पटेलांच्या यशासाठी महाजन नाथाभाऊंच्या दरबारात

कैलास शिंदे
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

मतदानाच्या पूर्वसंध्येला भेट; विधान परिषद निवडणूक

मतदानाच्या पूर्वसंध्येला भेट; विधान परिषद निवडणूक

जळगाव-  विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकीसाठी मर्जीतील उमेदवार दिल्यानंतर त्याच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न करणाऱ्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या प्रयत्नांचाच भाग म्हणून आज सकाळी ज्येष्ठनेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप उमेदवार चंदू पटेलही होते. खडसेंच्या मंत्रिमंडळातील राजीनाम्यानंतर दोघा नेत्यांमधील अधिकच ताणले गेलेल्या संबंधांच्या पार्श्‍वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. "नाथाभाऊ' गटाला बाजूला ठेवून भाजप उमेदवाराच्या विजयाचे गणित मांडत असल्याचे वृत्त आज "सकाळ'ने प्रसिद्ध केल्यानंतर ही भेट घडून आली हे विशेष.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जळगाव विधानपरिषद मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षातर्फे चंदू पटेल यांची उमेदवारी आहे. ते महाजन यांचे समर्थक आहेत. भाजपात गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांचे अंतर्गत वाद आहेत. त्यामुळे खडसे गटाचे जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक पटेल यांना सहकार्य करण्याची शक्‍यता कमी असल्याचा अंदाज महाजन गटाने बांधला आहे. त्यातूनच त्यांनी खडसे गटांच्या मतदारांना वगळून पटेलांच्या विजयाचे गणित जुळविण्याची तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. विरोधी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, खानदेश विकास आघाडी तसेच शिवसेनेच्या मतदारांना विश्‍वासात घेत असताना खडसेंच्या गटाला दूर ठेवण्यात येत असल्याने या गटाचे मतदार सदस्य नाराज होते. याबाबत काही जणांनी थेट खडसे यांच्याकडे तक्रारही केली. त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती.

अकरा वाजता "मुक्ताई'वर
या स्थितीच्या पार्श्‍वभूमीवर महाजन यांनी उमेदवार चंदू पटेल यांच्यासह आज सकाळी जळगावातील एकनाथराव खडसे यांच्या जळगावातील "मुक्ताई' या निवासस्थानी धाव घेतली. गेल्या दोन दिवसापासून खडसे मुंबईत होते, ते जळगावात आल्याचे माहिती मिळताच सकाळी अकरा वाजता त्यांची भेट घेण्यात आली. यावेळी माजी आमदार गुरुमुख जगवानी, आमदार सुरेश भोळे उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाचे काही नगरसेवकही तसेच भाजपाला पाठिंबा देणारे अपक्ष नगरसेवकही उपस्थित होते.

Web Title: eknath khadse meet girish mahajan