसेंची हजेरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

नाशिक - राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजेरी लावली. पुण्यातील भोसरीतील वादातीत जागेसह एकनाथ खडसे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी आज दुसऱ्यांदा सुमारे एक ते दीड तास चौकशी करण्यात आल्याचा दुजोरा विश्‍वसनीय अधिकाऱ्यांनी दिला. गेल्या वर्षी 20 सप्टेंबर रोजी त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुमारे दोन ते अडीच तास चौकशी केली होती. 

राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्याचसंदर्भात गेल्या 20 सप्टेंबर 2017 रोजीही त्यांची विभागामार्फत सुमारे दोन ते अडीच तास चौकशी केली गेली होती. त्याच पार्श्‍वभूमीवर आज (ता. 10) खडसे हे कॅनडा कॉर्नर येथील नाशिक विभागीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आले होते. दुपारी दीड वाजता ते लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात आल्यानंतर अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या दालनामध्ये गेले. सुमारे पावणेतीन वाजेपर्यंत सुमारे सव्वा तास त्यांची बंद दालनामध्ये त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या प्रकरणांबाबत चौकशी करण्यात आल्याचे विश्‍वसनीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर मात्र खडसे यांनी नाशिकमध्ये कुठेही न जाता मुंबईच्या दिशेने निघून गेल्याचे समजते. 

दरम्यान, खडसे यांची सहा महिन्यांनंतर पुन्हा दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली आहे. भोसरीतील भूखंड प्रकरणासह त्यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्तेप्रकरणीही तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्या साऱ्यांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू आहे. गेल्या वेळी त्यांनी "साऱ्यांवर वाईट दिवस येतात' असे सूचक वक्‍तव्यही केले होते. "उंदीर घोटाळ्या'मुळे खडसे यांची चौकशी पुन्हा सुरू झाल्याचीही चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

Web Title: eknath khadse attendance at the office of ACB